कांताबाई सातारकर (kantabai satarkar) यांच्या निधनानं तमाशा कलेतला (folk art) एक महत्त्वपूर्ण दुवा निखळला. समृद्ध लोककलेचा वारसा जपणारं एक घुंगरु हरवलं. मूळच्या सातारकर असणाऱ्या कांताबाईंचं मंगळवारी (ता. 25) वयाच्या 82 व्या वर्षी संगमनेर (जि. नगर) (sangamner) इथं निधन झालं. माझं भाग्य असं, की त्यांच्याशी गप्पा मारण्याची अमूल्य संधी कधीकाळी मला लाभली होती. कांताबाई अन् नागठाण्याची (nagthane) 'माळावरची जत्रा' हे अतूट समीकरण. माळावरच्या जत्रेनं अविस्मरणीय क्षण दिले. सुंदर आठवणी दिल्या. आयुष्यात नानाविध रंग भरले. तमाशा हे या जत्रेचंच एक न विसरता येणारं रूपं. या जत्रेत दरवर्षी विविध तमाशाचे फड (tamasha) दाखल होत. त्यात कांताबाईंचा तमाशा हमखास ठरलेला असे. अशाच एका जत्रेत सुमारे तपापूर्वी कांताबाईंनी उलगडलेला आयुष्याचा प्रवास त्यांच्याच तोंडून ऐकता आला. (memories-of-kantabai-satarkar-article-sunil-shedge-satara-news)
खरं तर या जत्रेत बालपणी दत्ता महाडीक यांचं 'हे असंच चालायचं' हे एकमेव पाहिलेलं वगनाट्य. मात्र या फडाभवती कितीतरी वेळा रेंगाळलो. तंबूच्या काठानं फिरत राहिलो. जे जे टिपता येईल, अनुभवता येईल ते सारं टिपकागदाप्रमाणं टिपत राहिलो. त्यामुळंच विस्मरणीय क्षण वाट्याला आले. दै. 'सकाळ'मध्ये लिहिता झाल्यावर नागठाण्याच्या प्रशांत चव्हाण या परममित्रामुळं एके वर्षी तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांच्याशी गप्पा मारता आल्या. त्याला तेव्हा दैनिकात प्रसिद्धीही लाभली. तमासगीरांच्या वेदनांचं जग थोड्या प्रमाणात का होईना आकळत गेलं.
मग त्यापुढंही जाऊन एकदा कांताबाई सातारकरांसारख्या या क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तिमत्वाशी गप्पा रंगल्या. साताऱ्यातले प्रसिद्ध वृत्तपत्र छायाचित्रकार मित्र नरेंद्र जाधव हे तेव्हा सोबतीला होते. त्यांना तमाशातले काही फोटो हवे होते. त्यामुळं तमाशाच्या पटाचे वेगवेगळे पदर पाहता आले.
रघुवीर खेडकर हे कांताबाईंचे चिरंजीव. त्यांच्याशीही संवाद साधता आला. मंदा, अलका, अनिता या त्यांच्या कन्या, नातवंडं हे सारे सोबत होतेच. बाकीच्यांची सतत ये- जा सुरू होती. ढोलकी अन् घुंगराचा नाद ऐकू येत होताच. नरेंद्रभाऊंचं वेगवेगळ्या कोनातून फोटो घेणं चाललं होतं. मी गप्पांत व्यस्त होतो.
खरं तर कांताबाईंच्या आयुष्याची ती उतरवाट होती. मात्र त्यांच्या उत्साहाला कुठंच ओहोटी दिसत नव्हती. त्यांच्याविषयीचा आदर सर्वत्र कायम होता. पती तुकाराम खेडकर यांचं प्रोत्साहन, नंतर आलेलं अकाली वैधव्य, फडाची जबाबदारी, सततचा संघर्ष, त्यातून मिळालेला लौकीक सारंकाही त्या व्यक्त करत राहिल्या. 2005 मध्ये महाराष्ट्र शासनानं तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला. दिल्लीत आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रसंगी तमाशा सादर करण्याचा बहुमान त्यांना लाभला.
हा सारा प्रवास त्या शब्दबद्ध करत राहिल्या. इतकंच काय, त्यांनी एक ठसकेबाज लावणीही तेव्हा म्हणून दाखवली. माझ्यासाठी ती भेट म्हणजे जणू सुवर्णक्षणच होता. त्याचवेळी आमच्याजवळ एक परदेशी युवती रेंगाळत होती. आम्ही चौकशी केली. ती होती जर्मनीची. पेट्रा हे तिचं नाव. खास तमाशा शिकण्यासाठी ती कांताबाईंच्या फडासोबत राहात होती. पेट्रा मराठी बोलत होती. तिनं नऊवारी साडी नेसली होती. पायात घुंगरू बांधले होते. आम्ही अचंबित झालो. याच पेट्राविषयी पुढं 'पानिपतकार' विश्वास पाटील यांनी आपल्या 'बंदा रुपाया' या पुस्तकातही विस्तारानं लिहिलं.
आता काळाच्या 'सुपरफास्ट' जगात ही जत्रा हरवते आहे. तमाशाचं चित्रही धूसर बनतं आहे. पण आमच्या मनाचे कप्पे तिनं एकेकाळी लख्ख करुन ठेवले. ते आजही जसेच्या तसे आहेत. त्यातला एक कप्पा आहे तो कांताबाई सातारकर यांचा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.