गोफण | काकांची खेळी अन् दादारावांची दिल्लीवारी

sakal gofan article
sakal gofan articleesakal
Updated on

दिल्लीत जाम थंडी पडली होती. सगळं शहर दाट धुक्याच्या सावटाखाली गेलेलं... भल्या पहाटे बारामतीहून आलेली एक खटारा बस हेलकावे खात-खात.. खडाडाक्..खडाक् आवाज करत राजधानीत दाखल झाली. बसवर कुणाचं चित्र होतं आणि त्या बसची अवस्था काय होती; हे त्या बसमध्ये बसलेल्या एका विशिष्ट प्रवाशाला चांगलं ठाऊक होतं. त्यांनीच कधीकाळी त्याच बसविरोधात सभागृहात आवाज उठवला होता म्हणे-

असो, तर बसमधून ते सद्गृहस्थ अगदी हळूवारपणे उतरले. अंगावर शॉल, मफलरीने अर्धवट झाकलेला चेहरा अन् हातात ट्रंक घेऊन ते चालू लागले. मागच्या पंधरा दिवसांपासून ते आजारी असावेत, असं बघणाऱ्यांना वाटू लागलं.. किंवा तसं वाटावं म्हणून ते अडखळत..अडखळत पावलं टाकीत.. एका क्षणापुरतं, कोसळतात की काय; असही वाटून गेलं.

ते सद्गृहस्थ दुसरे-तिसरे कुणी नव्हते. आपलेच दादाराव दणगटे होते. दादाराव दणगटेंचं नाव बदलून 'दावेदार दादाराव दणगटे' असं निर्धोकपणे ठेवावं, असा प्रस्ताव कुठल्यातरी ग्रामपंचायतीने मागे मंजूर केला होता म्हणे. कारण वर्षामागून वर्षे जात होती परंतु त्यांचे दावे फळाला येत नव्हते. तरीही दादारांवांनी त्याकडे दुर्लक्ष करुन पुन्हा दावेदारीच्या मोहिमा फुरफुरत ठेवल्या होत्या. तेच दादाराव.. त्याच दावेदारीच्या कामकाजासाठी आज राजधानीत दाखल झाले.

काही केल्या जहागिरी पदरात पाडून घ्यायची, असं म्हणून दादाराव निर्वाणीची बोलणी करण्यासाठी बादशहाच्या भेटीसाठी राजधानीत आलेले. दिल्लीचे बादशहा मोटाभाई गुजराती दिवान-ए-आममध्ये बसलेले होते. तिथेच भेटीची योजना होती. मागे जेव्हा महाराष्ट्र मुलुखाचे विद्यमान जहागीरदार दिल्लीस आलेले तेव्हा त्यांची भेट दिवान-ए-खासमध्ये ठेवली होती. याची सल दादारावांना बोचू लागली.

दादाराव दरबारात पाय ठेवताच मोटाभाई तेवढ्याच मोठ्याने बोललो, आओ..आओS दादाराव तशरीफ रखो, आप आये बहार आई... इस सुनेसुने महल में खुशबू छा गयी है. कैसे हो? सुना हैं आपकी तबियत कुछ नरम-गरम हैं... हुआ क्या?

आधीच दादाराव दुखण्यातून उठलेले.. त्यात एवढा लांबचा प्रवास अन् हातात ट्रंकेचं ओझ.. त्यावर अशा निराळ्या ढंगात झालेला प्रश्नांचा भडिमार बघून दादारावांनी थेट मराठवाड्यातली हिंदी सुरु केली. कायकी तशरीफन् फिरशीप... इथं सगळं वाट्टुळं व्हायची येळ आली आन् तुमच्या दुसऱ्याच गप्पा सुरुयत. आता काय ते फायनल सांगून टाका?

''क्या हुआ दादाराव? इतने परेशान क्यूं हो?'' एखाद्या सराईत शिकाऱ्याने जाळ्यात अडकलेल्या हरिणीला कुरवाळावं तसं मोटाभाई मऊ-मऊ बोलत होते. दादारावांना बाकीच्या गप्पांमध्ये इंटरेस्टच नव्हताच मुळी. ते आता 'करेंगे या मरेंगे' या भूमिकेवर येऊन ठेपले होते.

दादाराव मोठ्याने बोलले, आमच्या जहागिरीचं काय झालं ते सांगा? चार महिने झालं; देतो-देतो-देतो... लावलंय. आमी काय खुळेत का काय? धोतरावर इन करतो का आमी? का बगलात रेड्यूवय आमच्या? कुठल्यातरी साध्या मनसबदारासाठी एवढ्या मोठ्या वतनदाराला तुमी ताटकळत ठेवलंय... का म्हणून?

मोटाभाईंनी नेहमीप्रमाणे सगळं शांतपणे ऐकून घेतलं. ''करेंगे ना दादाराव.. क्यूं इतना गुस्सा होते हो.. तबियत संभालो.. सर सलामत तो पगडी पचास.. समझें? कर देंगे आपको भी जहागीरदार आगे-पिछे'' त्यावर दादाराव लगोलग बोलले- ''आगे नाही आन् पिछेभी नाही... अभी के अभी बोलो. तुमारे लिये इतना सब किया, अब तुम धोका दे रहें..ऐसा रैताय क्या?''

तसं पाहिलं तर दादाराव चिरडीला आले होते. चाणाक्ष मोटाभाईंनी जरासा विषय वळवला. ''वो ट्रंक में हैं क्या? दिवाली का फराल लाए हो क्या?''

दादाराव त्याच मराठावाडा स्टाईलमध्ये उत्तरले- ''काय का फराल? मैकोच फराल-बिराल कुछ नहीं मिल रा.. तुमको कहाँ से लावू... हमारे काकाने धमकाया हैं-''

''क्या..क्या? धमकाया? काकाने? क्योंSS...''

मोटाभाईंच्या प्रश्नाला दादारावांनी उत्तर दिलं. ''जबतक जहागिरी नहीं तब तक फराल नहीं... सबके सामने हमको चेतावणी देदी उन्होने और उधरसे डायरेक्ट इधर भेजा...''

हे ऐकून मोटाभाई ढेरीतल्या ढेरीत हसले. ''वो सब ठीक हैं.. लेकिन उस ट्रंक में क्या हैं?''

दादारावांनी, ''कुछ नहीं'' असं म्हणून ट्रंक लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

''अरे बताओ भी हैं क्या?'' दादाराव अपराधीपणातल्या निराळ्याच लाडात येऊन बोलले, ''वो हमारे पुरावे हैं''

''पुरावे.. कैसे पुरावे? काय के पुरावे?'' मोटाभाईंचे प्रश्नामागून प्रश्न

दादाराव बोलले, ''वो हमारे यानी मेरेवाले गटने ज्यादा ग्रामपंचायत जिते हैं और काका के गट ने बहुत कम... इसके पुरावे हैं'' दादारावांच्या हिंदीवर मोटाभाईंना खरंतर हसायचं होतं. पण त्याहीपेक्षा कुतूहल मोठं होतं.

''तो.. क्या करोगे इसका?'' मोटाभाईंचा आश्चर्यवाचक प्रश्नाला दादारावंनी अडखळत उत्तर दिलं-

''वो काका बोले, आते-आते आयोग में जाकर दे आओ... फिर दोनो कामा एकही चक्कर में हो जाएंगे... मेरे गट ने काका से ज्यादा जिते हैं.. मालूम हैं?''

शेवटचं 'मालूम हैं' निव्वळ बारक्या पोरांच्या स्टाईलमधलं होतं. त्यावर मोटाभाईंनी तोच टोन धरुन म्हटलं, ''अच्छा.. ये तो बहुत बडी बात हैं. आप तो बहुत ज्यादा लोगो को चुनके लाते हो.. तो एक काम करो विधानसभा में भी इतनेही लाओ.. फिर बनाऐंगे तुमको जहागीरदार.. समझे?''

''नक्की बनाओगे ना? नहीं तो काका बहुत गुस्सा करेंगे.. आप कहते हो तो इससे बडी ट्रंक लेके मैं इलेक्शन के बाद आऊंगा...''

''हाँ..हाँ.. लाओ-लाओ'' असं म्हणून मोटाभाईंनी दादारावांना पुन्हा एकदा फसवलं होतं.

मग दादाराव आयोगाच्या कार्यालयात 'आम्हीच खरे' असं ठासून सांगायला पुरावे घेऊन गेले. भविष्यात आपण मुलुखाचे जहागिरदार होणार, याचा आनंद गगनात मावत नव्हता...

समाप्त!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.