राजाराम सूर्यवंशी
एक जुने सत्यशोधक लेखक पांडुरंग बाळाजी कवाडे यांनी १९६८ साली महात्मा जोतीराव फुलेंवर ' महात्मा जोतीराव फुले यांचे चरित्र' हे २१२पानी ग्रंथ नांदगावच्या रंगनाथ त्र्यंबक रत्नपारखी प्रकाशनातर्फे प्रकाशित केला होता.
किंमत फक्त २ रुपये होती. तेव्हा महात्मा फुलेंच्या निर्वाणाला ७८ वर्षे झाली होती , तर बाबासाहेबांच्या महानिर्वाणाला फक्त ९ वर्ष झाली होती. अर्थात पांडुरंग बाळाजी कवडे हे वारकरी सत्यशोधक बाबासाहेबांच्या जीवन-कार्याचे प्रत्यक्ष आयवीटनेस होते.
या मौलिक ग्रंथाच्या पान नं.६७ वर कवडे लिहितात की ,- " अस्पृश्यतेचा नायनाट फक्त अस्पृश्य समाजातील सुशिक्षितच करु शकतील हे जोतीरावांचे मत प्रत्यक्षात डाॕ बाबासाहेब आंबेडकर या जन्मजात पुढाऱ्याने कृतीने प्रत्यक्षात करुन दाखविले.अस्पृश्यता निवारण्याच्या बाबतीत अस्पृश्य समाजातील सुशिक्षित अशा जन्मजात पुढाऱ्यांनी पोटतिडीकीने व आतड्याच्या तळमळ्या कळवळ्याने जेवढे कार्य केले तसे आजपर्यंत कोणासहि करता आले नाही. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात -
"आजवर महात्मा गांधींप्रमाणे अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील मोठा कलंक आहे असे आम्ही मानीत होतो.पण आता आमची दृष्टी फिरली आहे -तो आमच्या नरदेहावरील कलंक आहे असे आम्ही मानतो.हा हिंदू धर्मावरील कलंक आहे असे जोपर्यंत आम्ही मानीत होतो तोपर्यंत तो काढून टाकण्याचे कार्य आम्ही तुमच्यावर सोपविले होते.हा आमच्यावरील कलंक आहे, अशी आमची जाणीव झाल्यामुळे तो धुऊन काढण्याचे पवित्र कार्य आता आमचे आम्हीच स्वीकारले आहे.या कार्याच्या सिध्दीप्रीत्यर्थ आमच्यापैकी काहीजणांना आत्मयज्ञ करावा लागला तरी आम्ही मागेपुढे पाहणार नाही."(संदर्भ -ब.भा.ता.२२-४-१९२७)
डाॕ.बाबासाहेब आंबेडकर एकेठिकाणी म्हणतात---" अस्पृश्यात माणुसकीची जाणीव म.फुले यांच्या शिक्षणप्रसाराच्या कार्यामुळे झाली.आजपर्यंत ज्यांना अवतारी पुरुष म्हणून मानण्यात येत आहे त्या साऱ्यांनी अस्पृश्यता जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले इतकेच नाही तर तिच्या वाढीसाठी ते झटत होते.अस्पृश्यता गाडण्याचा खरा प्रयत्न करणारा एकच अवतारी पुरुष.तो म्हणजे महात्मा फुले.".
जातिव्यवस्था व जातिभेदाची उच्वर्णियांकडून होणाऱ्या कडक अंमलबजावणीमुळे अस्पृश्य समाजाचे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत भयंकर हाल होत असत.स्वातंत्र्यानंतरही पहिल्या तीन दशकांपर्यंत कित्येक ठिकाणी त्यांना सार्वजनिक विहिरीतून राजरोस पाणी भरता येत नसे.या पार्श्वभुमीवर डाॕ. बाबा आढावांना म.फुलेंचं कार्य पुढे नेणारी 'एक गाव एक पाणवाठा' ही क्रांतिकारी चळवळ हाती घ्यावी लागली होती. परंतु त्याकाळी सकाळी महार असलेला इसम दुपारी मुसलमान झाल्यास सायंकाळी तो राजरोस सार्वजनिक ठिकाणी पाणी भरु शकतो,त्यात हिंदूंचा वर्णाभिमान अगर धर्माचा प्रश्न आडवा येत नाही हे त्याकाळी म.फुलेंनी स्पृश्य समाजास पटविण्याचा प्रयत्न केला होता.
मानवी हक्काच्या उच्च तत्वास जागून फुले दाम्पत्यांनी स्वतःची विहिर अस्पृश्यांसाठी मोकळी केली होती.परंतु अस्पृश्य समाज पाप-पुण्य व प्रारब्धाच्या काल्पनिक भीतीमुळे या विहिरीवर पाणी भरण्यास धजेनात,अशावेळी जोतिराव व सावित्रीबाईंनी पाण्याचे माठ त्यांच्या डोक्यावर स्वहस्ते ठेवून हजारो वर्षे जिवंत असलेली त्यांची मानसिक गुलामगिरीची भावना नष्ट केली होती .
पाण्याने लावली ओली आग !
हिंदूधर्म व हिंदूंची उच्चवर्णिय संस्कृती यांस म.फुलेंनी अस्पृश्यांसाठी आपली वाड्यातली पाण्याची विहिर खुली करुन जणू ओली आगच लावली , अशी सनातन्यांची भावना झाली होती.
पाणी पाणी म्हणून एखाद्या अस्पृश्याचा प्राण जाण्याची वेळ आली तरी त्याला स्पर्श करुन त्याच्या तोंडात पाणी घालू नये अशी जातिव्यवस्थाक धार्मिक संस्कृती असता म.फुलेंनी स्वतःची विहिर अस्पृश्यांसाठी जाहीर रीतीने मोकळी केली व तीत सर्व जातीय बांधवांना पाणी भरण्याचा आग्रह स्वतः केला ही त्यांची कृती भारतीय वर्णजातिव्यवस्थाक तत्वाला आग लावणारी आहे ,असे भविष्य त्यावेळी कर्मठ-सनातन्यांनी व्यक्त केले होते.
कर्मकांच्या उपरोक्त भविष्याप्रमाणे पाण्यामुळेच डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला आग लावली होती. महाड येथील सार्वजनिक तळ्यातील पाणी पिण्यासाठी त्यांनी हजारो अस्पृश्य स्त्रीपुरुषांच्या संख्येने सत्त्याग्रह पुकारला तेव्हा कर्मक हिंदूनी त्यांना जळजळीत विरोध केला .या त्यांच्या विरोधाचा उगम जातिव्यवस्तेत होता व जातिव्यवस्थेचा उगम मनुस्मृतीत होता. त्या मनुस्मृतीनेच हिंदू समाजातील कृत्रिम वर्ण-जातीभेदाचे संगोपण करुन त्यांना जिवंत ठेवले होते.म्हणून तो ग्रंथच बाबासाहेबांनी जाहिर रीतीने प्रथम जाळला.व जातीभेदाच्या समुळ उच्चाटन करण्याच्या जोतीराव फुलेंच्या विचारांना डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी कृतीशील साथ दिली.
वक्तृत्व ,करारीपणा,राजकारणात पारंगतता,अस्पृश्य समाजाभद्दल ज्वलंत व जागृत अशी तळमळ व सनातन्यांकडून अस्पृश्यांवर केलेल्या अमानवीय जुलमांची ऐतिहासिक परतफेड करणारा अद्वितीय असा महापुरुष म्हणून डाॕ.भिमराव रावजी आंबेडकर जे उभे राहिले त्यास महात्मा जोतीराव फुलेंची अस्पृश्योध्दाराची पार्श्वभुमी लाभली होती.परिणामी बाबासाहेबांनी सारा भारत ढावळून काढला. अस्पृश्य समाजाला स्वाभिमान व माणुसकीच्या हक्कासाठी झगडण्याचे धैर्य दिले.
महात्मा जोतीराव फुलैंनी अस्पृश्योध्दाराचा मार्ग मोकळा केला म्हणून डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष भारतातच नव्हे तर विश्वरत्न म्हणून साऱ्या जगात चमकले.
बौध्दधर्माची मुळ जन्मभुमी भारत ! परंतु हिंदूधर्माच्या हिंसक आक्रमणामुळे तो भारतातून जवळ जवळ नामशेष झाला होता.त्या भगवान बुध्दाबद्दल म.फुलेंना आत्यंतिक आदर होता.महात्मा फुले यांचे बाबासाहेब हे एकनिष्ट भक्त होते व ते म.फुलेंना गुरुस्थानी मानीत.त्यामूळे बौध्दधर्माबद्दल त्यांच्या ठिकाणी आकर्षण निर्माण होऊन ,त्या नामशेष झालेल्या बौध्दधर्माचे करोडो अनुयायी बाबासाहेबांमुळे आज भारतात दिसत आहेत.याचे मुळ कारणही महात्मा फुले आहेत.
महात्मा फुलेंची भविष्यवाणी बाबासाहेबांनी खरी ठरविली !..
महात्मा फुलेंनी अशी भविष्यवाणी केली होती की,.." जेव्हा शूद्रांची किंवा अतिशूद्रांची मुले ज्ञानप्राप्ती करतील त्यामुळे असा एक दिवस उजाडेल की, त्यांच्यापैकी एखादी मोठी विभूती आमच्या थडग्यावर फुले पसरुन आमच्या नावाने जयजयकार करतील "
ही भविष्यवाणी डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत खरी ठरली आहे.बाबासाहेब महात्मा फुलेंना अवतारी पुरुष मानून सर्वश्रेष्ठ महात्मा समजत.व अस्पृश्यांचा खरा उध्दारकर्ता मानीत.
विद्रोही संत तुकाराम महाराज म्हणत..
" देव देव शोधावया गेलो ! स्वतः देव होऊनी आलो..!! त्याप्रमाणे डाॕ.बाबासाहेब आंबेडकर हे म. जोतीराव फुलेंमध्ये खरा महात्मा व खरा अस्पृश्योध्दारक शोधता शोधता स्वतःच अस्पृश्योद्धारक , महामानव व विश्वरत्न म्हणून आपल्यात परतले होते !
महात्मा जोतीराव फुले व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित आकलन करतांना त्यांच्यात जो अंर्तगत संबंध आम्हाला उमगला तो असा होता. या अंतर्गत संबंधांचा समान धागा जातिव्यवस्थाअंताचा होता. सामाजिक समता प्रस्तापित करणारा होता.म्हणून फुले-आंबेडकरी तत्वज्ञान हे सामाजिक समतेचे व जातिव्यवस्थाअंताचे तत्वज्ञान बनले होते ,विचारधारा बनले होते.
ब्रिटिशांच्या आगमनाबरोबर भारतीय समाजव्यवस्थेने औद्योगीकरणाची कास धरली होती.आतापर्यंत भारतीय वर्णजातीव्यवस्थेने या शूद्रातिशूद्रांना फक्त अकुशल शोषित घटक म्हणून जन्माला घातले होते.त्यांना जातीय आणि धार्मिक गुलामगिरीतुन मुक्त न करता उच्चवर्णिय भटजी व लाटजींकडून आता वर्गीय अर्थात शूद्रांतिशुद्रांच्या शोषणावर आधारित आर्थिक गुलामगिरी लादण्याचे कार्य हाती घेतले होते. भटजी-लाटजींची ही कुटिल नीती लक्षात आल्यामुळे फुले व आंबेडकरांनी सर्व शोषित घटकांना जागृत करण्याचे ,त्यांच्यात स्वाभिमान जागविण्याचे , त्यांची जातीयशोषणाची शृखंला तोडण्याचे कार्य हाती घेतले होते.
भारताच्या येणाऱ्या औद्योगीकरणाच्या रेट्यात हा शोषित घटक व कामगार जगला व टिकला पाहिजे ; म्हणून नारायण मेघाजी लोखंडेंनी त्यांना संघटित करुन त्यांना कुशल कामगार बनविण्याचे कार्य ही हाती घेतले होते.भारतातील सर्व जनजातीतून आलेला या कामगार घटकाचे सर्व जातिय व वर्गिय लढे ना.मे.लोखंडेंनी मार्क्सला न वाचता लढवले होते.
यामागे म.फुलेंचे तत्वज्ञान कारणीभूत आहे ही गोष्ट बाबासाहेबांना ज्ञात होती , म्हणून भारताला मार्क्सची नाही तर बुध्दाची गरज आहे , असे त्यांचे प्रामाणिक मत बनण्याला हा सर्व पुर्व इतिहास कारणीभूत बनला होता ! व तेवढीच कारणीभूत फुले प्रेरणाही होती..!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.