पुणे - पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यातही कसब्याची निवडणूक प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची बनवली आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत असली तरी या निवडणुकीतील उमेदवार आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी लक्ष वेधलं आहे.
कला, साहित्य, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ असलेले अभिजीत बिचुकले आपल्या अजब वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढविल्या आहेत. नगरसेवक ते राष्ट्रपतीपदापर्यंत त्यांनी आपले नशीब आजमावले आहे.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही अभिजीत बिचुकले यांनी आव्हान दिले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
अभिजीत बिचुकले हे सातारा जिल्ह्यातील, मात्र कुठेही निवडणूक असली की ते उमेदवारी अर्ज दाखल करून आपलं नशीब आजमावत असतात. त्यांच्या उमेदवारी अर्जाची माध्यमांमध्ये नेहमीच चर्चा असते. त्यामुळे कसबा निवडणुकीत बिचुकले यांची एंट्री अपेक्षितच होती. या उमेदवारी अर्जामुळे बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
बिचुकले हे कंदी पेढ्यांचे विक्रेते आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यात साताऱ्याचे कंदी पेढे विकण्याचा व्यावसाय सुरू केला आहे. साताऱ्याच्या प्रसिद्ध कंदी पेढ्यांची चव ते आता पुणेकरांना देत आहे. पुण्यातील शारदा गणपती मंदिराजवळ अभिजीत बिचुकले यांनी कंदी पेढ्यांचे दुकान सुरू केले आहे.
बिचुकले, आपला व्यवसाय करतच निवडणूक लढवतात. जणू काही निवडणूक लढविणे त्यांचा छंदच आहे. यापूर्वी त्यांनी अनेक निवडणूका लढवल्या आहेत. आता कसबा निवडणुकीच्या मैदानातही ते असून उद्या निवडणुकीचा निकाल आहे. एक्झिट पोलनुसार बिचुकले यांच्या विजयाची आशा धुसर असली तरी, कसब्यातील विजयानंतर बिचुकले यांच्या कंदी पेढ्यांच्या दुकानात पेढ्यांसाठी गर्दी होणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे कसब्यात विजय कोणाचाही झाला, तरी पेढे मात्र बिचुकलेंचेच असणार हे निश्चित.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.