उत्तर कोरियाचे अध्यक्ष व हुकूमशहा किम जोंग उन यांनी नुकताच एक आठवड्याचा रशियाचा दौरा केला. स्वभावाने ते अत्यंत संयशी व खुनशी. त्यांना सतत भय असते, ते त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याचे. म्हणून, पोंगयांगहून विमानाने रशियाला न जाता स्वतःच्या बुलेट प्रूफ रेल्वेने चीन मार्गे रशियाला गेले. त्यांच्याबरोबर त्यांच्या खास मर्जीतील 35 वर्षाची बहिण किम यो जोंग होती. किम जोंग उन यांची ती उत्तराधिकारी असेल, असा कयास गेले काही वर्ष केला जात आहे. किम यांच्यानंतर ती सर्वात शक्तीशाली नेता आहे. उत्तर कोरियाचे राजकारण व नेत्यांत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिचे वर्णन `द मोस्ट डेंजरस वुमन इन द वर्ल्ड’ असे केले जाते.
अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर झालेल्या किम यांच्या भेटीत व शिष्टमंडळस्तरीय वाटाघाटीत रशियाशी बरीच देवाणघेवाण झाली. युक्रेनच्या युद्धासाठी लागणारी शस्त्रसामग्री रशियाला देण्याचे सुतोवाच किम जोंग उन यांनी केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या व्लादिवोस्तोकच्या भेटीत प्रिमोर प्रांताचे गव्हर्नर ओलेग कोझेमयाको यांनी त्यांना फर हॅट, चिलखत व गेरान 25 बनावटीची पाच ड्रोन्स भेट दिली. किम यांना अण्वस्त्र डागणारी अत्याधुनिक लढाऊ विमाने दाखविण्यात आली. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांनी सांगितले, की उत्तर कोरियाबरोबर रशियाला समान संबंध हवे आहेत.
किंम जोंग उन यांनी लढाऊ विमानांच्या कारखान्याला दिलेली भेट, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची केलेली पाहाणी व रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्याबरोबर केलेली बोलणी, यातून स्पष्ट होणारी बाब म्हणजे, या भेटीमुळे अस्तित्वात आलेला साम्यवादाचा नवा त्रिकोण (रशिया-चीन-उत्तर कोरिया) ही होय. शोइगु यांनी काही महिन्यापूर्वी जुलैमध्ये उत्तर कोरियाला भेट दिली होती. त्यावेळी उत्तर कोरियातील अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची पाहाणी त्यांनी केली होती. त्यात अमेरिकेवर लादण्यात येणाऱ्या संभाव्य आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा समावेश होता. किम व शोइगु व्लादिवोस्तकला बरोबर गेले. तेथे त्यांनी `शापोशिनोव्ह’ या रशियन युद्धनौकेला भेट दिली, त्यावेळी एडमिरल निकोलाय येव्हमेनेव्ह यांनी जहाजाची क्षमता व त्यावरून कालबीर क्षेपणास्त्र डागण्याची असलेली यंत्रणा त्यांना दाखविली. या नौकेवरूनच युक्रेनवर क्षेपणास्त्रे डागली जात आहेत.
दौऱ्याबाबत अर्थातच किम यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना विश्वासात घेतले असावे. युक्रेनवर आक्रमण लादल्यापासून चीन व रशिया नजिक आले आहेत. जिनपिंग व व्लादिमीर पुतिन यांच्या अलीकडे झालेल्या भेटीतून अमेरिकेचा विरोध आणखी तीव्र झाला असून, कॅलिफोर्निया, अमेरिकेचा गुआम नाविक तळ व दक्षिण कोरियावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या धमक्या देणाऱ्या किम यांना रशियाला दिलेल्या भेटीने येत्या काळात आणखी चेव येणार, अशीच चिन्ह दिसत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला भेट देऊन किम जोंग उन यांच्या गळयात गळा घालण्याचा प्रसंग आता इतिहासजमा झाला आहे. जागतिक राजकारणात नवी समीकरणे पुढे येत आहेत. त्यात अमेरिका, मित्र राष्ट्रे, युरोप विरूदध रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण असे चित्र पुढे येत असून, हिंदी व प्रशांत महासागर नव्या संघर्षाचा टापू ठऱणार आहे. एकीकडे कोरियन पेनिन्सुलाचे संकट संपण्याची शक्यता नाही, तर दुसरीकडे तैवानवर असलेली चीनची टांगती तलवार आणखी धारदार बनत आहे, हे अलीकडे चीनच्या हवाई व नौदलाने तैवानच्या आखातात केलेल्या सरावावरून सिद्ध होते.
गेल्या चार वर्षात किम जोंग उन प्रथमच देशाबाहेर पडले. दौऱ्यात त्यांनी प्रिमोर्स्की येथील रशियातील सर्वात मोठ्या मस्त्यालयाला भेट दिली. या भेटीत कोरियाच्या भेटीचे किम यांनी दिलेले आमंत्रण पुतिन यांनी स्वीकारले आहे. रशियाच्या मैत्रीची किम यांना इतकी गरज भासते आहे, की ``दोन्ही देशांचे संबंध पुढील शंभर वर्ष स्थिर राहातील,’’ अशा दिशेने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी पुतिन याना सांगितले.
या दौऱ्याबाबत अमेरिका व दक्षिण कोरियाकडून चिंता व्यक्त करण्यात येत असून, या मैत्रीचे कोरियन परिसरावर काय संभाव्य परिणाम होतील, याचा अंदाज घेतला जात आहे. या घडामोडीमुळे `क्वाड’(भारत-जपान-अमेरिका व ऑस्ट्रेलिया) चतुष्कोन व औकुस गटातील (ऑस्ट्रेलिया-अमेरिका-ब्रिटन) या त्रिकोणातील घडामोडी व सहकार्याला वेग येणार, हे निश्चित.
जगातील साम्यवादी राष्ट्रांकडे पाहता ज्यांना कट्टर साम्यवादी म्हणता येईल, अशी व्हिएतनाम, लाओस, दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला, क्यूबा याकडे निर्देश करता येईल. परंतु, व्हेनेझुएला, क्यूबा ही भोगोलिक दृष्ट्या अमेरिकेनजिकची राष्ट्रे असल्याने चीन व रशियाच्या प्रभावापासून काहीशी अलग आहेत. परंतु, रशिया, उत्तर कोरिया व चीन ही तिन्ही राष्ट्रे अण्वस्त्रधारी असल्याने त्यांच्या आक्रमक पवित्र्याचा धोका इतर राष्ट्रांना उद्भवणार नाही, याची काळजी अन्य देशांना घ्यावी लागेल. याचे आणखी एक कारण म्हणजे, या तिन्ही राष्ट्रांची पाकिस्तान व इराण या देशांबरोबर असलेली जवळीक व त्यातून निर्माण होणारी जागतिक राजकारणातील रस्सीखेच याकडे भारतासह अमेरिका व अन्य लोकशाही देशांना लक्ष द्यावे लागेल. एकीकडे सौदी अरेबियाचे राजे महंमद बिन सलामान अल सौद यांनी इशारा दिला आहे, की इराणने अण्वस्त्र निर्मिती केल्यास आपणही त्याची निर्मिती करू. सौदी अरेबिया व अण्वस्त्रधारी इस्त्राएल यांचे संबंध सुधारले आहेत. दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष व्होल्देमीर झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रंघाच्या सर्वसाधारण सभेपुढे केलेल्या भाषणात सदस्य राष्ट्रांना आवाहन केले आहे, की सुरक्षा मंडळाचा सदस्य या नात्याने मिळणाऱ्या विशेषाधिकारापासून (व्हीटो अधिकार) युद्धखोर रशियाला वंचित केले पाहिजे.
वेगाने घडणाऱ्या या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत, हेच प्रत्ययास येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.