मागच्या काही दिवसांपासून विरोधकांनी उधार राजेंवर एवढे आरोप केले होते की, आरोपांचा एक मेरु पर्वत आपल्यासमोर उभाय, असं त्यांना वाटू लागलं. तरीही ते शांत राहिले. तसे ते आतून पेटून उठत होते. परंतु वरवर तरी संयम पाळून होते. सगळ्या आरोपांना एकदाच सुरुंग लावून मेरु पर्वताच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या उडवून देऊ, असा त्यांचा प्लॅन. नियोजित आराम वगैरे झाल्यानंतर एके दिवशी त्यांनी बोलभांडेंना फोन फिरवला.
आता बोलभांडे रौत म्हणजे कोण, ते विचारु नका. पत्रकार म्हणू नका, लेखक म्हणू नका, संपादक म्हणू नका, पुढारी म्हणू नका, मुत्सुद्दी म्हणू नका, आक्रमक म्हणू नका, मिश्किल म्हणू नका, मुलाखती घेणारा म्हणू नका, मुलाखती देणारा म्हणू नका... हे सगळे गुण एका भांड्यात उकळून त्याची वाफ जमवून जो अर्क निघेल ना त्याचा परिपाक म्हणजे हे रसायन आहे.
तर मातब्बर-श्री गडाचे अधिपती उधार राजेंनी बोलभांडे रौतांना फोन फिरवला. उत्साहात म्हणाले, ''मला मुलाखत द्यायचीय...''
बोलभांडे तिरकस स्वरात, ''मग द्या ना. चांगली गोष्टय. देशाचे पंतप्रधान कुणाला मुलाखत देत नाहीत.. त्यात तुम्ही देताय म्हणजे थेट पंतप्रधान पदाला गवसणी घालण्यासारखंय ते, कळलं का?''
हे ऐकून उधार राजेंनी जागेवरच उसळी मारली. ''खरं म्हणता? मग बघाच अशी धडाकेबाज मुलाखत देतो, की सगळे कसे ठार-महाठार झाले पाहिजेत... शेवटी आम्ही ठार-करे..ठाकूर आहोत. आहोतच!!''
इतर ठिकाणी बोलभांडे कितीही रागीट, हजरजबाबी अन् फटकळ असले तरी इथे त्यांच्या सहनशक्तीचा 'समीर चौगुले' झाल्याशिवाय राहात नाही.
उसणं आवसन आणून, ''वावाSS वावाSSS... काय कोटी केलीय? बहोत खूब..बहोत खूब... कधी देताय मुलाखत? कुठल्या चॅनेलला?''
उधारराजेंचा उत्साह शिगेला पोहोचलेला, ''कधी अन् कुठे काय विचारताय? आपल्याच चॅनेलला.. आज-आत्ता-ताबडतोब! चला घ्या आमची मुलाखत''
बोलभांडेंनी कपाळावर हात मारुन घेतला होता. असल्या सतराशे साठ मुलाखती देणाऱ्याला ह्या यत्किंचित मुलाखतीचं कोण कौतुक? तरीही सहनशीलतेची गोळी खाऊन बोलभांडे रौत मुलाखत घ्यायला निघालेच.
पहिला प्रश्नः तुमच्या सरकारमध्ये तुमचं उपखातं सांभाळणारे दादाराव दणगटे आता सत्तापक्षात जावून सामील झालेले आहेत. त्यांच्यावर विश्वाच्या बलाढ्य नेत्याने चारच दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांच्याच आश्रयाला ते गेलेत. काय सांगाल दादाराव खरंच भ्रष्टाचारी आहेत का?
बोलभांडे रौतांमधला संपादक जागा झाला म्हणा किंवा त्यांना मुलाखत गुंडाळायची होती म्हणा.. किंवा काय असेल ते. पण त्यांनी उधार राजेंची चांगलीच अडचण केली.
उधारराजे गोंधळून गेले होते. टोकाचा राग आला होता पण कॅमेऱ्यासमोर दाखवता येईना. कदाचित मुलाखत खरी खरी वाटावी म्हणून बोलभांडेंनी ही 'खेळी' केली असावी, असं त्यांना वाटलं. पण अडचण झाली हे खरं होतं.
उधारराजे वैताग लपवून बोलले, ''त्यांचं मला माहिती नाही. पण गद्दार, खोके, लाचार, खंजिर खुपश्या लोकांना काय वाटतंय, हे विचारलं पाहिजे.''
प्रश्न दुसराः विरोधी विचारांसोबत गेल्यामुळे तुमचे जुने मित्र तुमच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करतात? आणि घराणेशाही जपण्यासाठी ही सगळी उठाठेव चाललीय असं म्हणतात...
रागाच्या भरात उधारराजे जागचे उठणारच होते पण जरा संयम पाळला, ''अहो, धोतर सोडलं जातं, हिंदुत्व कसं सोडणार? घराणेशाहीबद्दल म्हणाल तर आहे घराणेशाही. हा देश हेच माझं घर आहे. पण तुम्ही गद्दार, खोके, खंजीर, लाचार, नामर्द अन् बाप पळवणाऱ्या टोळीला हे सगळं विचारा ना?''
आता बोलभांडे तिसरा प्रश्न विचारणार तोच उधार राजे उसळले, ''बस्स! बास करा. हेच दोन प्रश्न दोन भागात दाखवा. विषय संपवा.
बोलभांडे खूश होत, ''हो पण. असं नाही चालणार. अख्खा देश तुमच्या शब्दफुलांना वेचण्यासाठी आतुरलाय. बोललं पाहिजे तुम्ही..बोला बोला, बोला राजे-''
उधारराजे पुन्हा चमकले, ''बरं बरं.. एवढं म्हणताय तर बोलतो. पण आता आजिबात प्रश्न विचारु नका. मी माझं आधी सगळं बोलून घेतो. त्यानंतर तुम्ही तुमचे प्रश्न वेगळे रेकॉर्ड करा. एडिटिंगमध्ये प्रश्न-उत्तर, प्रश्न-उत्तर असं जोडून घ्या''
''वाह! काय आयडिया सुचलीय... आता मुलाखत धमाकेदार होणार. देश वाट बघतोय देश.. बरं का-''
तेवढ्यात उधारराजेंनी आपलं आपणच बोलायला सुरुवात केली. ''गद्दार, खोके, लाचार, नामर्द, खंजीर, टोळी, टोळधाड, ठाकूर, ठाकूरी बाणा, औलादी, हिंदुत्व, खरं हिंदुत्व, खोटं हिंदुत्व, अब्दाली बादशहा, समान नागरी कायदा हवाय, समान नागरी कायदा नकोय...''
बोलभांडे रौतांनी कृतकृत्य झाल्याचे भाव चेहऱ्यावर आणले आणि पेटून उठल्यासारखं करत खुर्चीवरुन उठले... ''राजे, यावं आता! पुढची जबाबदारी ह्या रौताच्या खांद्यावर सोपवा'' असं म्हणून बोलभांडे एडिटिंग रुममध्ये गडप झाले...
मागील सर्व 'गोफण' आर्टिकल्सच्या लिंक खाली दिलेल्या आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.