बळीराजाची ढाल नानाभाऊ

नाना पटोले यांना सुरूवातीपासूनच समाजकार्यात रस होता. "माझ्यावर समाजकार्याचे संस्कार माझ्या घरच्यांमुळे झाले" असे ते सांगतात.
maharashtra politics and corruption nana patole social work details explain
maharashtra politics and corruption nana patole social work details explainsakal
Updated on

राजकारण म्हटले की भ्रष्टाचार आलाच. आपण त्यापासून दूरच राहिलेले उत्तम या आपल्या वडिलांच्या मताला नाकारत राजकारणात येणाऱ्या आणि त्यातूनच समाजाचे भले करता येईल असा विश्वास बाळगणाऱ्या नाना पटोले यांचा जन्म ५ जून १९६३ रोजी गोंदियात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण साकोली, गोंदिया, चंद्रपूर इथल्या जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये झाले. याच शाळांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली.

नाना फाल्गुनराव पटोलेंनी बी. ए. पर्यंतचे शिक्षण साकोलीतल्या मनोहरभाई पटेल महाविद्यालय (एम. बी. पी. सी.) मधून पूर्ण केले. त्यांचा जन्मच शेतकरी कुटुंबात झाल्याने ते लहानपणापासूनच शेतात राबत आले आहेत. त्यांचे वडील कृषी अधिकारी होते तर आई गृहिणी होती. फाल्गुनरावांना खादी व खाकी या दोन्हींचा तिटकारा होता.

"या क्षेत्रात भ्रष्ट्राचाराचे प्रमाण खूप आहे त्यामुळे आपण या सगळ्या पासून लांब राहिलेलेच बरे," असे त्यांचे मत होते. पण राजकीय व्यवस्थेत गोरगरीबांचा, शेतकऱ्यांचा सतत होणारा अपमान नाना पटोले यांना सहन होणारा नव्हता. "देशात अन्नदात्याची ही काय अवस्था आहे?" हा प्रश्न त्यांना सतत सतावत होता.

त्यांनी तरूणपणी पिकवलेला ऊस फॅक्टरीमध्ये नाकारण्यात आल्यामुळे तो ऊस पेटवून देण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. आपण पिकवलेला ऊस पेटत असताना बघून नाना पटोलेंना अश्रू अवरेनात आणि तेव्हाच त्यांनी "अन्नदात्याला त्याचा हक्क मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही," अशी प्रतिज्ञा केली. पुढे ही लढाई फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मर्यादित न राहता 'समान मानवी हक्कांची' झाली.

नाना पटोले यांना सुरूवातीपासूनच समाजकार्यात रस होता. "माझ्यावर समाजकार्याचे संस्कार माझ्या घरच्यांमुळे झाले" असे ते सांगतात. समाजकार्य करताना अनेकांची दुःखे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली आणि या सगळ्या समस्या मुळापासून नष्ट करायच्या असतील तर आपल्याकडे योग्य ती शक्ती हवी जी आपल्याला राजकारणातून मिळेल, असे त्यांनी ठरवले.

त्यामुळे "राजकारण वाईट आहे असं म्हणत बसून काही अर्थ नाही, आपण स्वतः या क्षेत्रात उतरून काम केले पाहिजे" असा विचार करून वडिलांच्या मताला छेद देत, गोरगरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाना पटोले राजकारणात आले.

नाना पटोले यांनी कॉलेजमधील निवडणुकांमध्ये भाग घेत स्वतःला उत्तम नेतृत्व म्हणून घडवलं. त्यानंतर भंडारा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतील निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली व त्यातही ते विजयी झाले. १९९० साली भंडारा जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली.

त्यानंतर नानाभाऊंनी विधानसभेवर आपले लक्ष केंद्रित केले. पुढे १९९८ - १९९९ मध्ये ते साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. २००४ साली त्यांनी दुसऱ्यांदा विधानसभेची जागा राखली. नाना पटोले यांनी २००८ साली काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

२०१४ मध्ये ते भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवडून आले. ते २०१४ साली विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वने या विषयावरील स्थायी समितीचे सदस्य होते. २०१५ ते २०१७ या काळात रेल्वे अधिवेशन समिती (आर. सी. सी.) आणि कृषी मंत्रालयातील सल्लागार समितीचे सदस्य होते.

त्यांनी ८ डिसेंबर २०१७ रोजी शेतकरी व इतर मागासवर्गाच्या प्रश्नांवरून झालेल्या वादामुळे लोकसभा सदस्यत्वाचा व भारतीय जनता पक्षातून राजीनामा दिला. पक्ष सत्तेत असताना असे कठोर पाऊल उचलायला खूप मोठे धाडस लागते. ते नानाभाऊंकडे सुरूवातीपासूनच आहे.

त्यानंतर २०१८ मध्ये नाना पटोले यांची किसान काँग्रेसच्या अधक्षपदी नेमणूक करण्यात आली. २०१९ मध्ये ते विधानसभा अध्यक्षपदी नेमले गेले. त्यानंतर २०२१ साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

नाना पटोले हे जितके विद्रोही, बेधडक आहेत तितकेच ते हळव्या मनाचेही आहेत हे आपल्याला त्यांच्या वागण्यातून दिसून येते. ते कधीच कोणत्याच बाबतीत भेदभाव करत नाहीत. त्यांच्या दरी आलेल्या प्रत्येक माणसाला ते या ना त्या प्रकारे मदत करतात.

सरकारचा वनजमीन कायद्याचा आदेश येताच अनेक शेतकरी व आदिवासी लोक नाना पटोले यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले. त्या कायद्यामुळे शेतकरी व काही आदिवासी लोक राहत असलेली जमीन त्यांच्याकडून हिसकावून घेतली जाणार होती आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.

पण नानाभाऊंनी लगेच त्यांच्या पाठीशी उभे राहत आंदोलन पुकारले. त्यामुळे शेतकरी व अनेक आदिवासी लोकांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या. नाना पटोले आजवर फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्व समाजतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

त्यांनी अनेक जातीजमातींचा उद्धार करण्यासाठी, त्यांना शासनाच्या योजनेत फायदा व्हावा, शिक्षणाच्या योग्य संधी उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने अनेक विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग यांचा समावेश इतर मागासवर्ग प्रवर्गामध्ये करून घेण्याचा प्रयत्न केला. नानाभाऊंनी अनेक लोकांना आर्थिक मदत पुरवून त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत. त्यांच्या गावात गेल्यावर आपल्याला अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.

नाना पटोले यांनी सुरूवातीपासूनच राजकारणापेक्षाही समाजकारणावर जास्त भर दिला आहे. त्यांनी आपले आयुष्य जनतेसाठी वेचले आहे. ते आपला वाढदिवसदेखील जनसामान्यांसोबतच साजरा करतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गावात भागवत पुराणाच्या कार्यक्रमाचे आयोजन होते.

फूटपाथवरील दुकानदारांना छत्री वाटप, लोकगीतांचे कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबवले जातात. पहिल्या वेळी आमदार असताना नाना पटोले यांनी ‘पलास’ या गावात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याची प्रथा सुरू केली. ही प्रथा पुढे १० ते १५ वर्ष त्यांनी सातत्याने सुरू ठेवली. या कालावधीत त्यांनी दरवर्षी किमान २५० जोडप्यांचा सामूहिक विवाह करून त्यांचा संसार थाटून दिला. नाना पटोले यांचे ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण झाले त्या शाळेच्या नूतनीकरणाचे कामदेखील त्यांनी केले.

“पुढील पिढी आपल्याहून अधिक सक्षम होईल आणि आपल्याला न मिळालेल्या सुविधा पुढच्या पिढीला मिळाव्यात,” असे नानाभाऊंना नेहमी वाटते. त्यांनी आपल्या मतदारसंघाचा व गावाचाही सर्वांगीण विकास केला आहे. त्यांनी छावा संग्राम परिषदेच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगार व रोजगाराभिमुख प्रशिक्षण योजनांना चालना दिली.

पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, रोजगार मेळावे, कौशल्य विकास कार्यशाळा असे विविध उपक्रम त्यांनी राबवले व त्याचा लाभ शेकडो विद्यार्थ्यांना झाला आहे. ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने पोलिस विभागात कार्यरत आहेत.

तसेच ओबीसीवरील अन्यायाविरोधात लाखांदूर ते भंडारा लाँगमार्च असो, शेतकऱ्यांसाठी भंडारा ते नागपूर बैलबंडी मोर्चा असो, आदिवासींना शेत जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी मध्यवर्ती कारागृहातील उपोषण असो, अशा प्रत्येक बाबतीत नानाभाऊ पटोले यांनी निःस्वार्थपणे आंदोलने उभारून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.

जिल्हा मुख्यालय भंडाऱ्यात असल्याने जिल्हा रूग्णालयदेखील भंडारा शहरातच आहे. मात्र आपल्या मतदारसंघात एक उपजिल्हा रुग्णालय उभारावे. त्याचा फायदा साकोली, लाखानी, लाखांदूर या तिन्ही तालुक्यातील जनतेला मिळेल असा विचार करून त्यांनी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयाची संकल्पना मांडली आणि केवळ संकल्पनाच मांडून ते गप्प बसले नाहीत, तर या विस्तारित उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यारंभही झाला.

भंडारा जिल्हा हा धानउत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. येथील शेतकऱ्यांना धानउत्पादनानंतर त्याची साठवणूक करणे हे मोठे महत्त्वाचे काम असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी १२ धान गोदाम मंजूर करण्यात आले असून त्यांचेही काम वेगाने सुरू आहे.

तसेच भंडारा जिल्ह्यात पाणीदेखील मुबलक प्रमाणात आहे. मात्र, या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी चुलबंद नदीवर जलसंधारण विभागाच्या माध्यमातून बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.

पावसाळ्यात अनेक छोटे पूल पाण्याखाली येत असत. त्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटत होता. परिणामी, स्थानिक नागरिकांना आणि ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. आता सर्व पुलांची उंची वाढवून दोन्ही बाजूंच्या गावांना जोडणारी वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. त्याचा मोठा फायदा विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात सर्वच नागरिकांना होतो.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, विविध स्पर्धापरीक्षा, त्याचबरोबर आधुनिक गोष्टींबद्दल, तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी यासाठी मोफत अभ्यासिका, एम. पी. एस. सी. मार्गदर्शन केंद्र त्यांच्या मार्गदर्शनात सुरू आहेत. जनसेवा व विकास कार्यासाठी सज्ज नाना पटोले सतत जनहिताचा विचार करतात. मागासवर्गीय व गोरगरीबांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे त्यांची जनतेतील लोकप्रियता खूप आहे. म्हणूनच लोकांनी त्यांना बळीराजाची ढाल, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारा माणूस, राजकारणी नाही तर समाजकारणी अशा अनेक उपमा दिल्या आहेत.

 Facebook link Nana Patole

https://www.facebook.com/nanapatoleinc?mibextid=ZbWKwL

 Instagram link Nana Patole

https://www.instagram.com/nanapatoleinc?igsh=MTJiYm56c21veTV5NA==

 Twitter link Nana Patole

https://x.com/NANA_PATOLE?t=N2H_xQP8h6AMQVFp-bsD3Q&s=09

 YouTube link Nana Patole

https://www.youtube.com/@nanapatoleinc

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.