-अमोल शिंदे
भारत हा तसा व्यक्तिपूजक देश आहे. तसेच कमालीचा व्यक्तिद्वेषही येथे केला जातो. विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीला वरील दोन्ही गटात बसवले जाऊ शकते, हे विशेष. याचे अनेक मूर्तिमंत उदाहरणं आपल्याकडे आहेत. ज्या देशाचा धर्म हा क्रिकेट आहे, त्या देशातील क्रिकेटर तरी याला कसे अपवाद ठरू शकतात.
अजित वाडेकर, सुनिल गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांनी भारतीय क्रिकेटचे एक एक सोनेरी पान लिहिले. ह्या सर्व खेळाडूंनी स्वतःच्या मेहनतीने व कामगिरीने इतिहास घडवून भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेले. त्यात अजून एक नाव जोडले गेले, ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी. फक्त त्यांच्यात एक फरक होता की इतर खेळाडू मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, चंदीगडसारख्या वर्षानुवर्षे क्रिकेट रुजलेल्या शहरात घडले. रांचीसारख्या एका छोट्या शहरातील पंप ऑपरेटरच्या घरी जन्माला आलेल्या धोनीने क्रिकेटच्या भव्य संस्कृतीच्या पाळण्यात जन्म घेतला नाही. छोट्या शहरातील आधुनिक सुविधांचा अभाव, टर्फवर खेळायला न मिळणे, महागडे आधुनिक तंत्रज्ञान व कोचेस यांची कमी व टेनिस बॉल क्रिकेटवर खेळणे हाच एक पर्याय असल्यामुळे छोट्या शहरातील खेळाडूंची जडणघडण ही मेट्रो सिटीत घडणाऱ्या खेळाडूंप्रमाणे होत नाही. त्यामुळे धोनीलाही एक क्रिकेटर म्हणून घडतांना अनेक अडचणी आल्या. शालेय जीवनात अपघाताने क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यावर किशोरवयीन काळापर्यंत अगदी तंत्रशुद्ध खेळाडू प्रमाणे त्याची जडणघडण झाली नाही. त्यामुळे रांचीच्या धोनीच्या खेळात मुंबईच्या बॅट्समनसारखे सोफिस्टीकेशन किंवा नजाकत नव्हती. तो अगदी रॉ स्टाइलमध्ये फटके मारायचा. पण क्रिकेटमध्ये शेवटी रिझल्ट महत्वाचा असतो. ते देण्यात मात्र धोनी कधीच कमी पडला नाही.
रांचीसारख्या एका छोट्या शहरातील पंप ऑपरेटरचा मुलगा मोठी स्वप्नं पाहू शकत नाही किंवा क्रिकेटची बॅट शेजारी ठेवून झोपत नाही. शालेय जीवनात अपघाताने क्रिकेट खेळायला लागल्यावर किशोरवयीन काळापर्यंत अगदी तंत्रशुद्ध खेळाडू प्रमाणे त्याची कधी जडणघडण झाली नाही. छोट्या शहरातील आधुनिक सुविधांचा अभाव, टर्फवर खेळायला न मिळणे, महागडे आधुनिक तंत्रज्ञान व कोचेस यांची कमी व टेनिस बॉल क्रिकेटवर खेळणे हाच एक पर्याय असल्यामुळे छोट्या शहरातील खेळाडूंची जडणघडण ही मुंबई, दिल्ली, बेंगलुरु, कोलकाता, चेन्नई इ. मोठ्या व आधुनिक ठिकाणी घडणाऱ्या खेळाडूंप्रमाणे होत नाही. याचे शालेय कोच केशव बॅनर्जी यांनी त्याची क्षमता ओळखून त्याला टेक्स्टबुक क्रिकेटऐवजी आपला स्वाभाविक खेळ खेळायला सांगितले. क्रिकेटच्या पुस्तकातील कोणतेही परंपरागत शॉट्स शिक म्हणून अट्टहास केला नाही. हा खेळाडू या कोचनेच घडवला कारण त्याने त्याला परंपरेच्या चौकटीत कधी अडकू दिले नाही.
हा खेळाडू पुढे आपल्या रॉ हिटिंगमुळे विख्यात झाला. व भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न पाहू लागला. ही तर खरी सुरवात होती. कारण आपली स्वप्नं तुटतांना व इतरांनी ते तोडतांना तो रोज पाहत होता. पण सर्व अडथळ्यांवर मात करत त्याने भारतीय संघात मिळवले. त्यामागची जिद्द, मेहनत, संयम व नेव्हर से डाय एटीट्यूड हा विस्मयकारक व प्रेरणादायी आहे.
तो संघात आला तेव्हा त्याच्या आक्रमक खेळाचा संपूर्ण देश चाहता झाला. अबालवृद्धांमध्ये त्याच्या नावाची, धडाकेबाज बॅटिंग स्टाईलची व हेअर स्टाइलची चर्चा होती. त्याच्या सुरवातीच्या काळात राहुल द्रविड म्हणाला होता की इतर नवोदित खेळाडूंप्रमाणे याला काय करावे, तुझा संघात रोल काय आहे व त्याच्यावर कोणती जबाबदारी आहे, हे त्याला सांगावे लागत नव्हते. त्याला आपली भूमिका व जबाबदारी चांगली माहीत होती.
तत्कालीन कोच ग्रेग चॅपेल त्याच्याबद्दल म्हणाले की याची विचार करायची पद्धत सामान्य माणसाच्या समजण्यापलीकडे होती. २००५ साली जयपूरला श्रीलंकेविरुद्ध भारत २९९ धावांचा पाठलग करण्याआधी तो मला म्हणाला होता की मला फक्त भारताचे पहिले १३ चेंडू बघू द्या, मी हा सामना जिंकवून देईल. भारताच्या इनिंग्समध्ये फक्त पाचव्या चेंडूवर सचिन बाद झाल्यावर त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन एकहाती हा सामना जिंकवून दिला होता. त्याच्या अविस्मरणीय नाबाद १८३ धावांच्या खेळीमुळे त्याला संपूर्ण भारताने डोक्यावर घेतले होते.
सुरवातीच्या काळात पहिल्याच प्रदीर्घ मुलाखतीत त्याने सर्वांची मनं जिंकली होती. 'कंट्रोल दी कंट्रोलबल्स', 'इट्स ऑल अबाउट दी प्रोसेस' अशा इतरांप्रमाणे मोठमोठ्या फ्रेजेस न वापरता अगदी स्पष्टवक्तेपणे व प्रामाणिकपणे त्याने अगदी परिपक्व अनुभवी खेळाडूप्रमाणे मुलाखत दिली होती. मुलाखतकार अजूनही त्या मुलाखतीबद्दल आपल्या आठवणी सांगतात. तो अजूनही आयपीएलमध्ये त्याचा संघ जिंकल्यावर अथवा हारल्यावर अगदी सहजपणे मीडियाच्या सामोरी जातो. संघाच्या पराभवानंतर बॅटिंग, बॉलिंग किंवा फिल्डिंग डिपार्टमेंटकडे बोटं दाखवून पळ काढण्यापेक्षा तो हारण्याची जबाबदारी स्वतः मोठ्या मनाने स्विकारतो. माणसाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात. त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपल्या हातात असते. २००७ला विश्वचषकात भारतीय संघ पहिल्याच फेरीत बाहेर पडल्यावर याच्या घरावर दगडफेक झाली. याला जमावाचा रोष पाहून घरी जाता आले नाही. त्याच साली त्याच्या कप्तानीखाली भारताने प्रथम टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकण्याचा बहुमान मिळवला. यानंतर त्याच्या आगमनावेळी त्याच्या घराजवळ प्रशंसकांची एवढी गर्दी झाली की त्याला घरी न जाता हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला. भारतातील प्रेक्षकांच्या या एकाच व्यक्तीबद्दल परिस्थितीनुसार टोकाच्या प्रतिक्रिया होत्या. तेव्हापासून त्याने आयुष्यात मनाशी एक पक्की गाठ बांधली की अपयशाने खचून जायचे नाही व यशाची हवा किंवा लोकांची प्रशंसा कधीच डोक्यात जाऊ द्यायची नाही. कोणत्याही परिस्थितीत एवढे संयमी कसे राहायचे याचा त्याने जगाला आदर्श घालून दिला. सतत दहा वर्षे भारतीय संघाचा कप्तान म्हणून सव्वाशे करोड भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे वाहणे ही सोपी गोष्ट नव्हती, जी क्रिकेटच्या देवालाही जमली नाही.
"You don't play for the crowd. You play for the country."
-MS Dhoni
चॅम्पियन्स ट्रॉफी २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध फक्त १२६ धावा चेस करत असताना त्याने मोठा फटका मारायच्या नादात आपली विकेट सोडली व फॉर्मशी झगडत असलेल्या सुरेश रैनाला एक्सपोज केले, जो खातेही न उघडता तंबूत परतला. भारत शेवटी तो सामना जिंकला खरा पण सामना संपवून येण्याचे महत्व काय असते हे त्याने तेव्हा जाणले. हाच भारतीय क्रिकेट मधील सर्वात मोठा संक्रमणाचा काळ होता. भारतीय क्रिकेटमध्ये एका ॲग्रेसिव्ह युवा फलंदाज म्हणून ओळखला जाणारा तो अचानक भारताचा मोस्ट डिपेंडेबल अँड रिलाएबल फिनिशर बनला. त्याने स्वतः शेवटपर्यंत किल्ला लढवून जिंकवून दिलेल्या सामान्यांची यादी आजही वाढत आहे.
क्रिकेटच्या इतिहासातील खेळाडूच्या शैलीतील हा एवढा प्रभावी कायापलट दुर्मिळच होता. या शैलीमुळेच तो लगेच आयसीसी वनडे बॅटिंगमुळे रँकिंगमध्ये प्रथम स्थानावर पोहचला. सोबत त्याने कर्णधार असतांना भारताला कसोटी, वनडे व टी-ट्वेंटी रँकिंगमध्येही अव्वल स्थानावर पोहचवले. मला वाटते स्वतःला काळानुसार कसे बदलायचे ह्या गोष्टीचा हा उत्तम नमुना आहे.
त्याने पूर्ण करिअरमध्ये विकेटकिपिंगवर विशेष लक्ष देण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस ही फक्त २०१० ला घेतली होती. त्यानंतर आजवर त्याने यष्टीमागे दाखवलेली नेत्रदिपक कामगिरी ही थक्क करणारी आहे. टी-ट्वेन्टी विश्वचषकात बांग्लादेशविरुद्ध हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर शेवटच्या चेंडूवरील रनआउट असो की रॉज टेलरला स्टंपकडे न बघता थ्रो करून केलेला धावबाद, स्पिनरच्या बॉलिंगवर स्लीप नसतांना बॅट्समनने फाईन कट केल्यावर स्वतः पाय लांबवून रोखलेले चौकार असो वा लाइटनिंग फास्ट स्टंपिंग, तो विकेटकिपिंग या शास्त्रातील शास्त्रज्ञ आहे.
आपला सीनियर सौरव गांगुलीला त्याच्या शेवटच्या सामन्यात याने आदरपूर्वक सन्मान म्हणून स्वतःची कप्तानी काही काळासाठी हस्तांतरित केली. हॉटेलमध्ये लागेल तेवढेच ऑर्डर करायचे आणि अन्न वाया जाऊ द्यायचे नाही, याची खबरदारी तो सहकाऱ्यांना घ्यायला लावतो. एका लढाऊ विमानांचे अनुभव असणाऱ्या जाणकाराने याला लढाऊ विमानांच्या ज्ञानाबद्दल दहापैकी नऊ गुण दिले होते. रोहित शर्मा म्हणाला की मी मुंबई इंडियन्सचा कप्तान असल्यावर एखाद्या खेळाडूला "आज तू सामन्यात खेळणार नाहीये" असे सांगणे मला खूप कठीण गोष्ट वाटते, पण धोनी ही गोष्ट एवढ्या वर्षांपासून कसा करत असावा?
आजही तो मीडियाच्या विळख्यात कधी सापडत नाही.
२०१५ चा विश्वचषक ऑस्ट्रेलियात चालू असतांना त्याच्या मुलीचा जन्म झाला. त्याने विश्वचषकामुळे तब्बल दीड महिना आपल्या जन्माला आलेल्या मुलीचा चेहरा पाहिला नाही व मीडियाने त्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, "मी नॅशनल ड्यूटीवर आहे बाकी सर्व काही थांबू शकते." तो आपल्या बायकोला सांगतो की माझ्या आयुष्यात देश व पालक यांच्यानंतर तुझे स्थान आहे.
"I tell my wife she is only the third most important thing after my country and my parents, in that order."
संपूर्ण क्रिकेट जगतात सर्वात अचुकरित्या डीआरएस वापरण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नाही. त्यामुळे समालोचक व प्रेक्षकांकडून डीआरएसचे नामकरणच 'धोनी रिव्ह्यू सिस्टिम' असे केले जाते. त्याचा जेम्स फॉल्कनरला मारलेला युनिक असा हेलीकॉप्टर शॉट हा स्टेडियम बाहेर जाऊन पडतो. त्याचा क्रिकेटिंग ब्रेन हा खूप डेवलप झालाय. तो इर्रेगुलर लेग स्लीप ठेवून विकेट घेतो. मिड ऑफ, लॉंग ऑफ बॉलरच्या अगदी मागे ठेवून फलंदाजाला आपल्या जाळ्यात फसवून विकेट्स घेतो. तो रविंद्र जडेजाला २०१० टी-ट्वेंटी वर्ल्डकपच्या साधारण कामगिरीनंतरही सर्वांचा रोष सहन करत टेस्ट प्लेयर म्हणून भारतीय संघात संधी देतो, जो पुढे आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल बॉलर म्हणून स्थान मिळवतो. विस्डेननेही जडेजाला २१व्या शतकातील जगातील दोन नंबरचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून घोषित केले. त्याची चाळीशीनंतर असलेली फिटनेस व रनिंग बिट्वीन दी विकेट्स यावर काय बोलावे. कितीही मोठा सामना असो, तो निश्चिंत राहतो व सामन्याच्या फक्त दोन तास आधी त्याचा क्रिकेटिंग ब्रेन एक्टिवेट होतो.
"For me, opposition is just another opposition."
क्रिकेट गेम हा लॅपटॉप समोर तासनतास विश्लेषण करत व नवीन स्ट्रेटेजी बनवत खेळायला तुला आवडत नाही. तुझे कॅल्कुलेशन्स हे मैदानावर सुरु होतात.
"I never allow myself to be pressured.
I don't study cricket too much. Whatever I have learned or experienced is through cricket I've played on the field, and whatever little I have watched. I love to be in the moment. I love to analyse things a bit."
कोणतीही सीरीज जिंकल्यावर आपल्या हातातली ट्रॉफी लगेच नवोदित खेळाडूच्या हातात सोपवून तो कडेला जाऊन उभा राहयचा. नवोदित रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा, अश्विन, शमी या पोरांच्या डोक्यावर तुझा परिसरूपी हाथ पडला आणि त्यांनी अख्ख्या जगाचं सोनंच लूटलं. सामना गमावल्यावर, स्वतःची विकेट गेल्यावर, सिरीज हारल्यावर, आपल्या बॉलरला मार पडल्यावर तू कधी मैदानावर किंवा मैदानाबाहेर संताप व्यक्त केला नाही, शिवीगाळ केली नाही किंवा कोणाला वैयक्तिक दोष दिला नाही. त्याला कधी शांत राहायचं व कधी आक्रमक व्हायचं हे चांगलं माहीत होतं. टेस्टची रिटायरमेंट अनाऊंस करण्याआधी रात्री १ वाजता तू रैनाला हॉटेलरूम मध्ये बोलावून घेऊन त्या 'टीम इंडियाच्या व्हाइट जर्सीवर' सेल्फी घ्यायला लावलास. रैनाला काही समजायच्या आत तू म्हटलास, "इथून पुढे मी कसोटी क्रिकेट खेळणार नाही."
तशीच ती व्हाइट जर्सी घालून तू झोपलास.
त्या सेल्फीत तुझे डोळे सर्व काही सांगत होते.
एका पंप ऑपरेटरचा मुलगा जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेटर झाला. अपघाताने क्रिकेट खेळायला आलेल्या त्या मुलाने सर्व आयसीसी ट्रॉफीज जिंकून सव्वाशे करोड भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले. तू आज जगभरातील करोडो लोकांसाठी आदर्श आहेस. तसेच तुझा द्वेष करणारेही स्वदेशात आहेत.
तू तुझ्या हेटर्सला एकदा सोशल मीडियावर म्हणतो,
"You may not like me but hate is a very strong word to be used anyways its ur choice so I won't complain."
तू तेवढा महान आहेसच. सुनिल गावसकर म्हणतात की जेव्हा मी आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असेल, तेव्हा धोनीने २०११ विश्वचषकात फायनलमध्ये मारलेला विजयी षटकार पाहण्याची माझी शेवटची इच्छा असेल. आज चाळीशी ओलांडल्यानंतरही तू आयपीएलमध्ये अशक्य वाटणारे सामने एकहाती फिनिश करतो. तुझ्यासाठी वय तसा फक्त हा एक नंबर आहे.
माही, तू अवलिया आहेस. तुला वाढदिवासाच्या शुभेच्छा.
शेवटी महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यातील हा किस्सा सांगावासा वाटतो.
तो फक्त १९ वर्षाचा होता. त्यांच्या बिहार संघाचा रणजी सामना होता तगड्या बंगालशी. बिहारची स्थिती अगदी दयनीय होती. बिहार हा सामना एका डावाने हारणार हे जवळजवळ निश्चित होते. पण तेव्हा हा मैदानात उतरला. तळातील फलंदाजांना सोबत घेऊन याने दिवस संपेपर्यंत किल्ला लढवला. व आपल्या वयाच्या पुढे जाऊन नाबाद ११४ धावांची एक समंजस, जबाबदार व परिपूर्ण खेळी करून तो सामना अनिर्णीत ठेवला. व बंगालला एक मोठा धक्का दिला. आपोआपच त्याने निवडसमितीचे लक्ष वेधले. परिणामी त्याला त्याच वर्षाच्या दुलीप ट्रॉफीसाठी ईस्ट झोनकडून निवडण्यात आले. त्याच वर्षी होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजला डोळ्यासमोर ठेवून त्याला ही संधी देण्यात आली होती. पण त्याची निवड झाल्याची बातमी क्रिकेट असोशिएशन ऑफ बिहारकडून त्याला चक्क कळवण्यातच आली नाही. बाकी सर्व निवड झालेल्या सदस्यांना ही बातमी कळाली व ते कोलकात्याला वेळेत पोहचले. व साऊथ झोनविरुद्ध आगरताळा येथे असणाऱ्या सामन्यासाठी विमानाने रवाना झाले.
दरम्यान, सामन्याला काही तास बाकी असताना त्याचा मित्र परमजीत सिंग म्हणजेच छोटू भैय्याच्या कानावर ही सर्व बातमी पडली. व त्याने याला येऊन सर्व घटना सांगितले. आता हातावर हात ठेवून मनस्ताप करत बसण्यापेक्षा त्यांनी काही पैसे जमा केले व हे प्रकरण ऐकल्यावर मनावर झालेल्या आघातासोबत भाड्याने टाटा सूमो कार घेऊन रांचीहून आगरताळ्याला रवाना झाले. सोबत अजून दोन मित्रही होते. ज्यापैकी एक याचा पुढे जाऊन जीजू झाला. लगबगीने हे निघाले असता अर्ध्या वाटेतच नेमकी कार बंद पडली. परिणामी पहिल्या सामन्याला हा वेळेत पोहचू शकला नाही. आणि कमी वयात स्वत:ला सिद्ध करायचे त्याचे स्वप्न भंगले. किंबहुना या व्यवस्थेचा तो नाहक बळी ठरला.
"If one Indian crab tries to climb out of the jar, nine others will pull it down."
पुढे जाऊन मागोवा काढल्यावर असे लक्षात आले की तो ज्या 'ईस्ट झोन'कडून खेळणार होता, त्यावर बंगालच्या रणजी संघाची पकड होती. त्याकाळात भारतीय संघात चांगल्या विकेटकीपरची वाणवा होती. हा चांगला तडाखेबाज फलंदाज व सोबत विकेटकीपरपरही होता. पण त्यावेळी बंगालचा दीपदास गुप्ताही जो विकेटकीपर फलंदाज आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला होता व पुढची भारत-ऑस्ट्रेलिया सीरिज बघता त्याला स्पर्धा देणारा कोणी संघात असणे बंगालच्या जिव्हारी लागणारे होते. म्हणून इतरांसोबत याची संघात निवड होऊनही फक्त यालाच जाणुनबुजून निवड झाल्याबद्दल कोणत्याच कमिटीकडून माहिती दिली गेली नाही. त्यामुळे ईस्ट झोनकडून पहिला साउथ झोनविरुद्ध व दुसरा पुणे येथील वेस्ट झोनविरुद्ध असलेल्या सामन्यात दिपदास गुप्ताच खेळला. हा दुसऱ्या सामन्यात संघाला जोडला गेल्यावरही त्याला फक्त १२वा खेळाडू म्हणून बघ्याचीच भूमिका घ्यावी लागली.
या सर्वांत त्याच्यासोबत एकच गोष्ट चांगली घडली ती म्हणजे दुसऱ्या सामन्यात वेस्ट झोनकडून त्यावेळी १९९ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या 'सचिन रमेश तेंडुलकर' याने त्याच्याकडून पाणी मागितले.
आणि पुढे जाऊन अनेक असेच धक्के खात या पाणी वाटणाऱ्या खेळाडूने सर्व अडचणींना पाणी पाजत फक्त भारतीय संघातच स्थान मिळवले नाही तर त्याने आपल्या नेतृत्वाखाली भारताला कसोटी व एकदिवसीय सामन्यात आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहचवले. टी-२० वर्ल्डकप, एकदिवसीय वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी असे तिन्ही आयसीसी चषक जिंकणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिला कप्तान ठरला. त्याने ऑस्ट्रेलिया संघाला मायदेशी व त्यांच्याच घरात जाऊन व्हाईटवॉश दिला. भारतीय संघाला त्याने टेस्ट, वनडे व टी-ट्वेन्टी क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर पोहचवले. तो विस्डेन क्रिकेटर, जगात सर्वात जास्त कमाई करणारा क्रिकेटर ठरला.
त्याने सचिन रमेश तेंडुलकरचे २२ वर्षांचे ५० ओव्हर्सचा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न २०११ साली स्वत:च्या नेतृत्वाखाली त्याच्यासोबत पूर्ण केले. एकेकाळी ईस्ट झोनकडून बारावा खेळाडू असणारा, वेस्ट झोनकडून शतकी खेळी करणाऱ्या सचिनला पाणी घेऊन येणारा धोनीच सचिनच्या आनंद अश्रूंचा धनी ठरला. असे कित्येक महेंद्रसिंग धोनी आजवर या व्यवस्थेने संपवले असतील. याने या सर्वांवर मात करून जग जिंकले, याचे विशेष कौतुक वाटते.
"It is funny when luck is ascribed to some of Dhoni’s victories, because luck has not always been his best friend."
Happy Birthday, Captain Cool!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.