गोफण | खरं सांगा, राजीनाम्याची आयडिया कुणाची होती?

Gofan Article sakal
Gofan Article sakalesakal
Updated on

कोर्टाचा निकाल येणार म्हणून 'मातब्बर-श्री' गडाचे नेते 'उधारराजे गडगडाटे' हुरळून गेले होते. भल्या पहाटे उठून शुर्चिभूत झाले. गंध-पावडर, झकपक भगवा पोशाख नेसून राजे सज्ज. हातात रिमोट घेऊन तलवार असल्याचा आव आणत खुर्चीत बसले.

तेवढ्यात बोलभांडे रौतांचं आगमन झालं. बोलभांडे रौत म्हणजे तसा दिग्गज लेखनिक पण भांडायला उठला तर कुणाचीच खैर नाही. त्यामुळे सध्या गडावर त्यांची चलती. कधी कधी ते साक्षात् उधारराजेंपेक्षा मोठे झाले की काय? असं वाटायला लागतं. पण राजेंचाही नाईलाज असतो.

आज निकाल येणार म्हणून बोलभांडे रौत 'मातब्बर-श्री' गडावर दाखल झाले. पण त्यांच्या चेहऱ्यावर जराही उत्सुकता वा भीती नव्हती. चेहऱ्यावरची मिजास जराही कमी न होऊ देता त्यांनी उधारराजेंकडे एक कटाक्ष टाकला. म्हणाले, 'कशाला घाबरता तुम्ही. मी सांगतो ना, निकाल आपल्याच बाजूने..सरकार पडणार म्हणजे पडणार. बरंका...'

तेवढ्यात टीव्हीवर निकालाला सुरुवात झाली होती. एकेक मुद्दा पुढे येत होता. प्रत्येक मुद्द्यावर उधारराजे टाळ्या बडवत होते. 'वाहवा..वाहवाSS ये हुई न बात.. अब आयेगा मजा.. पन्नास खोकेSS' अशी आरोळीच त्यांनी ठोकली. फोन उचलला आणि ढोलपथक, झांजपथक बोलवा... साखर वाटायला हत्तीची सोय करा, असं फर्मान सोडलं. तिकडे त्यांचं फोनवर बोलणं सुरु असतांना इकडे निकालाच शेवटचा भाग आला होता. बोलभांडे गंभीर झाले, चेहरा पांढराफटक् पडला.

'काय झालं? तुम्हाला आनंद नाही झाला? हे असलं रडकं तोंड घेऊन इथं बसू नका.. चालते व्हा!' उधार राजेंना संताप अनावर झाला होता.

बोलभांडे बोलायला लागले, 'तसं नाही राजे, पण तुम्ही नीट ऐकलं का? सरकार पडणार नाही म्हणतायत...'

'काय? सरकार पडणार नाही!! कोण म्हणतं सरकार पडणार नाही? सरकार पडणार म्हंजे पडणार! ते गोगलगायीवाले रडतील आता.. बगा कसे बोगस निघाले.. अन् ते भाज्यपाल तेही असेच. बसला की नाही झटका. (खुर्चीत टुनूक उडी मारली)'

उधार राजेंनी अर्धवट निकाल सांगितला. पण बोलभांडेंना सगळं कळलं होतं. बोलभांडे बोलते झाले- 'तुम्ही राजीनामा दिला ती चूक झाले राजे चूक झाली... तुमचं सगळं खरंय पण सरकार पडणार नाही, हे ध्यानात घ्या. तसं थेट सांगितलंय न्यायाधीश महाराजांनी'

उधार राजेंच्या चेहऱ्यावरचे सगळे रंग उडाले होते. काय करावं काही सुचत नव्हतं. मुळात निकाल आपल्या बाजूने असतो किंवा त्यांच्या बाजूने असतो. हे मधल्या मध्ये लागलेला निकाल त्यांना मान्य नव्हता. काहीच लक्षात येत नव्हतं. तरीही त्यांनी लक्षात आल्याचा आव आणला.

उधारे राजे चिरडीला येत बोलू लागले, 'असं कसं झालं. धड हेही नाही अन् धड तेही नाही. मॅच टाय झाला की काय?'

बोलभांडे रौत मोठ्या आवाजात म्हणाले, 'तुमची चूक झाली तुमची. आता कशाला चिडताय... बहुमतात निवडीत काहीही झालं असतं. पण तुम्ही राजेशाही गाजवली अन् दिला राजीनामा. आता डोक्याला हात लावायला वेळ आलीय तुमच्यामुळे-'

'खामोश!' उधार राजे खऱ्याखुऱ्या रागात होते. 'आम्हांला शिकवू नका.. लाथ मारतो आम्ही असल्या सत्तेला. सत्तेसाठी जन्म नाही झाला आमचा. आम्ही फक्त वचन दिलं होतं सेनेचा सेनापती करु म्हणून. झालं आता ते.'

उधार राजेंचा सावरुन नेण्याचा मुद्दा बोलभांडेंना काही पटला नाही. 'मग कशाला एवढी उठाठेव करताय. आपलं घरात बसलेलं कधीही चांगलंच की. कोरोनात नाही का तुम्ही घरातच होते-'

उधार राजेंनी तेवढ्याच जोमाने पलटवार केला.. 'गप्प बसा! मला एक सांगा. राजीनामा देण्याची आयडिया कुणाची होती? कुणी माझ्या डोक्यात तेव्हा भरवलं होतं? तुम्हीच ना?'

पारध्याच्या जाळ्यात अडकावं तसं बोलभांडे अडकले होते. 'त..त..ते..मी-मी..ना-नाही. तो मी नव्हे!'

'तुम्हीचे ते!! आम्ही निघालो होतो विधानगडी. परंतु तुम्ही रोखलं. तोंड खाली घालून येण्यापेक्षा न गेलेलं बरं, असं तुम्हीच बोलला होता. आठवतंय का? की माझ्या पद्धतीने सांगू-'

आता बोलभांडे पुरते नामोहरम झाले, 'नाही म्हणजे नको. तु्म्ही तुमच्या मनाने-नाही नाही.. दुसऱ्या कुणाचं तरी ऐकून'

'बस्स! त-त..प-प. काय ते खरं बोला? की तुम्हाला दुसऱ्या कुणीतरी सल्ला दिला होता काय? सत्तेचा सारीपाट मांडतांना तुम्ही रात्रंदिवस ज्यांच्या मांडीवर बसून राजकारणाचे डोस घेतले. त्यांनीच तर हे-'

'काही आठवत नाही राजे.. खरंच सांगतो. मी सगळं विसरलो. तुरुंगात गेल्यापासून मला मागचं काहीच आठवत नाही. आता माझं पोट दुखायलंय-खुपच. बापरेSS जातो आता'

असं म्हणून बोलभांडे रौतांनी तिथून काढता पाय घेतला. इकडे उधार राजे राजीनाम्यावरुन आणि गोंधळात टाकणाऱ्या निकालावरुन पुरते हैराण झाले होते. काही कार्यकर्त्यांनी ढोल बडवायला सुरुवात केली होती. पण त्यांनी खिडकीतून त्यांना तांब्या फेकून मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.