संहारक अस्त्रांबाबत हवी निर्दोष यंत्रणा

भारतातून ९ मार्च रोजी तांत्रिक बिघाडामुळे एक क्षेपणास्त्र पाकिस्तानात घुसले आणि कोसळले
India missiles Argument
India missiles Argumentsakal
Updated on
Summary

भारताचे क्षेपणास्त्र अपघाताने पाकिस्तानी हद्दीत जाऊन पडले. त्यानंतर उभय देशांनी संयम आणि परिपक्वता दाखवत सध्यातरी वाद वाढवलेला नाही. तथापि, अशा अपघातांची शक्यता लक्षात घेऊन उभयतांमध्ये आदानप्रदानाची प्रभावी, निर्दोष यंत्रणा गरजेची आहे.

भारतातून ९ मार्च रोजी तांत्रिक बिघाडामुळे एक क्षेपणास्त्र पाकिस्तानात घुसले आणि कोसळले. दोन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्रांकडून अतिशय सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. मात्र या दुर्घटनेमुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. अशा स्वरूपाची दुर्घटना भविष्यात होणार नाहीत, यासाठी निर्दोष यंत्रणा असण्याची आवश्यकता यातून स्पष्ट होते.

पाकिस्तानने इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयातील वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला दोनदा बोलवून ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगितले, निषेधही व्यक्त केला. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने ४८ तासानंतर या प्रकाराबद्दल खेद प्रकट करून, कुठलीही जीवितहानी झाली नसल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भारताकडून क्षेपणास्त्र मुद्दामहून सोडण्यात आलं, असं पाकिस्तानने कुठेही म्हटलं नाही. भारताने चूक मान्य करून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. पाकिस्तानने मात्र क्षेपणास्त्र आपल्या देशात कोसळल्याने संयुक्त चौकशीची मागणी केली.

इम्रान सरकारला हत्यार

पाकिस्तानच्या प्रवक्त्याने या घटनेमुळे भारताच्या सुरक्षा संबंधीचे प्रोटोकॉल आणि तांत्रिक सुरक्षा याबद्दल काही प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटलं आहे. हा मुद्दा पुढचे काही दिवस जागतिक स्तरावर चर्चेत राहणार. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संदर्भात १५ मार्च रोजी संसदेत निवेदनाद्वारे म्हटलं की, भारत शस्त्रांच्या सुरक्षेला अधिक महत्त्व देत आहे. चौकशीत काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्यात येतील.पाकिस्तानात इम्रान खान सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे. विरोधी पक्षांनी एकत्रितपणे सरकारविरोधात मोहीम चालवली आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी आता इम्रान खान यांनीच या मुद्याचा राजकीय वापर करण्याचे ठरवल्याचे दिसते.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी भारत सरकारकडून होईल. पण असे घडण्याचे नेमके कारण काय ते लोकांना कधीच कळणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणामुळे अशा गोष्टी गोपनीय ठेवल्या जातात. ९ मार्च रोजी सायंकाळी ०६.४३ वाजता भारतीय क्षेपणास्त्र चुकून सुटलं आणि नंतर पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. ६.५० वाजता पंजाब प्रांताच्या मिया चन्नू या लहान शहराजवळ कोसळले. ज्या मार्गाने या क्षेपणास्त्राने प्रवास केला त्या भागाचा हवाई वाहतुकीसाठी पाकिस्तानची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमाने वापर करतात. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या डिरेक्टर-जनरल बाबर इफ्तिकार यांनी १० मार्चला पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, पाकिस्तान हवाई दलाच्या एअर डिफेन्स ऑपरेशन सेंटरनी ६.४३ वाजता एक अतिवेगाने उडती वस्तू भारताच्या भूमीत पाहिली आणि अचानक पाकिस्तानच्या दिशेने ती आली. पाकिस्तानच्या हवाई हद्दीचं त्यांनी उल्लंघन केलं. दुसरीकडे, पाकिस्तानच्या एअर डिफेन्स यंत्रणेला क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानात प्रवेश केल्याचे सुरुवातीला कळालेच नाही, अशीही चर्चा आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र ३ मिनिट ४४ सेकंद पाकिस्तानात होते आणि त्यानंतर ते कोसळले.

परिपक्वता आणि संयम

खरेतर ही दुर्घटना तत्काळ मान्य करून भारताने पाकिस्तानला कळवायला पाहिजे होते. अशा प्रकारच्या दुर्घटनेची माहिती तत्काळ देणं नेहमी महत्त्वाचं असते. तसं केल्यास गैरसमज दूर होतात. सुरुवातीला पाकिस्तानने परिपक्वता दाखवली आणि पाकिस्तानी माध्यमांनी संयम दाखवला, हे मान्य केले पाहिजे. अशा प्रकारची दुर्घटना भविष्यात घडणार नाही, याची दोन्ही अण्वस्त्रधारी देशांनी काळजी घेतली पाहिजे. त्या स्वरूपाची निर्दोष यंत्रणा अत्यावश्यक आहे. अशा स्वरुपाची दुर्घटना घडल्यास काय करावे, या संबंधी यंत्रणा पाहिजे. दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्समध्ये हॉटलाईन आहे. त्याचा पण उपयोग करता आला असता.

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात नकाराधिकार असलेल्या अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटनच्या राजदूतांना बोलावून त्यांना या घटनेची माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयोग करणार हे स्वाभाविक आहे. या क्षेपणास्त्राने ३ मिनिटे ४४ सेकंदात ४०,००० फुटांवरून पाकिस्तानात १२४ किलोमीटरचे अंतर गाठलेले होते.

हवी निर्दोष यंत्रणा

हे क्षेपणास्त्र ब्रह्मोस असण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियाने ते संयुक्तपणे बनवले आहे. त्याचे नावदेखील भारताच्या ब्रह्मपुत्रा आणि रशियाच्या मोस्कवा नदीवरून ठेवण्यात आले आहे. अमेरिकेच्या आर्म्स कंट्रोल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा पल्ला ३०० ते ५०० किलोमीटर आहे. ते जगात सर्वात अधिक वेगाने प्रवास करणारे आहे. त्याचा वेग आहे मॅच ३. याचा अर्थ ध्वनीपेक्षा तिप्पट अधिक वेग. भारताच्या या क्षेपणास्त्राला मोठी मागणी आहे. फिलिपीन्ससोबत भारताने ब्रह्मोस निर्यातीचा २,७७० कोटी रुपयांचा करार या वर्षाच्या सुरुवातीस केला आहे.

क्षेपणास्त्र, अणुऊर्जा प्रकल्प सारख्या अतिशय जोखमेचे आणि विनाशकारी उद्योग निर्दोष असले पाहिजेत. अणुऊर्जा प्रकल्पातून होऊ शकणाऱ्या किरणोत्सर्गाचं मोठं संकट मानवासमोर आहे. ४ मार्च रोजी रशियाने युक्रेनच्या झापोरिझझा अणुऊर्जा प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यामुळे आग लागली होती, पण सुदैवाने त्यातून किरणोत्सर्गाची गळती झाली नाही. युरोपातला हा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. अशा स्वरुपाच्या दुर्घटना परत होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()