सध्या जनता महागाईने त्रस्त आहे. जीवन जगणं कठीण होत चाललंय. हातावर पोट असलेल्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मात्र, या सगळ्यात नव्या विषयाची भर पडली ती म्हणजे हनुमान जन्मस्थळी वादाची. (Hanuman birthplace dispute)
एकीकडे जनता जीवन मरणाच्या विषयांनी त्रस्त असताना हनुमान जन्मस्थळाचा मुद्दा समोर आल्यानंतर त्यावर चर्चा होणे गैरलागू ठरते का...? अशा अनुषंगाने देखील समाजाच्या काही घटकांमध्ये चर्चा झाली. आमच्या मते दोन्ही मुद्दे स्वतंत्र आहेत. सध्या जनतेच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, त्यातून सामान्य लोकांना दिलासाही मिळायला हवा. पण त्यामुळे अन्य कुठल्याच मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, असं म्हणणं अयोग्य ठरतं. आपल्या देशाची मूळ संरचना भावनिक आणि धार्मिक अंगानं झालेली आहे. हजारो वर्षांच्या भावनिक मानसिकतेतून आजचा समाज घडला आहे. धार्मिकतेला विज्ञानाची जोड केवळ आपल्याकडे दिली जाते. त्यात नाशिक नगरी ही धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून पुरातन काळापासून ओळखली जाते. त्यामुळे हनुमान जन्मस्थळाचा मुद्दा उफाळून येणं ही नाशिकमधील संत-महात्म्यांच्या परंपरांमधली अत्यंत स्वाभाविक गोष्ट होती.
वरवर हा मुद्दा धार्मिक भावनांशी जुळलेला वाटत असला तरीदेखील अंजनेरी हनुमान जन्मस्थळ मुद्द्याला अनेक पदर आहेत. धार्मिक, पौराणिक परिसर ही नाशिकची ओळख ही गेल्या अनेक शतकांपासूनची आहे. पण असं असताना अचानक कर्नाटकमधील एखादा संत-महंत नाशिकला येतो आणि जन्मस्थळीच्या वादाला तोंड फोडतो, आणि त्यानंतर नाशिकच्या धर्मक्षेत्रात सहसा आढळून न येणारी एकता दिसून येते. नाशिक आणि त्र्यंबक नगरीतील हिंदू धर्म शास्त्र अभ्यासकांमध्ये अनेक वाद आहेत. पण कर्नाटकचं आक्रमण झाल्यानंतर सगळे धर्म अभ्यासक एकत्र आले, ही या आंदोलनामुळे समोर आलेली सकारात्मक बाजू म्हणावी लागेल. हे जे कोणी महात्मा वैगरे कर्नाटकातून नाशिकमध्ये दाखल झाले होते, त्यांच्या दाव्यांपैकी एका दाव्याला तर फारसं महत्त्व दिलं गेलं नाही. तो मुद्दाही भयंकर आणि काहीअंशी हास्यास्पद असाच होता. हे महाशय म्हणालेत की, नाशिकची पंचवटी देखील डुप्लीकेट आहे. खरी पंचवटी तर कर्नाटकात आहे. माध्यमांनी हा मुद्दा उचलला असता तर मोठाच गहजब झाला असता. हनुमान जन्मस्थळी या एकाच मुद्यावर या महंतांची एवढी कोंडी झाली की, त्यांना इथून काढता पाय घ्यावा लागला.
हा वाद निर्माण झाल्यामुळे अंजनेरीवासीय मात्र आता चांगलेच सावध झाले आहेत. पुराणातील उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कोर्टात धाव घेऊन ते पुढचा लढा लढणार आहेत. पण यामागे असलेला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रभू रामचंद्रांनी वनवासा दरम्यान ज्या मार्गाने प्रवास केला, त्या संपूर्ण मार्गाच्या विकासासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये विकास निधी देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. कर्नाटकातून इथे प्रकट झालेले महाशय या निधीवर डोळा ठेवून वाद उपस्थित करु पाहत होते. पण ही योजना नाशिकमधल्या जाणकारांनी अचूक ओळखली. अयोध्येतील प्रख्यात पाठक गुरुजींना पाचारण करत शास्त्रार्थ सभेत एक विरुद्ध नऊ पुरावे देऊन नाशिकच्या संत महात्म्यांचा विजय झाला.
कर्नाटकमधून आलेल्या पाहुण्यांचा डोळा द्वारकापीठाच्या शंकराचार्यपदावरही आहे. या वादामुळे ते चर्चेत आले. त्यामुळे त्यांची पदोन्नती होवो न होवो पण पुढच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने या वादाला पुन्हा एकदा फोडणी देण्याचा प्रकार होण्याची शक्यता काही धर्मअभ्यासक वर्तवत आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने करोडो भाविक नाशिकमध्ये दाखल होतात. धार्मिक पर्यटनाला चालना मिळतेच, पण तत्कालीन रोजगार निर्मिती देखील होते. केंद्र आणि राज्य सरकारचा हजारो कोटींचा निधी नाशिकच्या विकासासाठी खर्च होतो. नाशिकचा पौराणिक वारसा इथल्या कणाकणांत जाणवतो. त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शामुळे नाशिकला मिळणारा विशेष दर्जा राखून ठेवण्याची जबाबदारी आता एका अर्थाने धर्मशास्त्रातील तज्ज्ञांवर आलेली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.