River Seine : जुलै 2024 मध्ये फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांपूर्वी पॅरिसमधून वाहणाऱ्या प्रसिद्ध व नयनरम्य सिएन नदीला प्रदूषणमुक्त करण्याचा चंग फ्रान्सच्या सरकारने बांधला आहे. पॅरिसकरांसाठी तिला पुन्हा पोहोण्यायोग्य करण्याचा मनोदय पॅरिसमधील महानगरपालिका व केंद्रातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, त्यादिशेने पॅरिस कामाला लागले आहे. क्रीडास्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 दरम्यान होणार आहेत.
हवामानबदल, मानवी व औद्योगिक प्रदूषण, यामुळे जगातील महत्वाच्या नद्या प्रदूषित होत आहेत. तथापि, वॉशिंग्टनमधील पोटोमॅक, बर्लिमधील र्हाइन व युरोपातील डान्यूब व व्लातावा या नद्यांना प्रदूषणमुक्त करण्याचे काम पूर्ण झाले आहे. लंडनमधील थेम्स नदीला प्रदूषणमुक्त करण्याचे काम वेगाने चालू आहे. भारतातील गंगा, यमुना व ब्रह्मपुत्रा या नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी आजवर कोट्यावधी रूपये खर्च करून त्यांतील प्रदूषण घटण्याअयवजी वाढले आहे. इतर नद्यांची अवस्था काय आहे, हे सर्वश्रुत आहे.
नदीच्या अस्तित्वामुळे शहराचे सौदर्य वाढते. त्यातून नौकानयन, जलक्रीडा करता येतात. पण, उत्तरेतील नद्यात ते फारसे होताना दिसत नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गांधीनतर परिसरातील साबरमती नदीच्या परिसराचे सौंदर्यीकरण केले. तसेच, पंतप्रधान झाल्यावर आपला मतदार संघ वाराणसी येथील गंगेचे घाट स्वच्छ करून त्यातील प्रदूषण कमी केले. त्यामुळे गंगेचे आरोग्य काही भागात सुधारले असले, तरी तिचे एकूण प्रदूषण वाढले आहे. दिल्लीतून केवळ 22 कि.मी. वाहणाऱ्या यमुनेचे रूपांतर गटारीतल झाले आहे. गोव्यातील मांडवी व झुआरी नद्यात खाणीतील मॅंगॅनीज ओअरचा साठा वाढल्याने त्यातून बार्जेसची वाहतुक अडचणीत आली आहे. उलट, दक्षिणेत केरळ, तामिळनाडू आदी राज्यातील नद्यात व बॅकवॉटर्समध्ये होणाऱ्या बोटींच्या स्पर्धा पर्यटकांसाठी महत्वाचे आकर्षण ठरल्या आहेत.
पॅरिसमधील सिएन नदीच्या शुद्धिकरण मोहिमेबाबत एप्रिल 2023 मध्ये `टाइम’ या नियतकालिकात सविस्तर लेख प्रसिद्ध झाला असून, त्यापासून भारताला शिकण्यासारखे बरेच काही आहे.
सिएन नदी फ्रानमधील बरगंडी ते नॉर्मंडीपर्यंत 481 मैल पसरली आहे. नॉर्मंडी येथे ती इंग्लिश चॅनेल ला मिळते. इंग्लिश चॅनेल एटलांटिक महासागराचा भाग आहे. रोमन ते मध्ययुगीन काळात या नदीच्या काठावर फ्रान्सची संस्कृती वाढली, व्यापार वाढला, उपनगरे वसली. शहरातून जाणाऱ्या नदीवर काठ बांधून तिचे सौंदर्य वाढविण्यात आले. तिच्या लोकप्रियतेने फ्रान्समधील लिओन व मार्सेलिस नद्यांना मागे टाकले. सिएनच्या तीरावर आयफेल टॉवर, लूव्ह्र व ओरसे संग्रहालये, नॉर्ट डेम कॅथेड्रल, बॅसिलिका ऑफ सॅक्रॅकूर या जग प्रसिद्ध इमारती उभारण्यात आल्या. पॅरिसचे उपमहापौर इमॅन्युएल ग्रेगरी म्हणतात, ``सिएनमुळे तर पॅरिसचा जन्म झाला.’’
तथापि, गेल्या अर्ध शतकात तिचे प्रदूषण वाढत गेले. सिएनला प्रदूषणमुक्त करण्याच्या योजनेवर आता तब्बल 1.5 अब्ज डॉलर्स खर्च होणार असून 2024 च्या वसंत ऋतूत ते कार्य पूर्ण झाल्यास पॅरिसकरांना गेल्या शंभर वर्षात नव्हता, तो कायदेशीररित्या सिएनमध्ये पोहोण्याचा अधिकार मिळेल.
गेल्या काही वर्षात कोपनहेगन (डेन्मार्क), झुरिक (स्वित्झ्रलँड) व म्युनिक (जर्मनी) यातील नद्या पोहोण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. बर्लिनमधील स्प्री नदी व एमस्टरडॅम (हॉलंड) मधील कालवे स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ``सिएऩला स्वच्छ कऱण्याचा प्रकल्प पुरा झाला, की त्यापासून जगातील इतर देश बरेच काही शिकतील,’’ अशी आशा ग्रेगरी यांना वाटते. 2028 मध्ये ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा लॉस एन्जेलिस (अमेरिका) येथे होणार आहेत. हवामानबदलामुळे जागतिक तापमान वाढतेय. 2019 मध्ये उन्हाळ्यात पॅरिसचे तपमान 42.22 डिग्री सेल्सियस (अंशावर ) वर गेले होते. आता तर युरोप, अमेरिकेत सर्वत्र उन्हाची लाट आली असून, ग्रीस व अऩ्य काही देशात वणव्यांचा हाहाःकार माजला आहे.
काही वर्षांपूर्वी आम्ही स्कॅंडिनेव्हिया ( नॉर्वे, स्वीडन व डेनमार्क) या देशांच्या दौऱ्यावर गेलो होतो. युरोपात सर्वत्र हवामान सुसह्य व आल्हाददायक व थंड असते. त्यामुळे या देशात घरातील पंखे लावण्याची पद्धत नाही. परंतु, आम्ही होतो, तेव्हा उन्हाळाही जोरदार असल्याने अन्क वयस्क कुटुंबे केवळ पंखा, एअऱकंडिशनर घरात नाही, म्हणून उन्हाळ्याच्या लाटेनं मरण पावली होती.
ऑलिम्पिकमुळे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, `युनिव्हर्सिटी ऑफ लिमोगेस (पश्चिम फ्रान्स)’ नुसार, देशाला अंदाजे 11.4 अब्ज डॉलर्सचा लाभ होईल. 25 हजार लोकांना रोजगार मिळतील. पॅरिसच्या विद्यमान महापौर श्रीमती एने हिडाल्गो यांच्यानुसार, ``ऑलिंपिकपूर्वी परिसमधील 11 दशलक्ष घरांना पर्यावरणदृष्ट्या सुधारित व सुरक्षित केले जाणार आहे. सिएनवरील मध्य पॅरिसमधील अलेक्झांड्र तृतीय पुलापासून पोहोण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.’’ सिएनच्या दोन्ही बाजूंच्या कठड्यांवर एका वेळी सहा लाख प्रेक्षक बसू शकतात. यावरून, तेथे क्षमतानिर्मितीबाबत चालू असलेल्या तयारीची कल्पना येते. पॅरिसमध्ये असलेल्या सर्वात मोठ्या क्रीडा संकुलाच्या क्षमतेपेक्षा ही संख्या सात पटीने मोठी आहे. सिएन नदीवर बांधण्यात येणाऱ्या पोहोण्याच्या (जलतरण) 26 तलावांचा लाभ पॅरिसकर घेऊ शकतील. सिएनमधून जाणाऱ्या लहान मोठ्या बोटीं व जहाजांचा पोहोणाऱ्यांना त्रास होऊ नये, म्हणून या तलावांना सर्व तर्हेने सुरक्षित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पॅरिसला प्रतिवर्ष 70 लाख पर्यटक भेट देतात.
``हौट्स डी सिएन’’ या स्थानीय सरकारनुसार, नदीच्या प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे, त्यात जाणारे मलमूत्र, औद्योगिक रसायने व कचरा. लोकांनी फेकून दिलेले टीव्ही सेट्स, मोटरसायकल्स आदींच्या कचऱ्याचे प्रतिवर्ष प्रमाण तब्बल 360 टन आहे. यावरून पॅरिसवासियांना शिस्त लावण्याचे व पर्यावरण सुरक्षित करण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज भासणार आहे. दरम्यान, पावसाचे पाणी वाचविण्यासाठी महाकाय रेनवॉटर टँक्स उभारले जातील.
एवढ्या जैय्यत तयारी व अंमलबजावणीने पॅरिसला खऱ्या अर्थाने जगातील स्वप्ननगरीचे स्थान पुन्हा प्राप्त होईल, अशी आशा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.