सह्याद्रीचा माथा : मविप्र निवडणूक, मराठा समाज आणि नाशिक

MVP election
MVP electionesakal
Updated on

मराठा विद्या प्रसारक संस्था म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शिक्षण वाहिनी. इथल्या पिढ्यापिढ्यांना शिक्षित आणि सुसंस्कृत करण्याचं महनतम कार्य मविप्रच्या माध्यमातून सातत्यानं होत आलेलं आहे. कर्मवीर रावसाहेब थोरातांपासून ते कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्यापर्यंतची मोठी परंपरा मविप्र संस्थेस लाभली आहे. सत्यशोधक समाजापासून प्रेरणा घेवून संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचा वटवृक्ष आज झालेला आहे. अनेक दिग्गजांच्या त्यागवृत्तीतून ही संस्था नावारुपाला आली आहे. मविप्रमध्ये आज होणाऱ्या मतदान आणि मतमोजणीनंतर संस्थेची परंपरा आणखी नव्या उंचीवर पोहोचेल, यात जराही शंका नाही. रयत नंतरची राज्यातील दुसरी मोठी शिक्षणसंस्था ही मविप्रची ओळख राज्यात आणि राज्याबाहेर आहे. (MVP elections, Maratha society and Nashik)

संस्थेची निवडणूक म्हटली म्हणजे आरोप-प्रत्यारोप हे ओघानेच आले. निवडणुकीचा तो प्रघात आहे. तथापि, मविप्रचे सभासद हे अत्यंत बुद्धीनिष्ठ आणि शिक्षणाबद्दलची नेमकी जाणीव असणारे आहेत. शेतीच्या मुख्य व्यवसायाबरोबर आपल्या पुढच्या पिढ्या शिक्षणात कशा अग्रेसर राहतील, हा विचार मविप्रच्या सभासदांमध्ये अगदी खोलवर रुजलेला आहे. राज्यामध्ये शिक्षणाचं महत्व ज्या मोजक्या समाजांनी ओळखलं आणि त्या दिशेने आगेकूच केली, त्यात मराठा समाज अग्रभागी आहे. शिक्षणाशिवाय प्रगती, संपन्नता आणि विचारशील व्यक्तिमत्त्व तयार होत नाहीत, हे देखील समाज चांगलं ओळखून आहे. शिक्षणासारखा मूलगामी विचार हा वरवर असून चालत नाही, तो जिरवावा आणि भिनवावा लागतो, ही मूलतत्त्वे समाजाने जोपासली आहेत.

MVP election
मराठा क्रांती मोर्चाच्या आरोपांना संभाजीराजेंचं उत्तर; सविस्तर लिहिली पोस्ट

संस्थेच्या धोरणानुसार नाशिकच्या बाहेर संस्थेचा विस्तार आजवर झाला नाही. मात्र गेल्या काही काळात घटनेत काही बदल करुन अन्य जिल्ह्यांमध्ये जाण्याचा संस्थेचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे या ज्ञानगंगेचा विस्तार नक्कीच वाढणार आहे. मोजक्या शिक्षण संस्थांमध्ये लोकशाही पद्धतीने मतदान करुन संचालकांची निवड केली जाते, त्यात मविप्रचा समावेश आहे. संस्थेत दहा हजार १९७ मतदार आहेत. प्रत्येक तालुक्यातील मतदार हा अन्य तालुक्यांतील संचालक निवडीसाठीही मतदान करतो, हे देखील एक वेगळेपण संस्थेनं जपलं आहे. त्यामुळे तालुक्याचा संचालक जिल्ह्यातील मतदानावर निवडून येतो. २९०३ एवढे सर्वाधिक मतदार निफाड तालुक्यात आहेत. तर सटाणा येथे १ हजार ४१६ मतदार आहेत. सर्वांत कमी मतदार संख्या इगतपुरीत १३८ एवढी आहे. निफाड आणि कसमादेमधील मतदान निर्णायक आजवर निर्णायक ठरत आलेलं आहे. दोन्ही पॅनलने उमेदवारांची निवड करताना सभासद संख्येचा विचार करुन प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. एरवी या निवडणुकीत प्रांतवाद असा विषय असायचा, पण यंदा संस्थेचा विकास हा मुद्दा सर्वांत प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत.

मविप्रतील सत्ताधारी गटाने बांधकामे, संस्थेच्या वाढवलेल्या जमीनी, संस्थेचं बजेट साडे आठशे कोटीवर नेल्याचा प्रचार प्रामुख्याने केला. तर विरोधक गटाने एकाधिकारी शाहीकडे संस्थेच्या वाटचालीचा मुद्दा मोठा केला. सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर विरोधकांचा टीकेचा सूर राहिला. शिक्षण संस्था राजकारण विरहित असल्या पाहिजे. पण यंदाच्या निवडणुकीत राजकारण शिरल्याचा अधिक वास येतो. गेल्या काही काळात नवीन सभासद संस्थेत झालेले नाहीत. जे मृत सदस्यांच्या वारसांना सभासद केले आहे. ही संख्या देखील मोठी आहे. एकीकडे खूप वयोवृद्ध सभासद, तर दुसरीकडे तरुण सभासद संस्थेचे पुढील कारभारी निवडण्यासाठी यंदा मतदान करताना दिसतील. सरचिटणीसपद आणि निफाड असं आजवरचं समीकरण आहे. निलीमाताई पवार या निफाडच्या सून तर त्यांचे प्रतिस्पर्धी अॅड. नितीन ठाकरे हे निफाडचे जावई आहेत. त्यामुळे निफाडच्या सभासदांचा कल कोणाकडे राहतो, हे पाहणंही वैशिष्ट्यपूर्ण ठरणारं आहे.

MVP election
भाजपच्या मिशन मोडमुळे पालिकेत बदल्यांचे वारे 

बहुतांश मविप्र परिवारातील सदस्यांच्या नजरेतूनही सुटला असेल असा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. वनाधिपती स्व. विनायकदादा पाटील यांची कमतरता या निवडणुकीत भासतेय. नाशिकच्या संदर्भात विनायकदादा एक मोठा बफर झोन म्हणून सतत कार्यशील होते. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना त्यांच्याकडून तळागाळातला योग्य रिपोर्ट जायचा. ते नसल्याने यावेळी विसंवादाचे काही प्रसंग घडले. कदंबवन या त्यांच्या निवासस्थानी निवडणुकीची रणनीती ठरायची, पुढची दिशा मिळायची. त्यामुळे विनायकदादांची कमतरता किती भासली, हे निवडणूक निकालानंतर अधिक स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.