Blog : सावित्रीबाई आणि जोतिबांचे शिक्षणक्षेत्रातील पुर्वसुरी: स्कॉटिश मिशनरी जॉन आणि मार्गारेट विल्सन

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरु झाला, त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींचे भारतात आगमन झाले.
Blog : सावित्रीबाई आणि जोतिबांचे शिक्षणक्षेत्रातील पुर्वसुरी: स्कॉटिश मिशनरी जॉन आणि मार्गारेट विल्सन
Updated on

कामिल पारखे...

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरु झाला, त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींचे भारतात आगमन झाले. या मिशनरींनी देशाच्या विविध भागांत समाजातील सर्व घटकांसाठी आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात नव्या सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

मुंबईत, कोकणात आणि पुण्यात अमेरिकन मराठी मिशनच्या आणि स्कॉटिश मिशनच्या मिशनरींनी पहिल्यांदाच मुलांमुलींसाठी शाळा सुरु केले आणि देशात नवे युग सुरु झाले. तोपर्यंत अशाप्रकारे शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली गेलेली नव्हती. स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन आणि त्यांच्या पत्नी मार्गारेट विल्सन यांनी भारताच्या शिक्षणक्षेत्रात पायाभूत स्वरूपाचे योगदान केले आहे.

सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या विविध चरित्रांत अमेरीकन मराठी मिशनच्या अहमदनगरच्या सिंथिया फरारबाई त्यांचे नाव हमखास येते. त्याचबरोबर स्कॉटिश मिशनरी जॉन स्टिव्हन्सन, डॉ. जॉन विल्सन, जेम्स मिचेल, मिसेस मार्गारेट शॉ मिचेल, जॉन मरे मिचेल आणि मिसेस मारिया मॅकेन्झी मिचेल यांची नावे विविध संदर्भांत वारंवार येत असतात.

स्कॉटिश मिशनरी सोसायटीने १८२२ साली भारताकडे लक्ष वळवले. त्यावेळी संपूर्ण पश्चिम भारत फक्तसहा मिशनरी होते असे त्या सालच्या सोसायटीच्या अहवालात म्हटले आहे.

या सोसायटीचा पहिला मिशनरी डोनाल्ड मिचेल यांचे भारतात १९२३ च्या जानेवारीत आगमन झाले. त्यापूर्वी डोनाल्ड मिचेल हे ईस्ट इंडिया कंपनीत अधिकारी होते. त्यानंतर मिचेल यांचे वर्षभरातच- दहा महिन्यांतच - निधन झाले. मात्र त्यांच्या निधनापूर्वी इतर चार जण भारतात त्यांना सामील झाले होते.

क्रॉफर्ड, कूपर, जेम्स मिचेल आणि जॉन स्टिव्हन्सन ही त्यांची नावे. ब्रिटिशांनी पेशवाई सत्ता संपवल्यानंतरही भारतात आलेल्या ख्रिस्ती मिशनरींना पुणे शहरात आणि मध्य महाराष्ट्रात येण्यास काही काळ पूर्ण मज्जाव होता.

नरेंद्र चपळगावकर यांनी `सावलीचा शोध’ या पुस्तकात स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन आणि त्याची पत्नी मार्गारेट यांच्या शिक्षणकार्याची माहिती दिली आहे. त्यानुसार ‘’स्कॉटिश मिशनने कोकणात मिशनकार्य सुरु केले होते. डोनाल्ड मिचेल हा मिशनरी रत्नागिरीपाशी असलेल्या बाणकोट येथे १८२३च्या जानेवारीत पोहोचला होता, तेथे मराठी शिकून त्याने तेथे लगेच एक मराठी शाळा काढली.

जेम्स मिचेल आणि अलेक्झांडर क्रॉफर्ड हे स्कॉटिश मिशनरीही तेथे त्याच्या कामात सहभागी झाले. बाणकोट आणि हर्णै येथे स्कॉटिश मिशनचे कार्य चालू होते. सन १८२९ च्या दरम्यान या भागातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांची संख्या ८० पेक्षा जास्त होती, त्यात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीनशेपेक्षा अधिक मुली होत्या.

जॉन आणि मार्गारेट विल्सन यांचे १८२८ ला स्कॉटलंडहून मुंबईत आगमन झाले. त्यावेळी त्यांचा नुकताच विवाह झाला होता. कोकणातील आपला मराठीचा अभ्यास संपवून जॉन आणि मार्गारेट विल्सन १८२९च्या नोव्हेंबरात मुंबईत परतले.

दक्षिण कोकणात लोकसंख्या खूप विरळ असल्याने आणि तिथे जाण्यासाठी प्रवासाची सुलभ साधने नसल्याने स्कॉटिश मिशनरींनी १८२७ साली मुंबईत आपले लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटिश मिशनरींनी आपले कार्य फक्त मुंबई आणि पुण्यात चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोकणातील मिशनकार्य बंद करण्यात आले.

``शाळेत शिकायला एकही मुलगी येणार नाही’ असे मुंबईत आलेल्या स्कॉटिश मिशनरींना सांगण्यात आले होते. मात्र या मिशनरींनी या सांगण्याकडे साफ डे दुर्लक्ष केले. याचा परिणाम म्हणून १३ मार्च १८२४ रोजी मुलांबरोबरच अनेक मुली शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागल्या आणि त्यामुळे मुलींसाठी एक वेगळा वर्ग सुरु करण्याची गरज निर्माण झाली.

सन १८२७ पर्यंत स्कॉटिश मिशनने ८० शाळा सुरु केलेल्या होत्या आणि त्यांत हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत होते. ब्राह्मणांपासून इतर सर्व जातींचे मुलेमुली या शाळांत शिकत होते. केवळ चार स्कॉटिश मिशनरी दूर अंतरावर पसरलेल्या ८० शाळा चालवत होते आणि या सर्व शाळांवर लक्ष ठेवणे कसे शक्य होते.

त्याशिवाय ख्रिस्ती धर्मप्रसार हा या मिशनरींचे मुख्य ध्येय होते आणि त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते. स्कॉटिश मिशनरी सोसायटीने मुंबईत आपले कार्य सुरु केले होते तोपर्यंत मुंबईत एकही ख्रिस्ती धर्मांतर नव्हते. लोकांमध्ये ख्रिस्ती धर्माविषयी अत्यंत प्रतिकूल भावना होत्या. ``स्थानिक लोक बाप्तिस्मा कधी घेणार, धर्मांतर होते का ? असा प्रश्न या मिशनरींना वारंवार त्यांच्या मायदेशातील लोक विचारात होते.

जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हे पुराण सांगणारे ब्राह्मण ख्रिस्ती झाले होते. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिक यांनीं लढवला होता.

``महाराष्ट्रात अमेरिकन मिशन, स्कॉटिश मिशन, लंडन मिशनरी सोसायटी, चर्च मिशनरी सोसायटी इत्यादी अनेक संस्था ख्रिस्ती धर्मप्रचाराचे कार्य करीत होत्या. या सर्व संस्थांचे कार्यकतें एकोप्याने व परस्पर सहकार्याने काम करीत होते. त्यासाठी बॉम्बे मिशनरी युनियन, मुंबई बायबल सोसायटी, बॉम्बे ट्रॅक्ट अॅन्ड बुक सोसायटी, मुंबई टेंपरन्स सोसायटी इत्यादी व्यापक संस्था स्थापन झाल्या होत्या. स्कॉटिश मिशनचे धर्मोपदेशक इ. स. १८२२ मध्ये मुंबई इलाख्यात प्रथम आले. त्यानंतर एकामागून एक जे उपदेशक आले, त्यांत जेम्स मिचेल, जॉन स्टिव्हन्सन, रॉबर्ट नेस्बिट, जॉन विल्सन, मरे मिचेल हे प्रमुख होते. सर्व धर्मोपदेशकांच्या कार्यपद्धतीत एकसूत्रीपणा होता. ज्या प्रदेशात प्रचार करायचा, त्यातील लोकांची भाषा आत्मसात करणे अत्यावश्यक आहे याची त्यांना जाणीव होती. म्हणून येथे आल्यावर अल्पावकाशातच ते मराठी शिकले. इतर कार्यकर्त्यांना ती शिकणे सोपे जावे म्हणून त्यांनी मराठीचे कोश व व्याकरणे रचली. स्टिव्हन्सन, विल्सन, मिचेल यांना अनेक देशी भाषा अवगत होत्या. हिंदूचे धर्मग्रंथ पाहता यावेत म्हणून त्यांनी संस्कृतचाही अभ्यास केला,’’ असे ज्येष्ठ विचारवंत गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे. .

विल्सन यांची पत्नी मार्गारेट या कोकणात हर्णैला असताना स्कॉटिश मिशनने सुरू केलेल्या मुलींच्या शाळांत रस घेऊ लागल्या होत्या. हेच काम मुंबईत सुरु करण्याचे त्यांनी ठरविले. अमेरिकन मराठी मिशनने त्यापूर्वीच मुंबईत मुलींच्या शाळा सुरु केल्या होत्या.

१८२९च्या सप्टेंबरात विल्सन दाम्पत्य मुंबईत आले आणि अंब्रोळीच्या मिशन हाऊसमध्ये त्यांनी शाळा सुरु केली. मुलींना मार्गारेट शिकवत असत, या शाळेत पहिल्या तीन महिन्यातच ५३ मुली शाळेत दाखल झाल्या होत्या. मार्गारेट विल्सन यांनी आपल्या घरातच मुलींची शाळा चालू केली होते, त्यापैकी काही मुली अपंग तर काही अनाथ होत्या.

मार्गारेट विल्सन यांनी २९ मार्च १८३२ रोजी मुंबईत अँब्रोळी मिशन हाऊसमध्ये अँब्रोळी इंग्लिश स्कुल; या नावाने एक इंग्रजी शाळा सुरु केली. या मुलींना शिक्षणाबरोबरच कपडेलत्ते आणि जेवणासाठी थोडीशी रक्कम दिली जाई. मुंबईत राहणाऱ्या अनेक महिलांनी या शाळेला आर्थिक मदत पुरवून आपला पाठिंबा व्यक्त केला,

ही शाळा सुरु झाल्यानंतर तीन वर्षातच यापैकी सात मुली मार्गारेट यांच्या देखरेखीखाली मिशन हाऊसमध्येच राहू लागल्या. भारतातल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिल्यावहिल्या मुलींच्या बोर्डिंगची ही सुरुवात होती.

या शाळेसाठी मार्गारेट दररोज पाच तास देत असत. त्याशिवाय त्या कुलाबा येथे युरोपियन पेन्शरांना भेट द्यायच्या, जॉन विल्सन त्यांच्या साहित्यविषयक कामांत मदत करीत आणि त्याशिवाय काही एतद्देशीय नोकरांना धार्मिक शिक्षण द्यायच्या.

मार्गारेट यांनी पुढील सहा महिन्यांत सहा शाळा मुंबईत सुरु केल्या आणि या शाळांत १२५ मुली शिकत होत्या. या शाळांत सर्वाधिक हिंदू मुली होत्या, पारशी आणि मुस्लिम मुस्लीम मुलीही होत्या. या सहांपैकी एक शाळा आजही सेंट कोलंबा हायस्कुल फॉर गर्ल्स या नावाने प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने मराठी माध्यम होते.

``स्कॉटिश मिशनरी सोसायटीने डॉ. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, पुणे, नाशिक जिल्ह्यांतून आणि कोकण, गोव्यातही मुलींच्या शाळा, मुलीसाठी वसतिगृहे चालू केली. १८३२ मध्ये मुंबई शहरात स्कॉटिश मिशनने चालविलेल्या पाच शाळा एकमेकींशी संलग्न करण्याचे काम मिसेस विल्सन यांनी केले. तेव्हा त्या शाळांत एकंदर १२६९ विद्यार्थी होते. त्यांपैकी १७६ मुली होत्या.

१८३९ सालच्या वार्षिक अहवालातील माहितीनुसार स्कॉटिश मिशनने चालविलेल्या मुंबईतील सर्व शाळांतील मिळून एकंदर ५४७ मुली मराठी माध्यमातून शिकत होत्या. १८२६-१८२७ साली मिशन यांच्या सर्व शाळांत मिळून ३०० होत्या. त्यांची संख्या १८४९-१८५० साली २००० झाली. या मुलीना शाळांत येण्यासाठी पैसे द्यावे लागत. ‘’ असे प्रतिभा रानडे यांनी आपल्या ` स्त्रीप्रश्नांची चर्चा: एकोणिसावे शतक’ या पुस्तकात लिहिले आहे.

विल्सन यांनी २९ मार्च १८३२ रोजी अंब्रोळी इंग्लिश स्कुल सुरु केली. या शाळेची परिक्षा सार्वजनिक रीतीने होई, या शाळेला नंतर कॉलेज डिव्हिजन जोडण्यात आले. या शाळेत इंग्रजी वाचन, व्याकरण, गणित, भूमिती, भूगोल इतिहास बायबल हे विषय शिकवले जात असत.’’

नाजूक प्रकृतीच्या मार्गारेट विल्सन यांच्या आरोग्यावर विपरीत परिमाण झाला आणि काही दिवस आजारी पडल्यानंतर त्यांचे १९ एप्रिल १८३५ला मुंबईतच निधन झाले. मृत्युशय्येवर असताना मार्गारेट यांनी `शक्य असल्यास मुलींच्या शाळेचे कार्य त्यांच्यानंतरही चालू ठेवावे'' अशी कळकळीची विनंती जॉन विल्सन यांना केली. पत्नीच्या या विनंतीने हेलावून गेलेल्या विल्सन यांनी मार्गारेटच्या दोन्ही बहिणींना या कामासाठी भारतात येण्याची विनंती केली.

मार्गारेट यांच्या या दोन्ही बहिणी रूढार्थाने मिशनरी नव्हत्या तरीही त्यांनी विल्सन यांच्या विनंतीला होकार दिला आणि त्या दोघी स्वखर्चाने स्कॉटलंडहून भारतात १८३७ साली आल्या.

मार्गारेट यांच्या दोन भगिनी मुंबईत मिशनकार्यासाठी आल्या या घटनेचा स्कॉटलंडमध्ये मोठा प्रभाव पडला.स्कॉटलंडच्या महिलांनीं भारतातील महिलांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन कॅप्टन सेंट क्लेर जेम्सन यांनी केले. त्या आवाहनास प्रतिसाद म्हणून स्कॉटिश लेडीज असोसिएशन फॉर फिमेल एज्युकेशन इन इंडिया या संस्थेची मार्च १८३७ मध्ये स्थापना झाली.

मिशनरींच्या पत्नींनी स्त्रीशिक्षणासाठी सुरु केलेल्या कामासाठी आर्थिक मदत पुरवणे आणि भारतात पूर्णवेळ कार्य करण्यासाठी स्कॉटलंडहून अविवाहित महिला स्कॉटलँडवरून पाठवणे ही या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट्ये होती.

मिस रीड या पहिल्या मिशनरी महिलेचे १८३८ ला भारत आगमन झाले, मात्र वर्षभरात त्यांचे निधन झाले. मेडल जेलट या दुसऱ्या महिलेने त्यांची जागा घेतली. मात्र कॉलराने त्यांचा लगेचच बळी घेतला. मार्गारेट विल्सन यांची बहीण मिस अँना बेना यांचेसुद्धा १८४१ साली निधन झाले. दुसरी बहीण हे बेना यांचे रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याशी विवाह झाला, त्यांचेही लग्नानंतर काही वर्षातच निधन झाले.

ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी भारतात आलेल्या या मिशनरींचे कार्य मात्र पूर्णतः व्यर्थ गेले नव्हते. बोर्डिंग स्कुलमधल्या सहा मुलींनी १८३८ साली बाप्तिस्मा घेतला आणि त्यानंतर १८४० मध्ये आणखी सहा मुली ख्रिस्ती झाल्या होत्या.

शिक्षणाचे कोणते उद्दिष्ट्य आपल्यासमोर आहे हे स्पष्ट करणारा लेख विल्सन यांनी `ओरिएंटल ख्रिश्चन स्पेक्टेकर'' मध्ये लिहिला. ``मानवसेवा हे ख्रिश्चनांचे प्रमुख कर्तव्य आहे. या सेवेचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ज्ञानदान. सर्वांत चांगले ज्ञान म्हणजे धर्मसत्याचे ज्ञान. त्यानंतरचा क्रम कला आणि विज्ञान यांचा येतो. या ज्ञानालाच उपयुक्त ज्ञान असे आज संबोधले जाते. या ज्ञानाचा प्रसार शक्य होईल तेवढा करणे जे आपले (ख्रिश्चनांचे ) कर्तव्य आहे’’ असे त्यांनी म्हटल्याचे नरेंद्र चपळगावकर यांनी नमूद केले आहे.

धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी यांच्या धर्मांतरांनंतर पारशी लोकांनी आपल्या मुलांना विल्सन यांच्या शाळेतून काढून घेतले आणि ही शाळा काही काळ जवळपास ओस पडली.

जॉन विल्सन यांनी आपली शाळा मुंबईत फोर्ट येथे हलवली आणि जनरल असेम्ब्ली इन्स्टिट्यूट या नावाने ही शाळा प्रसिद्ध झाली. जॉन विल्सन यांनी आपली शाळा मुंबईत फोर्ट येथे हलवली आणि जनरल असेम्ब्ली इन्स्टिट्यूट या नावाने ही शाळा प्रसिद्ध झाली. जॉन विल्सन यांनी मुंबईत फोर्ट येथे उघडलेल्या शाळेत म्हणजे जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूट मध्ये अनेक वर्षे मरे मिचेल आणि रॉबर्ट नेस्बिट हे इतर स्कॉटिश मिशनरीसुद्धा शिकवत असत.

जॉन विल्सन, रॉबर्ट नेस्बिट आणि जॉन मरे मिचेल यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूट या संस्थेच्या आणि शाखांच्या कामांत सतरा वर्षे एकत्रितरित्या मिशनकार्य केले. मुंबईत १८२६ साली कार्य सुरु करणारे नेस्बिट यांचे १८५५ साली निधन झाले आणि या तिघांची ही भागीदारी संपुष्टात आली.

स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती.

या पारशी धर्मांतरीत मुलांना जॉन विल्सन यांनी कोंडून ठेवले आहे आणि त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात यावे अशी विनंती करणारा `हेबीअस कॉपर्स’ ; अर्ज पारशी समाजाच्या वतीने मुंबईतील सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला. या अर्जात जॉन विल्सन यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

कंपनी सरकारच्या अमदानीत भारतात पहिल्यांदा सर्व नागरिकांना समान मानणाऱ्या ब्रिटिश कायद्याचे राज्य सुरू झाले होते. `हेबीअस कॉपर्स’ पेटिशन म्हणजे कोंडून ठेवलय घेणाऱ्या व्यक्तीला न्यायालयासमोर आणले जावे अशी विनंती करणे. या कायद्यानुसार भारतात न्यायालयात आलेले हे बहुधा पहिलेच प्रकरण असावे.

मुंबईत स्कॉटिश मिशनरींच्या प्रभावाने परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात श्रीपत शास्त्रीला उभे करण्यात आले तेव्हा न्यायाधीश एरस्किन पेरी यांनी बारा वर्षाच्या अज्ञान मुलाचे धर्मांतराबाबतचे मत मुळी विचारात घेण्यासारखेच नाही, असे जाहीर केले. हा निवाडा देऊन त्या लहान मुलाला ताबडतोब त्याच्या वडलांकडे सोपवण्याचा आदेश न्यायाधिशांनीं दिला. तेव्हा ``;पण मूर्तिपूजा करण्यास मला का भाग पाडले जात आहे ?’’ त्या मुलाच्या प्रश्नाकडे अर्थात सरळसरळ दुर्लक्ष करण्यात आले आणि नारायण आणि श्रीपत या दोन भावांची अशाप्रकारे ताटातूट झाली.

यापैकी नंतर रेव्हरंड झालेल्या नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले, पुण्यात त्यांनी काम केले आणि नंतर मराठवाड्यात बेथेल हे ख्रिस्ती लोकांचे एक नगरच वसवले. नरेंद्र चपलगावकर यांनी या बेथेल गावावर एक पूर्ण प्रकरणच लिहिले आहे.

नारायणशास्त्री आणि श्रीपतशास्त्री शेषाद्री यांच्या संदर्भांतल्या हेबीअसं कॉपर्स खटल्यात निवड देणाऱ्या न्यायाधीश एरस्किन पेरी यांचे नाव लक्षात ठेवण्यासारखे आहे. काही काळानंतर पुण्यात त्यांची वेगळ्या पदावर नेमणूक झाली होती आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रांत त्यांचे नाव विविध संदर्भांत झळकत असते.

जोतिबा फुले यांचे इंग्रजी शिक्षण स्कॉटिश मिशन शाळेत झाले. दरम्यानच्या काळात जेम्स मिचेल, मरे मिचेल, कँडी, इज्देल, डॉ. जॉन विल्सन (मुंबईतील विल्सन हायस्कूल व विल्सन कॉलेजचे संस्थापक) यांच्याशी त्यांचा बराच संबंध आल्यामुळे ख्रिस्ताने शिकविलेल्या मानवतावादाचा आणि ख्रिस्ती मिशनरींच्या समर्पित जीवनाचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला.

मार्गारेट आणि जॉन विल्सन यांच्या सेवेतून अंब्रोली चर्च, विल्सन कॉलेज, विल्सन हाय स्कूल, सेंट कोलंबा गर्ल्स स्कूल वगैरे शैक्षणिकसंस्था २०० वर्षापूर्वी सुरु झाल्या. पुढील काळात म्हणजे १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. देशातील या पहिल्यावहिल्या विद्यापीठाचे उपकुलगुरूपद हे पद जॉन विल्सन यांना १८६९ साली देऊन शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दाखल घेतली गेली.

भारतात पहिल्यांदाच प्राथमिक शाळा ते उच्च शिक्षण अशी सेवा उपलब्ध करून देऊन शिक्षणक्षेत्रात मोठी मजल मारणाऱ्या रेव्हरंड डॉ. जॉन विल्सन यांना आधुनिक भारतीय शिक्षणक्षेत्रातील पितामह म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.