रशियात पुतिन यांच्या अध्यक्षतेखालील साम्यवादी एकाधिकारशाही आहे. तर ऑस्ट्रिया पूर्णपणे लोकशाही राष्ट्र आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मॉस्को व व्हिएन्ना दौऱ्याचे वृत्तांत सर्वत्र प्रसिद्ध झाले आहेत. त्यावर संपादकीये, खास लेखातून टिप्पण्या होत आहेत. त्यात एकवाक्यता दिसते, ती पुढील शीर्षकात - ``मोदी यांची तारेवरची कसरत.’’
जनता सरकारच्या काळातील माजी परराष्ट्र मंत्री (जे नंतर देशाचे पंतप्रधान झाले.) अटल बिहारी वाजपेयी यांनी चीनला 12 ते 18 फेब्रुवारी 1979 दरम्यान चीनला भेट दिली होती. दौरा पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी ते हांगचाऊमध्ये असताना 17 फेब्रुवारीला चीनने व्हिएतनामवर आक्रमण केले, ते अयकताच वाजपेयी यांनी चीनचा दौरा मध्येच स्थगित केला व ते भारतात परतले. या उलट, रशियाचे युक्रेनवरील आक्रमण सुरू असताना मोदी यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबची भेट व बोलणी पूर्ण करून नंतर ऑस्ट्रियाला प्रस्थान केले.
व्हिएन्ना भेटीत मात्र त्यांना ऑस्ट्रियाचे चान्सेलर कार्ल नेहामर यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऑस्ट्रियाच्या स्वातंत्र्यासाठी काय प्रयत्न केले, ते त्यांना सांगितले. प्रत्यक्षात मोदी व भाजप सातत्याने नेहरू यांच्यावर संसद व संसदेबाहेर टोकाची टीका करीत आहे. नेहमार म्हणाले, की दुसऱ्या महायुद्धानंतर नेहरूंमुळे ऑस्ट्रियाला स्वातंत्र्य मिळाले. ते म्हणाले, ``परिस्थिती बिकट होती. प्रगती करणे कठीण होते. त्याकाळात ऑस्ट्रियाचे परराष्ट्र मंत्री कार्ल गुबेर यांनी नेहरूंशी संपर्क साधून वाटाघाटी टिकाऊ व सकारात्मक व्हाव्या, यासाठी साह्य मागितले. भारताने साह्य केल्यामुळे ऑस्ट्रियाचा राष्ट्र करार झाला व एक तटस्थ राष्ट्र म्हणून देश पुढे आला.’’
रशियात पुतिन यांच्या अध्यक्षतेखालील साम्यवादी एकाधिकारशाही आहे. तर ऑस्ट्रिया पूर्णपणे लोकशाही राष्ट्र आहे. पुतिन यांनी रशियाचा `सेंट एन्ड्रयू’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदींना बहाल केला. ते होत असताना रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हच्या बाल रूग्णालयावर अमानुष हल्ला चढविला. हे रूग्णालय बालकांचे युक्रेनमधील सर्वात मोठे रूग्णालय आहे. त्यात 37 रूग्ण ठार झाले. त्यात लहान मुले होती. तब्बल 170 जण जखमी झाले.
मोदी यांनी पुतिन यांच्याकडे त्याविषयी खंत व्यक्त केली व ते म्हणाले, ``हे पाहिले की ऋदय फुटते (द हार्ट सिंपली एक्सप्लोड्स) बाँब्ज, बंदुका व गोळ्यांच्या वर्षावात शांतिवार्ता यशस्वी होत नाही.’’ 17 ऑक्टोबर, 2022 रोजी मोदी यांनी पुतिन यांना सुनावले होते, ``ही काही युद्धाची वेळ नव्हे.’’ या गोष्टीला दोन वर्षे होत आहेत, मोदीं यांचा सल्ला एका कानाने अयकून दुसऱ्या कानाने सोडून देऊन पुतिन यांनी आक्रमण चालूच ठेवले. तसेच. यावेळीही मोदी यांच्या दुःखद भावना त्यांनी अयकल्या व युद्ध चालू ठेवले.
मागे वळून पाहिल्यास असे दिसते, की युक्रेन युद्धाची सुरूवात रशियाने क्रीमियावर हल्ला करून त्या प्रांताला गिळंकृत करून केली. ते वर्ष होते 2014. तथापि, 2021 व 2022 मध्ये दोन्ही देशातील तणाव पराकोटीला गेला, तेव्हापासून घनघोर युद्ध चालू असून, कोणत्याही परिस्थितीत युक्रेनला रशियाच्या प्रभावाखाली आणण्याचे व नाटो राष्ट्रे तसेच युरोपीय महासंघापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न पुतिन करीत आहेत. मोदींच्या भेटीची युक्रेनचे अध्यक्ष व्होलदेमीर झेलेनल्की यांनी तीव्र निंदा केली. ते म्हणाले, ``या भेटीबाबत घोर निराशा झाली आहे. शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना हा सर्वात मोठा धक्का असून, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा नेता मॉस्कोमधील रक्तरंजित गुन्हेगार पुतिन यांना या हल्ल्याच्या दिवशी अलिंगन देत होता.’’
भेटीतून मोदी यांनी काय साध्य केले. 1) रशियाकडून युक्रेनच्या युद्धात लढणाऱ्या भारतीयांना परत पाठविण्याचे आश्वासन मिळाले. 2) अणु भट्ट्यांना लागणारे युरेनियम, हेवी वॉटर, तांत्रिक साह्य कायम राहाणार 3) संरक्षण क्षेत्रात लागणारी हेलिकॉप्टर्स, लढाऊ व मालवाहू विमाने, दारूगोळा, युद्ध नौका, क्षेपणास्त्रे यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर रशियावर अवलंबून आहे. तोही चालू राहाणार. भारताने गेल्या वीस ते पंचवीस वर्षात रशियावरील अवलंबन कमी करत आणले व संरक्षण क्षेत्रात लागणाऱ्या साधनसामग्रीची आयात स्वीडन, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, ब्रिटन, इझ्राएल आदी राष्ट्रांकडून करणे सुरू केले. तरीही पारंपारिक संरक्षण सामग्रीच्या सुट्या भागांसाठी आज भारताला रशियावर अवलंबून राहावे लागते. सुट्या भागांच्या निर्मितीसाठी आजही आपण `आत्मनिर्भर’ झालेलो नाही.
4) भारत व रशियाच्या व्यापाराचे प्रमाण 65 अब्ज डॉलर्स आहे. ते 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट या भेटीत ठरविण्यात आले. यातील गोम अशी की सध्याच्या 65 अब्ज डॉलर्स व्यापारापैकी रशियाकडून तब्बल 62 अब्ज डॉलर्स मालाची आयात भारत करतो. खनिज तेल व नैसर्गिक वायु आयातीचे प्रमाण 2022 मधील केवळ 20 अब्ज डॉलर्स होते. ते 2024 मध्ये 61 अब्ज डॉलर्स इतके वाढले. याचा अर्थ, व्यापाराचे पारडे सुमारे 62 अब्ज डॉलर्सने रशियाच्या बाजूने झुकले आहे. आणखी एक अन्वयार्थ म्हणजे, 2030 मध्ये दुतर्फा व्यापाराचे प्रमाण 100 अब्ज डॉलर्सवर गेले, तरी ते रशियाच्या बाजूने झुकलेले राहील.
भारतातर्फे रशियाला निर्यात होणाऱ्या प्रमुख मालात दगड, प्लास्टर सिमेन्ट, अभ्रक, खनिज तेल, कातडे, निरनिराळ्या प्रकारची अत्तरे, सुगंधी वस्तू, सौंदर्य प्रसाधने आदींचा समावेश आहे. दुसरीकडे, रशिया व चीन यांच्या व्यापाराचे प्रमाण तब्बल 240 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचले आहे. तर, भारत-चीन व्यापाराचे प्रमाण 125 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. भारत-चीन व्यापारातही सुमारे 65 अब्ज डॉलर्सचे पारडे चीनच्या बाजूने झुकलेले आहे.
पाश्चात्य देश, अमेरिका, नाटो (नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन), युक्रेन विरूद्ध रशिया व चीन असे चित्र सध्या जागतिक पातळीवर निर्माण झाले असून, रशिया-युक्रेन युद्ध अथवा पॅलेस्टाईन- इस्त्राएल युदधात मोदी सकारात्मक व समझोत्याच्या दृष्टीने भर घालू शकलेले नाही. एकीकडे मित्रराष्ट्र रशिया व दुसरीकडे शत्रूराष्ट्र चीन यांच्या कचाट्यात आपण सापडलो आहोत. परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत म्हटले होते की भारत कुणाच्याही गोटात नाही. भारताला सर्व राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध हवे आहेत व त्याच दृष्टीने धोरण राबविले जाते.
अमेरिका, पाश्चात्य देश व नाटो संघटना यांना वाटते, की रशियाचे युद्धयंत्र (वॉरमशीन) चालू ठेवण्यासाठी चीन रशियाला शस्त्रास्त्रांची मदत करीत आहे. परिणामतः युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता नाही. या उलट रशियाचा आरोप आहे, की युक्रेनला नाटो, अमेरिका व पाश्चात्य देशांनी शस्त्रपुरवठा चालू ठेवल्याने युद्ध संपुष्टात आलेले नाही. सारांश, दोन्ही बाजूंनी शांतिसमझोत्यासाठी आजवर केलेले व चालविलेले प्रयत्न सफल झालेले नाही. मोदी भले म्हणो की ``भारत विश्वगुरू आहे.’’ पण आपला सल्ला अयकतोय कोण? म्हणूनच, राष्ट्रहित सर्वतोपरी मानून अमेरिकेची नाराजी ओढवूनही भारताला रशिया व इराणबरोबर संबंध सामान्य ठेवावे लागत आहेत.
रशिया व चीन युरेशियातील (पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत युनियनधील परंतु, आता स्वतंत्र झालेल्या देशात) आपला प्रभाव वाढवू पाहात आहेत. त्याचदृष्टीने अलीकडे अस्ताना (कझाखस्तान) येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेतील पुतिन व शी जिनपिंग यांच्या उपस्थितीकडे पाहावे लागेल. मोदी यांच्या मॉस्को भेटीबाबत अमेरिका व नाटो साशंक आहेत. मॉस्को भेटीत मोदी म्हणाले, ``रशिया हा भारताचा विश्वासार्ह मित्र आहे. रशियन भाषेत मेत्रीला `द्रुजबा’ म्हणतात, तर आम्ही `दोस्ती’ म्हणतो. तसेच, रशियास्थित भारतीयांनीही या मैत्रीला नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.’’ तात्पर्य, भारताच्या आर्थिक प्रगतीच्या नाड्या (प्रामुख्याने इंधन पुरवठा) रशियाच्या हाती असल्यानेच युक्रेन व पॅलेस्टाईनला सहानुभूती दाखविण्याशिवाय आपण फारसे काही करू शकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.