Mallikarjun Kharge: काँग्रेसचे बंडखोर ते काँग्रेस अध्यक्ष, खर्गेंचा प्रवास

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबरला मतदान झालं
Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge sakal
Updated on

तब्बल २४ वर्षांनंतर देशातील सर्वात जुन्या पक्षाला गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभला आहे. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. विशेष म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे यांनी ९० टक्के मताधिकाऱ्यानं विजय मिळवला आहे. आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३६ वे अध्यक्ष बनलेत. त्यातही मागील २ दशकांहून अधिक काळ म्हणजे २४ वर्षे काँग्रेस पक्षावर गांधी-नेहरु घराण्यातील व्यक्तीच अध्यक्ष म्हणून विराजमान होती. पण आता या निवडणुकीत कधीकाळी इंदिरा गांधींविरोधात बंड करणारे खर्गेच कॉंग्रेस अध्यक्ष बनले ?

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत काय झालं?

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबरला मतदान झालं, त्यासाठी देशभरातील ९ हजाराहून अधिक पदाधिकाऱ्यांनी मतदान केलं आणि आज दुपारी त्याचा निकाल लागला. त्यात शशी थरुर यांना १०७२ मतं, तर मल्लिकार्जुन खर्गे तब्बल ७८९८ मतं मिळाली आहेत. म्हणजेच शशी थरुर यांना १० टक्के तर, खर्गेंना ९० टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे आता खर्गेंच्या रुपानं २४ वर्षांनी गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.

अशातच काँग्रेसचा इतिहास काय सांगतो?

काँग्रेस पक्षाला १३७ वर्षांचा इतिहास आहे. १८८५ साली ७२ प्रतिनिधींना घेऊन मुंबईत काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. सुशिक्षित भारतीयांमध्ये सुसंवाद घडवण्याच्या उद्देशानं एलन ऑक्टिव्हियन ह्युम यांनी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. याशिवाय काँग्रेस पक्षाला गांधी-नेहरु घराण्याचा इतिहास आहे. १९१५ साली महात्मा गांधींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, १९२४ साली ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी अशा गांधी घराण्यातील व्यक्तींच्या काँग्रेस सहभागाबद्दल आपल्या सगळ्यांना माहितीच आहे.

त्यातच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी असतानाच गांधी घराण्याच्या दोन व्यक्तींची हत्या झाली. ती म्हणजे १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या तर, १९९१साली राजीव गांधींची हत्या. त्यामुळे काँग्रेसला फक्त घराण्याचा नाही तर, बलिदानाचाही इतिहास आहे, असं राजकारणातील एक वर्ग मानतो.

तर तिकडे घरातील २ व्यक्तींना अचानक गमावल्यानं सोनिया गांधींची राजकारणाबद्दलची नकारात्मक भावना आणखी दृढ झाली. त्यानंतर पुन्हा काँग्रेस पक्षात कार्यरत होण्यासाठी सोनियांना ७ वर्षे लागली. आणि १९९८ साली त्या काँग्रेस अध्यक्षा झाल्या. जे आतापर्यंत कायम होत्या.

आणि आता आज नव्यानं झालेल्या निवडणुकीत २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभला. विशेष म्हणजे आज काँग्रेसची धुरा ज्या मल्लिकार्जुन खर्गेंकडे देण्यात आली आहे, त्याच खर्गेंनी कधी काळी इंदिरा गांधींच्या विचारांशी फारकत घेऊन काँग्रेसला रामराम ठोकला होता. पण मग याच खर्गेंची पुन्हा काँग्रेस वापसी कशी झाली?

१९७० साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देवराज उर्स हे खर्गेंचे गुरु होते. आणीबाणीच्या काळातही इंदिराजींसोबत असणाऱ्या देवराज उर्स यांचा १९७९ साली इंदिरा गांधींशी वाद झाला आणि त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेस उर्स असा नवा पक्ष स्थापन केला. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला विशेष यश मिळालं नाही, फक्त कर्नाटकात एकाच जागेवर विजय मिळवता आला. त्यानंतर खर्गेंनी उर्स यांची साथ सोडली आणि पुन्हा काँग्रेस पक्षाची वाट धरली. त्या दिवसापासून आज २०२२ पर्यंत खर्गे हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते, नेते म्हणून ओळखले जातात.

खर्गे यांचा परिचय सांगायचा झाल्यास, ते कर्नाटकात ८ वेळा आमदार म्हणून निवडून आलेत तर तीन वेळा लोकसभेचे खासदार म्हणूनही निवडून आलेत. याशिवाय केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना दांडगा अनुभव आहे. संघर्ष आणि वादापेक्षाही सहकार्य आणि सहमती मिळवून काम करण्यात त्यांचा हात कुणीच धरु शकत नाही. महाराष्ट्राच्या महाविकासआघाडी सरकार स्थापनेतही खर्गेंचा काँग्रेसकडून मोलाचा वाटा होता.

इतिहासातील सर्वात जुन्या अशा काँग्रेस पक्षाची धुरा आता खर्गेंकडे आली आहे. काँग्रेसच्या इतिहासातला सध्याचा काळ हा पक्षासाठीचा सर्वात मोठ्या संघर्षाचा काळ मानला जातोय. अशातच सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसनं २००४ ते २००९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत यश मिळवलं आणि भारताला यूपीएच्या माध्यमातून स्थिर सरकार दिलं. पण, २०१४ च्या मोदी लाटेनं काँग्रेसचा धुव्वा उडवलाच, शिवाय राहुल गांधींच्या पक्षातील सहभाग आणि नेतृत्वावरही सवाल उपस्थित केले.

त्यामुळे आता राहुल गांधी एकीकडे भारत जोडो यात्रेतून २०२४च्या दृष्टीनं पक्षबांधणीचं काम करत असतानाच खर्गेंच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष कसा उभा राहतो याकडे सर्वांचं लक्ष असेल. काँग्रेस पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस दाखवण्याचं चॅलेंजही खर्गेंपुढे आहे. ते पूर्ण होतं का, हे तर येणारा काळच ठरवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.