पावसाची रिपरिप चालूच होती. नुकताच पावसाने जोर धरला होता. दिवसभरात रानात काम करून थकलेले देह चार घास पोटात ढकलून पहुडले होते. रातकिड्यांचा किर्र.. किर्र.. असा आवाज पावसाच्या रिपरिपीला भेदत थेट कानात घुसत होता. अमावस्येनंतर दोनच दिवस उलटल्याने सगळा काळोख पसरला होता. शाळेच्या पडवीत काही पोरं मोबाईलवर रील बघत आवाज करत होती... एवढाच काय तो उजेड अन् बडबड... बाकी सगळी शांतता!
'पडवी'तल्या बाजावर झोपलेल्या 'किसन'चे वळचणीच्या टीप टीप पडणाऱ्या पाण्यावर डोळे स्थिरावले होते. त्याच्या मनात असंख्य विचारांनी काहूर माजवलं होतं. यंदा पावसाने उशीरा हजेरी लावल्याने मनात भातशेतीची धास्ती होती. 'खासरं' पाण्याने भरली असली तरी अनेकांची रोपं वाया गेली होती. काहींच्या लागवडी अजून बाकी होत्या त्यामुळं भातशेतीवर वर्ष काढणं कठीण होतं, हाच विचार त्याच्या मनात घोळत होता.
इर्शाळगडाच्या पायथ्याशी गाव असल्यामुळं काही कुटुंबाचं पर्यटनावर उदर्निर्वाह होत होता. त्यामुळं कसंतरी कुटुंब चालत होतं. पोरांच्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्याचा खर्च वाढणार होता, एक लेक आश्रम शाळेत शिक्षणाला पाठवली होती, ती दीड महिन्यापासून गेलेली. याच विचाराने बाजावर पहुडलेल्या किसनला डोळा लागत नव्हता.
कोल्हेकुईच्या आवाजामुळे काहीजण उठून घोंगटा अंगावर घेऊन लघवीसाठी बाहेर पडले होते. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. शाळेच्या पडवीत मोबाईल बघत बसलेल्या पोरांचा आवाज चालूच होता. पावसाने जोर धरला होता.. अचाकन या रिपरिपीच्या आवाजाला भेदत धाड धाड असा काळजात धडकी भरवणारा आवाज आला.
आवाज ऐकून शाळेत बसलेल्या पोरांनी ओरडायला सुरूवात केली. हा कर्कश आवाज चर्र करत काळजात घुसत होता. पोरं आरडाओरडा करत गावात पळत येत होती. काय झालं कळायला मार्ग नव्हता. अंग लटलट करत होतं. आरडाओरडीचा आवाज या पावसाच्या रिपरिपीतही आसमंतात घुमत होता. एवढे दिवस गावचं रक्षण करणारा पहाड आता राक्षसासारखा गावाचा काळ बनला होता.
बघता बघता धाडधाड करत मोठमोठे दगड एका प्रलयाच्या रूपाने कोसळत होते. बाहेर झोपलेल्या काही म्हाताऱ्यांना याची कुणकुण लागताच घरातल्या व्यक्तींना बाहेर काढण्याची त्यांनी तयारी केली होती पण क्षणातच एक एक करत घरं मातीखाली गाडली जात होती. चार दोन बायाबापड्या बाहेरचा गोंधळ ऐकायला आल्यानंतर आपल्या लेकरांना घेऊन बाहेर पडत होत्या. नुकताच डोळा लागलेल्या लोकांना काय झालंय हे कळेपर्यंत अख्खा पहाड गावावर काळासारखा कोसळला.
कित्येकांच्या डोळ्यादेखत क्षणातंच अख्खं गाव मातीत गाडलं गेलं.. कित्येकाचे संसार संपले, चुली विझल्या, कायमच्याच... अन् जे झोपले होते ते कायमचेच झोपी गेले. उरले होते फक्त काळाला हुलकावणी दिलेले, मरण अनुभवून पुनर्जन्म झालेले अन् सगळं काही गमावलेले पामर... मध्यरात्रीच्या काळोखात आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील रिपरिपणाऱ्या पावसांच्या आवाजात रात्रभर फक्त लेकरांच्या, बायकांच्या आक्रोशाचा आणि हंबरड्यांचा आवाज घुमत होता.
मध्यरात्रीच बचावकार्य सुरू झालं, मंत्री आले मुख्यमंत्री आले. लांबून लांबून लोकं पाहण्यासाठी आले. बचावकार्यात काही मृतहेद बाहेर काढण्यात आले. काही तसेच अजूनही दबून राहिले. आश्रमशाळेत शिकणाऱ्या किसनच्या मुलीला आणण्यात आलं होतं, त्या कोवळ्या पोरीला काय झालंय हे कळंत होतं की नव्हतं कुणास ठाऊक.. पण आई... आई... म्हणत तिच्या रडण्याचा आवाज काळजात कालवाकालव करत होता.
'तिच्या घरात कुणीच राहिलं नाही, सगळे गेले... ती शिकायला होती म्हणून वाचली' असं आजूबाजूच्या बाया सांगत होत्या. कुणाचा भाऊ, कुणाचा बाप, कुणाची आई, कुणाची भावजय, कुणाचा नवरा तर कुणाचे अख्खे कुटुंबंच या प्रलयात गडप झालं होतं... सोन्यासारखं गावच नाहीसं झालं होतं.
आता घटनास्थळी माती उकरून मृतदेह काढले जाणार... काही दबलेले तसेच राहणार. उरल्यासुरलेल्यांचं पुनर्वसन होणार, तुटल्या काळजाने काहीतरी हरवल्यागत मागेपुढे बघत ही जागा सोडावी लागणार, उद्या या 'उपऱ्यां'ना नवे कोरे करकरीत घरे मिळतीलही पण पुढच्या पिढीला डोळ्याने बघितलेला अन् अनुभवलेला ज्वलंत इतिहास सांगावा लागेल, "कोणे एके काळी या ठिकाणी, एक होती इर्शाळवाडी...!"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.