जिंकूनही हरले... हरूनही जिंकले ! 

gram panchayat election story by ravindra mangave
gram panchayat election story by ravindra mangave

डकवर्थ लुईस नियम किती विचित्र परिस्थिती निर्माण करू शकतो, हे सर्वश्रुत आहे. यात जिंकण्याच्या स्थितीत असणाऱ्या संघालाच नियमाचा फटका बसून त्याचा पराभव होतो. अशीच काहीशी परिस्थिती राजकारणाच्या मैदानावरही अनुभवास आली आहे. निवडणुकीत एकेक मताने जय-पराजय, समान मते पडल्याने टॉसद्वारे हार-जीत झाल्याच्या घटना सर्रास घडतात. पण, कर्नाटकात ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकल्यावरही चक्क पराभूत होण्याची वेळ उमेदवारावर आली. 
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्‍यातील या घटनेने कायद्याच्या नियमाचा फटका बसला. तोलगी (ता. खानापूर) येथे एका प्रभागात सामान्य व सामान्य महिला अशा दोन जागांसाठी निवडणूक झाली. सामान्य जागेसाठी ३२३ मते घेऊन ए. ए. पाटील हे विजयी होते; तर सामान्य महिला जागेत सरिता चवन्नवर आणि संगीता अदृशप्पा धोंडप्पन्नावर यांच्यात लढत झाली. त्यात सरिता यांना ३४४ मते मिळाली; तर संगीता यांना ३४२ मते मिळाली. यात सरिता विजयी झाल्या. 

महिलेच्या जागेवरील पराभूत संगीता यांना सामान्य गटातील विजयी पुरुष उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाल्याने त्यांना सामान्य जागेवर विजयी घोषित करण्यात आले. यामुळे सामान्य उमेदवाराला विजयी असूनही पराभूत म्हणून बाहेर पडावे लागले; तर राखीव जागेवर लढणारी महिला उमेदवार सामान्य जागेवर निवडली गेली. इतर निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने मतदान होते. त्यात असा प्रसंग घडल्याने सामान्य कोट्यातून जिंकलेल्या उमेदवाराची पुरती निराशा झाली. त्या प्रभागातील पॅनेलप्रमुख असून, जिंकल्यानंतरही पराभव त्यांच्या जिव्हारी नक्कीच लागला.

 कर्नाटकातील पंचायत राज कायद्यातील तरतुदीनुसार हे सारे घडले आहे. २०१५ पासून या कायद्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न झाला. पण, तो अद्याप कायम आहे. काँग्रेस सरकारच्या काळात तत्कालीन पंचायत राज मंत्री एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या कायद्यावर फेरविचार करून निर्णय घेण्यासाठी बैठकही झाली. पण, त्याला यश आलेले नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांना त्याचा फटका बसत आहे. 

एका प्रभागात सामान्य आरक्षित एका जागेसाठी दोन व राखीव महिला आरक्षित एका जागेसाठी दोघे रिंगणात असल्यास त्यातील दोन्ही गटांतील एकेक उमेदवार विजयी होण्याचे सूत्र काही नवे नाही. पण, येथे सामान्य गटाच्या विजयी उमेदवारापेक्षा राखीव गटातील पराभूत उमेदवाराने अधिक मते घेतल्यास सामान्य उमेदवाराऐवजी राखीव उमेदवार विजयी ठरतो. 


नेमका काय प्रकार?

कर्नाटकातील पंचायत राज कायद्यातील तरतुदीनुसार त्या-त्या प्रभागात आरक्षणानुसार निकाल घोषित केले जातात. सर्वांत शेवटी सामान्य उमेदवाराचा निकाल जाहीर केला जातो. तो निकाल जाहीर करताना सर्वाधिक मते घेणारा उमेदवार विजयी ठरतो. त्यामुळे त्या सामान्य उमेदवारापेक्षा राखीव जागांमधील कोणा उमेदवाराने अधिक मते घेतल्यास तो विजयी ठरतो; तर सामान्य जागेच्या स्पर्धेत जिंकलेला उमेदवार पराभूत ठरतो.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.