ऑनलाइन शिक्षण खरेच झाले का?

online learning
online learning

गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रसारामुळे शिक्षण प्रक्रियेवर अतिशय नकारात्मक प्रभाव पडला, हे वास्तव आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून खूप दूर गेले. त्यांची शिक्षणातील रुची कमी होऊ लागली. त्यांना पुन्हा या प्रवाहात आणण्याची महत्त्वाची जबाबदारी शासकीय व शालेय प्रशासनावर आली. यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येऊ लागले, यात "ऑनलाइन शिक्षण' ही संकल्पना जवळजवळ सर्वच शैक्षणिक स्तरांवर वापरायला सुरवात झाली. 

विविध प्रसारमाध्यमांचा उपयोग करून त्यामार्फत ऑडिओ, व्हिडिओ यांच्या माध्यमातून तर झूम, गूगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स अशा ऍपच्या व्यासपीठांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा कौतुकास्पद प्रयत्न झाला. सुरवातीला अनेक तांत्रिक अडचणी आल्या; परंतु त्या अडचणींवर मात करून शिक्षणाची प्रक्रिया अविरतपणे सुरू ठेवण्यात बऱ्याच प्रमाणात यशही मिळाले. उत्सुकतेमुळे विद्यार्थीही यात रमले. चांगला प्रतिसादही मिळू लागला. मध्यंतरी दीपावलीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि पुन्हा शिक्षण प्रक्रिया मंदावली. 

सद्य:स्थिती लक्षात घेतली, तर या संकल्पनेचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही, असे चित्र आहे. अनेक शिक्षक शाळेतून प्रसंगी आपल्या घरातून "लाईव्ह क्‍लास' घेतात. परंतु विद्यार्थी तासांना बसतात का, लक्षपूर्वक शिकतात का, नेमके काय करतात हे मात्र समजणे अवघड आहे. सर्वजण शिकत आहेत हे ठामपणे सांगता येत नाही. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी "ऑनलाइन टेस्ट' घेतल्या जातात. पण ही टेस्ट विद्यार्थी स्वत: सोडवितात का, हे कसे समजणार? कदाचित "ऑनलाइन शिक्षण पद्धती' हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. 

शासनाने सध्या इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालयांमधून सुरू करण्याचे आदेश दिले व त्यास अनुसरून नियमावलीही सांगितली. बहुतेक शाळा, महाविद्यालये सुरू झाली. याच धर्तीवर इतर वर्गही सुरू करण्याचा शासनाचा विचार सुरू आहे, हे निश्‍चितच स्वागतार्ह आहे. जर हे शक्‍य झाले तर विद्यार्थी आभासी शिक्षणातून वास्तवातील शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि पुन्हा ही शिक्षण प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होईल असे वाटते. 

- नितीन मिस्कीन 
शेळगी, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.