प्रति, नाथाभाई
महोदय,
आम्हांस कळले की, तुमच्या सेनेत कुठल्यातरी जुन्या कलावंतास प्रवेश दिलाय. अहो, आम्ही म्हणतो- जरा चालणारा नट तरी घ्या. तुम्ही ज्या नटासाठी एवढे नटताय, त्यांचा शेवटचा खेळ वाया गेला म्हणे. आता कुठेच काही मिळत नाही म्हणून तुमचे पाय धरले असतील, बाकी काय! तुम्ही आपले मित्र म्हणून तुम्हांस सांगतो बरे.. नाहीतर वाईट वाटून घ्याल!
बरं तुम्हास तरी काय बोलावे. दिल्लीश्वरांची अज्ञा असेल तशी. त्यांची मर्जी तुम्हांस मोडता येईल तर नवल. ते म्हटले उठा की तुम्ही उठता, ते म्हटले बसा की तुम्ही बसता. काय तुमच्या कमरेला विश्रांतीच नाही हो अशात. अहो, किती लोकांना तुमच्या सेनेत घ्याल? अशाने गर्दी नाही का व्हायची? अं? बरं तुम्ही आपले मित्र म्हणून तुम्हांस सांगतो बरे. नाहीतर वाईट वाटून घ्याल!
नाथाभाई, मी काय म्हणतो त्या दिल्लीकरांना एकदाचे ठणकावूनच सांगा बरे- किती लोक घ्यायचेत ती तुमच्या पक्षात घ्या.. आमच्यामागे कशाला म्हणावं नुस्ती तारांबळ. त्यांच्याकडे सोयीचं नाही वाटलं की तुमच्याकडे धाडतात. तुम्ही आपले उठलेच स्वागताला.. काय म्हणावं या फिजितीला! जरा तरी तुमचा जुना बाणा जागा ठेवा.. की दुमडून ठेवला लोखंडी पेटीत? तुम्ही आपले मित्र म्हणून तुम्हांस सांगतो बरे. नाहीतर वाईट वाटून घ्याल!
गोविंद नटाने तुम्हास म्हटल्याचे आम्ही ऐकले. ''तुमचा स्वभाव, कष्टाळू बाणा फार आवडतो, चौदा वर्षे वनवासात राहिलो.. आता रामराज्यात घ्या.'' हे ऐकलं की तर तुम्ही लगेच विरघळलात. आमच्या मनात तर ''खरं की काय'' असेच भाव उमटले होते. पण खरे सांगतो, भोळेसांब आहात नाथाभाई तुम्ही. उद्या तुम्ही 'एकटे-नाथ' व्हाल तेव्हा उघडतील तुमचे डोळे.. तुम्ही आपले मित्र म्हणून तुम्हांस सांगतो बरे. नाहीतर वाईट वाटून घ्याल!
काळजी घ्या.. धन्यवाद!!
आपला
जयवंतराव
प्रति,
जयवंतराव
महोदय,
जयवंतराव, आपण राजकारणात थोरले. कधी-कुठे-कसे-कशासाठी बोलावे हे आपणास चांगलं ठाऊक आहे. तरीही आपण गोविंदरावांच्या बाबतीत जे बोललात, त्यामुळे आम्हांस यातना झाल्या. गोविंदरावदेखील आपल्यासारखेच जुने-जाणते कलावंत आहेत. तरी तुम्ही त्यांचा अवमान केलात, हे आम्हांस जरादेखील पटले नाही.
चालणारा नट अन् न चालणारा नट... असा भेदभाव करणे आपल्यासारख्या ज्येष्ठ 'नटास' शोभले नाही. शेवटी काय हो, सत्तेचा सारीपाट म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही.. तो एक रंगमंच आहे. सध्या रंगमंचावर आम्ही आहोत, आम्ही काय सादर करतो ते जनतेस आवडणे महत्त्वाचे. बाकी काही अपेक्षा असणार आम्हांस?
आपण गोविंदरावांबद्दल जे बोललात, त्यामुळे केवळ आम्हासच नाही तर गोविंदरावांनाही यातना झाल्या. ते म्हटले, 'आमच्या तमाम कलावंतांचा अशा विधानामुळे अपमान झालाय.' मी म्हणतो, खेळ चालला तोच कलावंत.. एखादा खेळ नाही चालला तर तो कलावंत नाही का? तुम्हास याची फळं भोगावी लागतील जयवंतराव!
जयवंतराव, तुम्ही वाईट वाटून घेतलंत तरी हरकत नाही... आता खरी गमंत रंगमंचावरच! नेपथ्य, रंगभूषा, प्रकाशयोजना आणि कथानक तयार आहे.. बघा कसा अभिनय करतो ते! चौदा वर्षे वनवास भोगलेला गोविंद नट रामराज्यात परतला तर तुम्हास त्रास होतो काय? हा प्रभू रामाचा अपमान, रामराज्याचा अपमान, तमाम कलावंतांचा अपमान... अन् आमच्या नमोभाईंचा अपमान आहे. आता तुम्हांस सुट्टी नाही!!
काळजीची गरज आपणास आहे.. धन्यवाद!!
आपला
नाथाभाई
---------------
Santosh Kanade
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.