आदिवासींचे ज्ञान आणि सज्ञानी सरकार....

Narhari Zirwal
Narhari Zirwalesakal
Updated on

यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकसाठी सर्वांत लक्ष्यवेधी काही ठरलं असेल तर ते आहे, आदिवासी बांधवांसाठी घोषणा करण्यात आलेले पहिले औद्योगिक क्लस्टर. दिंडोरी तालुक्यात राज्यातील हे पहिले आदिवासी औद्योगिक क्लस्टर साकारले जाणार आहे. या औद्योगिक क्लस्टरसाठी ७५ एकर जागा आणि २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी बांधवांमध्ये अनेक सुप्त ज्ञानगुण आणि उद्योग क्षमता आहेत, त्यासाठी हे क्लस्टर उपयोगी ठरणारे आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे यासाठी अभिनंदन करायला हवे. नाशिक आणि खानदेशातील काही प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी औद्योगिक क्लस्टर मात्र या सगळ्यात लक्षवेधी ठरणारे आहे.

Narhari Zirwal
अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येणे कठीण

आदिवासी समुदाय काय काय करु शकतो, हे सांगायचे झाल्यास त्याची मोठी यादी आणि सविस्तर विवरण द्यावे लागेल. पण, या निमित्ताने काही महत्त्वाच्या मुद्यांना स्पर्श करणे आवश्यक वाटते. आदिवासींमधील वनौषधींचे ज्ञान प्रचंड आहे. कोरोना काळात संसर्ग होऊनही आदिवासींनी अॅलोपॅथी औषधांचा वापर केला नाही. त्यामुळे आयुर्वेदाचा उपयोग आदिवासी भागात करावा लागला. विशेष म्हणजे आयुर्वेदाची मात्रा त्यांना लागू देखील पडली. आयुर्वेद आदिवासींना तुलनेने अधिक जवळचे वाटले. आयुर्वेदात वनौषधींचा चांगल्या रितीने वापर केला जातो. अनेकदा वैद्य मंडळी काही दुर्मिळ वनौषधींसाठी आदिवासींवर अवलंबून असतात. सध्याच्या काळात निसर्गाच्या सर्वाधिक जवळ राहणारा हा घटक आहे. वनौषधींच्या माध्यमातून मोठे रोजगार, उद्योगधंदे उभे राहू शकतात. दिंडोरीतील क्लस्टरच्या निमित्ताने या पैलूला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या माध्यमातून वनौषधींचा विश्वकोष जगासाठी खुला होऊ शकतो.

आदिवासी भागांमध्ये स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढत आहे. स्ट्रॉबेरीवर आधारित उद्योगांची मोठी साखळी येथे निर्माण होऊ शकते. जांभूळ वाईनचा प्रयोग ईएसडीएसने नाशिकमध्ये यापूर्वी केला आहे. आता या क्लस्टरच्या निमित्ताने जांभूळ वाईनचे मोठे प्रकल्प दिंडोरी क्लस्टरमध्ये उभे राहू शकतात. इंद्रायणी तांदूळ जगात लोकप्रिय होऊ पाहत आहे. इंद्रायणीला व्यापक अर्थाने जागतिक स्तरावर नेण्यासाठी हे क्लस्टर अत्यंत उपयोगी ठरु शकतं. ब्रिटनमध्ये मोठी मागणी असलेल्या ब्लॅक राईसला या क्लस्टरमधून चांगले बाळसे धरता येऊ शकते. नागलीसाठी तर नाशिकचा आदिवासी बेल्ट जगासाठी मोठे निर्यात केंद्र होऊ शकते. सध्याच्या रसायनयुक्त अन्नधान्यामुळे नागलीचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. नागलीचे चॉकलेट्स, पाणीपुरीपासून अनेक उत्पादने नाशिकमध्ये तयार होत आहेत. स्वतंत्र क्लस्टरमध्ये आदिवासी युवकांनी पुढाकार घेतल्यास जागतिक बाजारपेठ या उत्पादनांना मिळू शकेल.

Narhari Zirwal
कार्यक्षमता वाढवण्याची गुरुकिल्ली

भाजीपाल्याच्या संदर्भात मोठ्या समस्या भेडसावत आहेत. रसायनयुक्त भाजीपाल्यामुळे सुजाण नागरिक सदैव चिंतीत असतात. जैविक उत्पादनांमध्ये देखील कितपत खरेपणा आहे, हे अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, नेमकेपणाने मोजमाप करणारी यंत्रणा आपल्याकडे नाही. त्यामुळे आदिवासी भागातून थेट भाजीपाला आल्यास त्यातून सह्याद्रीसारखे उद्योग या क्लस्टरमध्ये उभे राहू शकतात. यातून आदिवासींमध्ये मोठी औद्योगिक क्रांती घडल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे हे क्लस्टर त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारुन हे क्लस्टर लवकर कार्यान्वीत होणं गरजेचं आहे. या क्लस्टरचा पुढचा विस्तार धुळे जिल्ह्यातील आदिवासी भाग, नंदुरबार जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागात होणं शक्य आहे. दिंडोरीतील क्लस्टर हे पहिले आदिवासी क्लस्टर असल्याने त्याचा विस्तार पुढे खानदेशकडे झाल्यास संंपूर्ण उत्तर महाराष्ट्राला नक्कीच मोठा लाभ होऊ शकतो. नाशिकसह खानदेशचा आदिवासी भाग हा उत्तर महाराष्ट्रातील अन्य पुढारलेल्या तालुक्यांच्या तुलनेत मागस राहिला आहे, ही दरी भरुन काढण्याचा प्रयत्न या निमित्ताने होताना दिसतोय. आदिवासींच्या ज्ञानाला सकारात्मक साद देणारे हे सरकार त्यामुळे सज्ञानी वाटतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.