देवाभाऊंचं पत्र मिळाल्यापासून दादारावांचा पारा चढलेला होता. रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. पहाटे लवकर उठण्याची सवय असल्यामुळे पंचाईत नको म्हणून, रात्री न झोपण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आख्खी रात्र त्यांनी उघड्या डोळ्यांनी विचार करण्यात घालवली. पुन्हा एकदा आजारी पडावं, असंही त्यांना वाटून गेलं. पण हे निर्दयी लोक आजाराचीही खिल्ली उडवतात, म्हणून त्यांनी तो विचार डोक्यातून काढून टाकला. शेवटी वैतागून दादारावांनी देवाभाऊंना उलट टपाली पत्र लिहायला घेतलं.
प्रति,
देवाभाऊ फडफडे,
मुख्यउप की उपमुख्य? तथा सर्वेसर्वा हिंदू पक्ष
नागीनपूर
जय हिंदुराष्ट्र!
आपलं पत्र वाचलं.. हिंदुराष्ट्र निर्मितीच्या या महान यज्ञात आम्ही सामील झालो, त्यास पाच महिने सरले. एवढ्या दिवसात आपली मैत्री वरचेवर घट्ट होत राहिली. आपणही आम्हास जीव लावला, आम्हीही जेव्हा जेव्हा आजारपणातून वेळ मिळाला तेव्हा तेव्हा आपल्याविषयी भलेच विचार केले. आपण अजून मोठं व्हावं, दिल्लीला जावं, सबंध राष्ट्राचा कारभार बघावा... असंच आम्हाला वाटत आलंय.
परंतु आपलं पत्र वाचलं आणि आमची झोप उडाली बघा. आजवर आम्हाला कायम अवहेलना सोसावी लागली आहे. त्यामुळे तुमच्या ज्या शब्दाखातर आम्ही मैत्रीचा हात पुढे केला, तो शब्द अद्याप आपण पाळलेला नाहीये.. आमच्या मनात अन् सहकाऱ्यांमध्ये 'त्या' कारणास्तव अस्वस्थता दाटून आलीय. असं असतानाही आपण किरकोळ कारणावरुन जाहीरपणे आमचे वाभाडे काढावेत, हे आम्हांस पटलेलं नाही.
आम्ही खुद्द आणि आमचे सहकारी तुमच्यालेखी दोषी होतो ना.. आम्हांला तुरुंगात टाकण्याची भाषा तुम्ही पूर्वी करायचे... तरीही घेतलं ना सामावून? मग बिचाऱ्या नबाबांनी काय घोडं मारलंय? त्यांच्याविषयी काय म्हणून एवढा राग? ते बापुडे आम्हाला येऊन बिलगले तर तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण काय? तुम्ही आमच्याबाबतीत असा विचार करु नये, अशी आमच्या सहकाऱ्यांची धारणा आहे.
तुम्हा-आम्हाला काय वाटतं, यापेक्षा मलिकांना काय वाटतं? हे पाहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आमच्या पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आलेले असल्याकारणाने ते आमच्यासोबत राहिले तर बिघडले कुठे? असं तुम्ही बोभाटा करुन पांढरा माळ करणं म्हणजे आमच्या इभ्रतीला हात घातल्यासारखं आहे... असं आमचे सहकारी बोलतात.
तुम्ही आम्हांस दिलेला 'तो' जहागीरदारीचा शब्द कधी पाळता, हे जास्त महत्त्वाचं आहे. बाकी तुमच्या मनासारखं होईल. नबाबांच्या भूमिकासुद्धा कदाचित बदलतील पण तुम्ही, तुमच्या भूमिका आणि दिलेले शब्द विसरु नयेत, असं आस्मादिकांचं ठाम मत आहे. तेव्हा आमच्याही लौकिकाचा विचार करा.. आम्हीही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही.
देवाभाऊ, तुमच्या मनासारखं करण्याशिवाय आज आम्हाला गत्यंतर नाही. परंतु आमचे सवंगडी कमालीचा गोंधळ घालतायत. एकतर जहागिरी नाही अन् तुमची अशी ही दमदाटी.. काय करावं आम्ही? असो, बाहेर आम्ही काहीही बोललो तरी लक्ष देऊ नकात. आम्ही हेही सहन करु. तेवढं फक्त दिलेल्या शब्दाचं ध्यानात असू द्या.
ते दाढीवाले तात्पुरते बॉस काहीही सांगतील, त्यांचं आपण मनावर घेऊ नये. आपण यापेक्षा चांगले मित्र होऊया... पुढे जाऊया. आपली नव्हे नव्हे मुलुखाची प्रगती करुया.
जय हिंदुराष्ट्र! जय जय हिंदुराष्ट्र!!
विश्ववंद्य नमोभाईंचा विजय असो...
आपला
दादाराव दणगटे,
सदैव आशावादी
नियमित उपमंत्री, नागीनपूर
समाप्त!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.