डॉ. विकास आमटे यांचा अमृत महोत्सवी भव्य सत्कार होणार

आनंदवनात त्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
डॉ. विकास आमटे
डॉ. विकास आमटेsakal
Updated on

अंबाजोगाई : महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या वयाला ७५ वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्त त्यांचा आनंदवन मित्र मंडळ महाराष्ट्र व डॉ. विकास आमटे अमृत महोत्सव सत्कार समितीच्या वतीने आनंदवन येथे येत्या ८ नोव्हेंबर २०२२ रोजी भव्य सत्कार समारंभ आयोजित केल्याची माहिती संयोजक नरेंद्र मेस्री, दगडू लोमटे, शकील पटेल,अजय स्वामी व आयोजन समितीच्या इतर सदस्य यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

आनंदवन म्हटले की पहिली नावे येतात ती बाबा आणि साधनाताईंची ते स्वाभाविकच आहे, कारण या विशाल कुटुंबाचे ते माता-पिताच! पण त्यानंतर आनंदवनवासींच्या हिताचा सांभाळ जागलेपणाने कोणी केला असेल तर तो 'विकासभाऊंनी' हे निर्विवाद ; म्हणजेच डॉ.विकास आमटे यांनी !! दि.२७ ऑक्टोबर २०२२ रोजी विकासभाऊ त्यांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा गाठत आहेत अर्थात त्यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. विकासभाऊंचा हा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करायला आनंदवन मित्र,भारत जोडो साथी आणि आनंदवनाचे हितचिंतक मंगळवार दि.८ नोव्हेंबर २०२२ रोजी आनंदवनात जमत आहो

आनंदवनातील कुष्ठरुग्णांचे डॉक्टर या नात्याने उपचार करत त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणारे, व्यवसाय कौशल्य त्यांना मिळवून देत बाबांचे स्वावलंबनाचे तत्वही अमलात आणले. संस्थेला अन्नधान्ये,भाजीपाला याबरोबर घरबांधणीच्या जोडीने आजच्या गरजा-पाणी व वीज- भागवण्याची कामगिरी आपल्या बांधवांकडून करुन घेतली.छपाई काम, शिवणकाम, फर्निचर निर्मिती, विविध प्रकारच्या कापडाचे उत्पादन, चप्पल व बॅगांची निर्मिती इत्यादी दैनंदिन जीवनातील सगळया गरजा भागवणारा कार्यशाळेचा पसारा उभारला.

इतकेच नव्हे तर आपल्या गरजा पुरवत बाहेरील पुरवठ्याच्या ऑर्डर घेण्याची क्षमताही विकसित केली. ग्रिटींग कार्ड, पोस्टर, लाकडी वस्तू अशा कलाकुसरीच्या गोष्टी तयार करुन आनंदवन निवासींच्या कलेला वाव मिळवून दिला. याचाच पुढचा टप्पा म्हणता येईल असा स्वरानंदवन या नावाने प्रसिद्ध झालेला वाद्यवृंद विकसित करुन तो स्थिरावला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

घरबांधणीमध्ये पर्यावरणस्नेही, कमी खर्चाची पण सर्व सोयीनीयुक्त अशी अर्धवर्तुळाकार छतांच्या घरांची उभारणी याचबरोबरीने आनंदवनाबरोबर संस्थेच्या इतर प्रकल्प उभारणीत योगदान दिले. झरी-जामणी येथे जाऊन तिथल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वत व्यवस्था उभी करुन देऊन शेतीच्या दोन हंगामांची सोय करुन दिली.आणि त्या गावांवर उभारलेल्या पाणी व्यवस्थेची जबाबदारी सोपवली.

बाबांनी काढलेल्या दक्षिण- उत्तर आणि पूर्व -पश्चिम भारत जोडो यात्रांना योग्य पाठिंबा दिला. तशीच बाबांच्या पंजाब शांती यात्रांची काळजी घेतली.बाबा नर्मदा आंदोलनात सहभागी होण्यासाठी बडवानीला गेल्यावर संस्थेची सगळीच जबाबदारी समर्थपणे सांभाळली. याचबरोबर शिक्षणाने डॉक्टर असून अनेक तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या विकासभाऊंचे आश्चर्य वाटते, ते पण इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसताना ! सखोल वाचन, दीर्धकाळ काम करत राहाण्याची वृत्ती व प्रचंड स्मरणशक्ती ही विकासभाऊंची बलस्थाने सर्वानी अनुभवली असणार. संस्था चालवणे म्हणजे जगन्नाचा रथ ओढण्या एवढे कठीण काम, ते करताना भिन्न प्रकृतीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अखंड सुरु आहे.या वाटचालीत आलेल्या अडीअडणींवर तोडगे काढत कान निरंतर चालूच आहे. ते ७५ वर्ष पूर्ण करीत आहेत त्यानिमित्त त्यांचा भव्य सत्कार आयोजित केला आहे.

हा सत्कार समारंभ आनंदवन येथे ८ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मा. विकास सिरपूरकर यांच्या हस्ते व डॉ.प्रकाश आमटे, डॉ. मंदाताई आमटे, डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थित हा समारंभ संपन्न होणार आहे. डॉ. विकास आमटे यांच्या कार्याची व्यापकता लक्षात घेवून त्यांच्यावर गौरव ग्रंथ ही प्रकाशित करण्यात येणार आहे. सोबत संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहून गौरव निधी अर्पण करणार आहेत.

दिवसभर कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. सकाळी ९ वाजता ७५ देशी प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात येईल. १० वाजता सत्काराचा मुख्य कार्यक्रम होईल, दुपारी ३ वाजता आनंदवन मित्र मेळावा आयोजित केला आहे त्यात उपस्थित आनंदवन मित्र आपले मनोगते मांडतील. ५ वाजता आनंदवन निर्मित स्वरानंदवन हा वाद्यवृंद आपली कला सादर करतील तर रात्री गझल गायक भीमराव पांचाळे हे मराठी, हिंदी व उर्दू गझल गायन सादर करतील. अशी माहितीही संयोजक नरेन्द्र मेस्त्री, डॉ. सोमनाथ रोडे, गिरीश कुलकर्णी, दगडू लोमटे, शकील पटेल, अजय स्वामी, अनिकेत लोहिया, दीपक नागरगोजे, गोविंद कासट, भूषण साटम, व

संयोजन समितीच्या इतर सदस्यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून व देशातून आनंदवन मित्र उपस्थित राहणार आहेत. तरी ज्यांना उपस्थित राहायचे आहे अशानी आनंदवनला जरूर यावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.