"साध्याच माणसांचा येल्गार येत आहे...'

Lockdown
Lockdown

"लॉकडाऊन हे फक्त "पॉज बटण' आहे, तो मागे घेतला की विषाणू पुन्हा पसरेल,' या विधानात तथ्य किती आहे, ते काही आठवड्यांनी कळेलच, पण आपल्या देशानं ते बटण इतर "प्रगत' देशांप्रमाणं पाणी नाकातोंडात गेल्यावर नव्हे तर वेळेवर दाबलं आणि त्यामुळंच आपल्या देशातील बाधित आणि बळींचा आकडा त्या देशांप्रमाणं आकाशाला भिडलेला नाही, हे मान्यच करावं लागेल...
जगातील इतर देशांमध्ये कोरोना विषाणू जसा हैदोस घालतो आहे, तितका त्यानं आतापर्यंत भारतात घातलेला नाही, याचं कारण आपण वेळीच नव्हे तर वेळेपूर्वीच जागे झालो, हे आहे.

... आपण जगातील काही निवडक देशांची आणि आपली स्थिती तपासूयात.

बघा, ज्या देशात कोरोना विषाणूचा जन्म झाला त्या चीनमधील तेरा शहरांत 24 जानेवारीला लॉकडाऊन जाहीर झाला. त्या दिवसापर्यंत चीनमध्ये 1010 जणांना बाधा झाली होती तर 41 जण मरण पावले होते.

इटलीत लॉकडाऊन 9 मार्चला लागू करण्यात आला. त्या दिवशी इटलीतील बाधितांची संख्या होती 9,172 आणि मृत्यू झाले होते 463.

ब्रिटनमध्ये 23 मार्चला लॉकडाऊन लागू झाला तेव्हा बाधित होते 5,748 आणि मृत्यू होते 282.

रान्स आणि स्पेनने 14 मार्च या एकाच दिवशी लॉकडाऊन जाहीर केला, पण त्या दिवसापर्यंत फ्रान्समध्ये 4,499 जणांना बाधा होऊन गेली होती आणि 91 जण बळी गेले होते तर स्पेनमध्ये लॉकडाऊनच्या दिवसापर्यंत बाधितांची संख्या होती 6300 तर बळी होते 191.

डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉकडाऊनबाबत "तळ्यात-मळ्यात' म्हणजे "आता नको, नंतर बघू' अशी भूमिका घेतली होती त्या अमेरिकेतील राज्यांमध्ये 15 मार्चपासून 11 एप्रिलपर्यंत स्वतंत्रपणे लॉकडाऊन जाहीर होत होते. त्यातील मध्य म्हणून 24 मार्च पाहिला तर त्या दिवशी अमेरिकेतील बाधितांची संख्या तब्बल 52,000 ना भिडली होती तर 704 जणांना आपला जीव गमवावा लागला होता...

... आता आपण भारताकडे येऊ. आपल्या देशात 24 मार्चला तीन आठवड्याचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला तेव्हा जगाच्या तुलनेत आपल्याकडं कोरोना नुकताच डोके वर काढत होता. कोरोनाची बाधा 141 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 415 जणांना झाली होती आणि फक्त 7 बळी गेले होते. अमेरिकेत चारशे बाधितांचा आकडा होता तेव्हा ते सरकार बेफिकीर होते एवढेच नव्हे तर लॉकडाऊन जाहीर करतानाही काही राज्यांच्या गव्हर्नरनी "तुम्ही जॉगिंग करू शकता, रेस्टॉरंटही उघडी राहतील,' असे आपल्या आदेशात म्हटल्याचे त्या देशांची वृत्तपत्रांवर नजर टाकली तर दिसून येते.

... आता आपल्याला अमेरिकेवर टीका करायची नाही आणि त्यांची धोरणे काय असावीत, याचा आपला संबंधही नाही, पण "आपल्याकडं अजून कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही, मग आपण एकदम लॉकडाऊनचं पाऊल का उचलायचं ?' असा प्रश्‍न भारताच्या कर्त्याधर्त्यांना पडला नाही आणि ते गाफीलही राहिले नाहीत, असे म्हणावे लागेल. अर्थात, असे म्हणण्यामागे "आपलाच देश आहे आणि आपलेच राज्यकर्ते आहे, तर वाजवा ढोल' अशी वृत्ती नाही तर तटस्थपणे परिस्थिती पाहिल्यावर जर आपल्या देशाने खरेच काही चांगले केले असेल तर आपले कौतुक करण्यात आपणच कोतेपणा दाखवणं, मूर्खपणाचं ठरेल.

आता प्रश्‍न पडतो तो देशाच्या आधीच कमकुवत असलेल्या आणि मंदीनं आणखी समस्या भेडसावणाऱ्या आपल्या देशाची आर्थिक चक्रं एकदम महिन्या-दीड महिन्यासाठी थांबवणं आपल्याला परवडेल का. असाच विचार पहिल्यांदा जगातील मजबूत आर्थिक सत्ता असलेल्या देशांनी केल्याचंही आपल्याला दिसून येते. त्यात ट्रम्प महाशय जसे होते तसेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हेही होते. "कोरोनाच्या थोड्याशा प्रादुर्भावानंतर नागरिकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती येईलच, त्यासाठी आर्थिक नुकसान का करून घ्यायचं,' अशी भूमिका जॉन्सन प्रशासनाने सुरूवातीला घेतली होती. "देशातले अडीच लाखावर नागरिक मरतील' असे तज्ज्ञांनी सांगितल्यावर मात्र ते सटपटले आणि त्यांनी लॉकडाऊनला मान्यता दिली.

... आता आपल्या भारताकडे येऊ. "भारतात लॉकडाऊनचे "कडू औषध' दिलं नाही तर जुलैपर्यंत तब्बल 40 कोटी नागरिकांना बाधा होऊ शकते, त्यातील 4 कोटी जण गंभीर स्थितीत जाऊ शकतात, एक कोटी जणांना रूग्णालयात भरती करावे लागू शकते आणि 65 लाख नागरिक मरू शकतात,' असे साथरोगतज्ज्ञांनी सांगितल्यावर आपल्या देशाने आर्थिकदृष्ट्या परवडू न शकणारं शिवधनुष्य उचलायचं ठरवलं. म्हणजेच आपण कागदी संपत्तीपेक्षा मानवी संपत्तीला अधिक महत्त्व दिलं. तसंच एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना बाधा झाली तर त्यांच्यावरच्या उपचारासाठी लागणारी यंत्रणाही आपल्याकडं नव्हती. एक कोटी जणांना पुरेल एवढे अतिदक्षता विभाग आपल्याकडं नाहीत. आपल्या संपूर्ण देशातील अतिदक्षता विभागांत फक्त एक लाख कॉट्‌स म्हणजे खाटा आहेत तर कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देण्यासाठी केवळ आणि केवळ 20 हजार व्हेंटिलेटर आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात याआधी 1918 मध्ये आलेल्या साथीत दीड लाख जण मरण पावल्याचे आपला इतिहास सांगतो. म्हणूनच आपण लॉकडाऊनचा निर्णय निरूपायाने घेतला.

... पण याचा सर्वाधिक फटका बसतो तो हातावर पोट असलेल्यांना, ज्यांना शास्त्रीय भाषेत असंघटित वर्ग असं म्हटलं जातं. या वर्गाच्या पोटाचं काय ? तसंच धारावीसारख्या अवघ्या दोन किलोमीटरवर पसरलेल्या झोपडपट्टीत तब्बल दहा लाख जण कोंबून भरली आहेत, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर राखायचं तरी कसं ? आता हातावर पोट असणारे असे किती जण आपल्या देशात आहेत, माहिती आहे ? आपल्या देशातील एकूण कामगारांपैकी तब्बल 85 ते 90 टक्के जण असंघटित वर्गात आहेत. आपल्या महाराष्ट्राचंच फक्त एक उदाहरण पाहू. आपल्या राज्याच्या साडेतेरा कोटी जनतेपैकी 30 टक्‍क्‍यांच्या आसपास जनता दरिद्री म्हणजे सरकारच्या भाषेत दारिद्रयरेषेखालची आहे. महणजे चार कोटी जण झाले. सुमारे सहा कोटी जण मागास भागांतून पश्‍चिम महाराष्ट्रात म्हणजे पुण्या-मुंबईकडे पोट भरायला आले आहेत. यातील बहुतांश जण "हातावर पोट' या वर्गातले आहेत. कोणी इस्त्री मारतो, कोणी रिक्षा-मोटार चालवतो, कोणी पावभाजीची गाडी लावतो तर कोणी भाजी विकण्यासाठी रस्त्यावर पथारी टाकतो.

ही झाली महाराष्ट्राची स्थिती. मग देशातील असंघटितांची संख्या किती असेल ? देशातील 47 कोटी कर्मचारी-कामगारांपैकी 85 टक्के म्हणजेच 39 कोटी जण या असंघटित क्षेत्रात आहेत. या कोट्यवधी जनतेला कोरोनाच्या बाधेपेक्षा भूकेची बाधा अधिक भयावह वाटते आणि त्यामुळंच श्रमदेवतेचे हे पुजारी हजारो किलोमीटर पायी आपल्या गावी परत जायचा प्रयत्न करतात. त्या प्रवासात काय खातात आणि कुठं झोपतात, ते एकतर तेच जाणोत किंवा श्रमदेवता जाणो. आफ्रिकेतील मसाई-मारातील वाईल्ड बिस्ट हे प्राणी लक्षावधींच्या संख्येनं पोट भरण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास कळपानं करतात, नदी ओलांडताना मगरी लचके तोडतात तरी ते मागं हटत नाहीत. तसंच काहीसं जिणं या वर्गाचं आहे आणि तोच आपल्याकडं बहुसंख्येनं आहे. या वर्गाची खाण्याची व्यवस्था करून त्यांना आहे तिथेच रोखण्यासाठीचं नियोजन करण्यात सरकार कमी पडलं, हेही मान्य करावं लागेल. असंघटित वर्गाबरोबरच संघटित वर्गालाही लॉकडाऊनमुळं येणाऱ्या मंदीने दचकायला होतं आहे.

... पण तरीही लॉकडाऊन केला नसता तर यातील लाखो जण रुग्णालयातल्या बेडपर्यंत पोचले असते आणि अनेकजण त्या बेडवरून घरी कधीच आले नसते... त्यामुळंच वेळेआधीच जाग आलेल्या सरकारला (मग ते याचं आहे का त्याचं, याची उस्तवार न करता), आपल्या जिवाची पर्वा न करता बाधितांची काळजी घेणाऱ्या डॉक्‍टर-नर्स-आया-वॉर्डबॉयना, रस्त्यावर तासनतास उभं राहून बेपर्वाईनं लॉकडाऊन तोडणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना, मास्क बांधून औषधांची-दूध-भाजीची दुकानं उघडी ठेवणाऱ्या चालकांना, रस्ते झाडण्यापासून ते अग्निशामक दल-रूग्णवाहिकेसारख्या अत्यावश्‍यक सेवतल्या कर्मचाऱ्यांना, गरीबांना जेवण-वाण सामान पुरवणाऱ्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना कडक सलाम ठोकायला लाजू नका...

... आता वेळ आली आहे कोरोनाबरोबरचा लढा चालू ठेवतानाच, स्वच्छतेची सर्व व्यवधानं पाळत असतानाच, एकमेकांपासून अंतर ठेवत असतानाच अर्थव्यवस्थेची चक्रेही कशी चालू होतील, हे पाहण्याची. ज्या भागात संसर्ग कमी आहे, अशा भागांतील उद्योग-व्यापार सर्व खबरदारीसह चालू करण्याच्या विवेकी धोरणाची. तसंच सील केलेल्या हॉटस्पॉटमधील पुढची लागण रोखण्यासाठी तिथं राहणाऱ्यांनी रात्री पोरं जमवून गप्पांचे अड्डे न जमवता, रोजच सकाळी भाजीसाठी गर्दी न करता डोकं वापरण्याची...

... तसं आपण वागलो तरच जगात कोरोनाला रोखणारा, जगातील साडेसहा अब्जांपैकी तब्बल दीड अब्जांची जनता वागवूनही विषाणूला वाकवणारा देश म्हणून आपली पाठ थोपटली जाईल... भूक पोटात दाबून अन फाटके कपडे लपवून कोटींच्या संख्येने हे दरिद्री नारायण "साध्याच माणसांचा येल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही' असं म्हणत एक झाले तर इतिहास घडवू शकतात, हे जगापुढं सिद्ध करता येईल. "दारिद्रयाच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देशगौरवासाठी झिजला...' असा या महाराष्ट्रदेशाचा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती केली तर देशाची जगात वाहवा होईल. देशाची म्हणजेच तुमची आणि आमची... कारण देश म्हणजेच देशातील माणसं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.