करोनाने माणसाला जमिनीवर आणलंय का...?

Corona & Humans
Corona & Humans

एक व्हायरस येतो. जगण्यातली असुरक्षितता वाढते. सारं जग घरात बंदिस्त होतं, भविष्याचा तळ गढूळ होतो आणि नाकावर मास्क चढतो...

भारतात लॉकडाऊन लागू करून बरोबर 6 महिने आज पूर्ण झाले... नेमकं काय काय घडलं या सहा महिन्यात... आणि काय बदललं आयुष्य... आणि करोनाने माणूस म्हणून आपल्याला काय धडा शिकवला... या साऱ्याचाच एक धावता आढावा घेणार आहोत...

डोळ्यांनाही दिसत नाही... इतकं शूद्र अस्तित्व असणाऱ्या एका व्हायरसने, जगाचा स्वामी असं स्वतःलाच म्हणवून घेणाऱ्या माणसाचं अख्ख जग थांबवून टाकलं... इतकं की जगाच्या इतिहासाची विभागणी आता प्री-करोना वर्ल्ड आणि पोस्ट करोना वर्ल्ड अशी करावी लागेल की काय, असं वाटतंय..

भारतात 30 जानेवारीला पहिला करोना रुग्ण सापडला. डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीत भारतात येऊन गेले आणि त्यानंतर मग हळूहळू गांभीर्य वाढू लागलं आणि मोदींनी 22 मार्च रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यु लावला. लोकांना मज्जा आली. मज्जाच आली असं म्हणावं लागेल कारण तोवर परिस्थिती हाताबाहेर नव्हती आणि काहीतरी नवीन घडतंय... ते एन्जॉय करणंही चालू होतं...

मध्ये एक दिवस गेला आणि अचानक रात्री 8 वाजताची ती घोषणा मोदींनी केली. 21 दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन...

शहर बंद झालं होतं...
रात्री पुतळे जमा झाले होते...
कुणाच्या तोंडाला फासलंय काळं?
जमून सारे चर्चा करत होते...

रक्ताविना कर्फ्यू कसा?
दगडाविना बंद कसा?
मामला नक्कीच मोठा होता...
जातीधर्माहून गंभीर होता...

सगळ्यांनाच वाटत होतं की सारं काही एका क्षणात सुरळीत व्हावं... अशा असुरक्षित परिस्थितीत कुणीतरी सारं काही सुरळीत करणारा मसीहा यावा, असं वाटणारीच भारतीयांची मानसिकता राहिलेली आहे... आणि मग दूरदर्शनवर 'रामायण' 'महाभारत' सुरू झालं... आणि घरबसल्या लोकांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी जागवल्या... 

कामाच्या धबडग्यातून अशी सुट्टी पुन्हा मिळणार नाही... घरच्यांसोबत इतका मोठा वेळ पुन्हा स्पेण्ड करता येणार नाही, असं समजून मध्यमवर्गही टीव्हीसमोर स्थिरावू लागला होता...
पण तिकडे हातावर पोट असणाऱ्या मजूर आणि कामगार वर्गाची अवस्था बिकट झाली होती. एकतर करोनाचं भय आणि ठप्प झालेल्या देशात चालत घरी जाणारे मजुरांचे लोंढे... अचानकच लॉकडाऊन लागू केल्यामुळे सैरभैर झालेला हा वर्ग 25 मार्चपासून चालत घराकडे निघाला... आणि मग या वर्गाला मदत करणारा सोनू सूदही ट्रेंडमध्ये आला...

डॉक्टर, नर्स आणि कोव्हीड योद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून गच्चीत-दारात उभं राहून थाळ्या वाजवून झाल्या होत्या आणि 27 मार्चला मोदींनी देशाला आवाहन केलं की घरासमोर दिवे लावा... 

करोना हा नवाकोरा शब्द आलाच होता. लॉकडाऊनसोबतच क्वारंटाईन हा शब्द सुद्धा लोकांच्या जीभेच्या वळणी पडला होता.
वर्क फ्रॉम होम सुरू झालं होतं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोशल कनेक्टिव्हिटी सुरू झाली होती. तरुणाईने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा काळ जरा सुखकर बनवण्याचा प्रयत्न केला. कुणी डालगोना कॉफी बनवली... कुणी नथीचा नखरा केला... कुणी 'काय सांगशील ज्ञानदा' असं म्हणत मिम्सचा महापूर आला... 

या सहा महिन्यातच कधी नव्हे तर देशाच्या इतिहासात जीडीपी सर्वात खाली म्हणजे वजा 23 वर गेला... याच काळात गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित राहिलेला मुद्दा म्हणजेच राम जन्मभूमीचं पूजनही झालं...

15 एप्रिलला लॉकडाऊनची दुसरी फेज सुरू झाली. 
ऋषी कपूर, इरफान खान, निशिकांत कामत, पंडीत जसराज आणि माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी असे अनेक दिग्गज आपल्यातून निघून गेले आहेत. 
4 मे ला लॉकडाऊन फेज 3 सुरू झालं... 1 जूनला अनलॉकला सुरवात झाली...

देशातील काहींना पूर्वी सॅनिटायजर म्हणजे काय हेही माहीत नसलेला हा द्रव पदार्थ आता जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे... मास्कसोबत जगणं हे आता न्यू नॉर्मल झालं आहे...
14 जूनला सुशांत सिंग राजपुतचा मृत्यू झाला आणि त्यानंतर बातम्यांवर एककल्ली अधिराज्य गाजवणाऱ्या करोनालाही धक्का बसला आहे... 

4 महिने नुसतेच करोनाचे आकडे वाढते आहेत आणि आता किती दिवस घरी बसायचं, असं म्हणून जनजीवन सुरळीत करण्यास आणि होण्यासदेखील, सुरवात झाली आहे. देशातील करोनाग्रस्तांचा आकडा 56 लाखांच्या पार गेला आहे. आतापर्यंत भारतात 91 हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. 

कधी एकदा लस येतेय आणि कधी यातून सुटका होतेय, असा ध्यास सर्वांनाच लागून राहिला आहे. जगावर आजवर अनेक संकटं आली परंतु माणसाने त्यावर मात करुन आपलं अस्तित्व आणि जगावर आपलं स्वामित्व कायम ठेवलं आहे... 
गेल्या सहा महिन्यांचा धावता आढावा घेताना, जाता जाता जरा याही गोष्टीचा विचार केला पाहिजे, की माणूस म्हणून निसर्गाने आपल्या सर्वांना जमिनीवर आणलंय का? विचार नक्कीच करायला हवा...  पण, कोरोना हा माणसाला निसर्गाने शिकवलेला मोठा धडा आहे, यात शंका नाही. 

समजा,
आलीच पृथ्वीला दया,
आणि दिलीच तिने
सारं काही फॉरमॅट करायची संधी तर?
पुन्हा एकदा पृथ्वीला रिबूट करून,
पुन्हा नव्याने जग थाटायचं...
अशी आलीच एखादी नोटिफिकेशन
वर निळ्या अथांग आकाशात तर...
झाडे सारी कॉपी करून,
पटापटा पेस्ट करायचा...
मिळालाच एखादा चान्स वसुंधरेकडून तर...
करायला लावल्या डिलीट कोरोनाच्या जंक फाईल्स,
आणि दिली संधी जगाला
सारं काही रिफ्रेश करण्याची तर...
तर...?
तर काय? 
सध्या नुसतंच...
समजा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.