हल्ली नेहमी ऐकायला मिळणारा शब्द म्हणजे संस्कार. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आग्रही असणाऱ्या पालकांची संख्या जशी वाढू लागली, तशी संस्कार शिबिरांची/वर्गांची संख्याही वाढताना दिसत आहे. म्हणजेच बाजारपेठीय अर्थशास्त्राचा नियम, मागणी तसा पुरवठा हा इथेही लागू होताना दिसतो आहे. संस्कारवर्ग अथवा शिबिरे असावीत का? हा थोडा वादाचा विषय होऊ शकतो; परंतु मूल हे केवळ आठ तासांच्या शाळेतच शिकते किंवा जे जे शिकायचे आहे, त्यासाठी वर्ग हा असलाच पाहिजे, वर्गाशिवाय मूल शिकत नाही ही धारणा पार चुकीची आहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मतानुसार समाज आणि कुटुंब अनौपचारिक शिक्षणाची महत्त्वाची माध्यमं आहेत आणि त्याद्वारेसुद्धा मूल शिकत असते आणि असे शिक्षणसुद्धा त्या मुलाच्या जडणघडणीत खूपच महत्त्वाची भूमिका निभावणारे ठरते.
हे जर असे असेल तर संस्कार करण्याची जबाबदारी ही शाळेबरोबर कुटुंब आणि समाज यांच्यावर येते. हे तिन्ही घटक त्यांची जबाबदारी नीटपणे पार पाडत नसतील तर त्यासाठी वेगळी तरतूद म्हणून आपल्याला संस्कार शिबीर / वर्ग याला मान्यता द्यावी लागेल. आता हे तिन्ही घटक त्यांची जबाबदारी पार पाडत नाहीत म्हणजे ते मुलांना संस्कार देत नाहीत का? का ते मुलांना बिघडवितात? तर हा विषय अशा पद्धतीने वस्तुनिष्ट प्रश्न विचारून त्यातून मिळणाऱ्या उत्तरातून सुटणारा नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मुळात आपण संस्कार करणे म्हणजे काय, याबाबतच मोठा घोळ घालून ठेवला आहे असे वाटते.
शुभंकरोती म्हणणे, देवदर्शन घेणे, थोरांचा मान राखणे, आज्ञाधारक असणे, आईवडील आणि गुरू हेच देव आहेत अशी धारणा करून त्यांचे दर्शन घेणे, अपशब्द न उच्चारणे आदी गुण असणे म्हणजे संस्कारी असणे अशी सीमित व्याख्या आपण केली आहे. हे गुण असणे चांगलेच (खरे पाहता अशी सर्व लक्षणे असणारी संस्कारी व्यक्ती सार्वजनिक जीवनामध्ये अगदीच बेशिस्त वर्तणूक करत असेल तर आणि तसा अनुभव येत असेल तर मुळापासून अशा संस्काराची व्याख्याच तपासली पाहिजे असे वाटते.) परंतु कुटुंब, समाज आणि एकूणच व्यवस्थेची रचना बदलत असेल तर अशी व्याख्या अपुरी पडणारी ठरेल, काही वेळा ती अडचणीची सुद्धा ठरेल. म्हणजे एकदा आपण शिक्षकाला देव मानले की त्याला प्रश्न विचारणे हा उद्धटपणा नाही का ठरणार? आणि प्रश्न पडणे आणि त्याची उत्तरे शोधणे या शिक्षणाच्या मूळ प्रक्रियेलाच खीळ नाही का बसणार? थोरांचा मान राखावा हा संस्कार थोरांच्या वर्तणुकीची चिकित्सा करणे नाकारतो आणि चिकित्सक असणे हे सुद्धा व्यक्तिमत्त्व जडणघडणीत महत्त्वाचेच असते. त्यामुळे संस्कारी असणे म्हणजे नक्की कसे असणे हा घोळ तातडीने मिटविला पाहिजे.
माझ्या माहितीतले एक आयकर विभागामध्ये उच्च पदावर कार्यरत असणारे गृहस्थ आहेत. मागील वीस वर्षांपासून त्यांची आणि माझी ओळख आहे. त्यांच्या आमदनीच्या तुलनेत त्यांचे राहणीमान उच्च आहे. म्हणजेच त्यांची गैरस्वरूपाची सुद्धा आमदनी असणार हे नक्की. दरवर्षी त्यांच्या गावावरून जाणाऱ्या दिंडीला ते अन्नदान करतात, त्याचे कौतुक सर्व गावाला असते. लहानपणी त्यांच्या मुलांना आम्ही सर्वजण संस्कारी आज्ञाधारक मुले आहेत असे समजत होतो, तो गैरसमज होता हा अनुभव पदोपदी सर्वांना येत आहे. हे असे अनुभव सार्वत्रिक स्वरूपाचे झाले आहेत. म्हणजे शाळेत शिस्तीत असणारी मुले पुढे बिघडतात, लहानपणी आमची मुले फार संस्कारी आहेत म्हणून कौतुकाने सांगणाऱ्या पालकांना मुलांच्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. हे असे का होत असावे? कारण आपल्या अशा प्रकारच्या संस्कारामागे एक दांभिकता लपलेली असते. वर वर्णन केलेल्या त्या अधिकाऱ्याच्या मुलाला आपल्या वडिलांच्या गैरमार्गाने मिळालेल्या पैशाविषयी कधीतरी माहिती होणारच आणि त्यावेळेस दिंडीला अन्नदान करणे यामध्ये त्याला दांभिकता दिसणार, त्यावेळेस वडिलांना देव मानावे हा संस्कार आपोआप गळून पडणार. या ठिकाणी एक निसरडते ठिकाण असे आहे की पैसा हा पैसाच असतो, त्यात काळेगोरे असे काही नसते, पैशाने प्रतिष्ठा विकत घेता येते हा संस्कार(?) देण्यात जर त्याचे वडील यशस्वी झाले असते तर ते मूलही तसेच वडिलांसारखे आयुष्यभर दांभिक राहिले असते आणि त्यावेळेस मात्र ते अजूनही संस्कारी आहे असा भास आम्हाला व समाजाला होत राहिला असता. आज त्याचे असे बेशिस्त संस्कारहीन असणेसुद्धा कोणत्यातरी मूल्याचे रक्षण करणारे आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.
आध्यात्मिक वर्तुळामध्ये एक फार सुंदर गाणे आहे. "हमें राह दिखाने की जरुरत नही, हमें आपके पैरों के निशान मिल गये है ।' म्हणजे ज्याला आपले मूल किंवा विद्यार्थी संस्कारी असावे असे वाटते, त्यांनी सर्वप्रथम त्यांची स्वतःची वर्तणूक काही मूल्यांवर आधारित आहे हे तपासून पहिले पाहिजे, त्याची खात्री पटली की त्या वर्तणुकीचे अनुकरण करणे म्हणजेच आपोआप संस्कार करणे ठरणारे असते हे आपण सर्वांनी मुळातून समजून घेतले पाहिजे. केवळ शिस्तप्रिय शिक्षक असणे महत्त्वाचे नाही तर स्वतःची वर्तणूकही शिस्तीत असणारे शिस्तप्रिय शिक्षक असले पाहिजेत. (पालकांनासुद्धा हाच निकष लागू पडणारा आहे) नाहीतर शिस्तप्रिय शिक्षकाच्या धाकामुळे नाटकी शिस्त, दांभिकता वाढवणारी ठरते. चोरी करू नये हा खरा संस्कार, आयुष्यभर कसल्याही प्रकारच्या चोरीला वाईटच समजणार आणि केवळ शिस्तप्रिय शिक्षकाच्या वा पालकाच्या धाकाने संस्कारी झालेला सीसीटीव्हीच्या भीतीमुळे चोरी करणार नाही. हे उदाहरण आपल्याला संस्कारातील दांभिकपणा आणि खरेपणा स्पष्ट करण्यास पुरेसा आहे असे वाटते.
संस्कार आणि संसर्ग या शब्दांच्या निर्मितीमध्ये काहीतरी समान धागा असावा असे वाटते. भाषातज्ज्ञ त्यावर जास्त अधिकारवाणीने भाष्य करू शकतील. परंतु आपण संसर्ग हा शब्द वाईट अर्थाने म्हणजे रोगाचा संसर्ग अशा पद्धतीने घेतो, त्यामुळे हे दोन शब्द टोकाचे वाटतात. प्रत्यक्षात संस्काराचा सुद्धा संसर्ग झाला पाहिजे तरच त्याचा प्रसार वेगाने होईल, असा अर्थ आपल्याला घेता येतो. आईवडिलांचा आदर करावा हे जर स्वतच्या पालकांच्या कृतीतून, वर्तणुकीतून त्या पाल्याला नेहमी जाणवत असेल तर त्याचा असा संसर्ग नकळतपणे त्या पाल्यावर होणार असतो. त्यासाठी पुन्हा वेगळ्या संस्कार वर्गाची, शिबिराची गरज लागणार नसते. अशा वर्गांची / शिबिरांची गरज लागणे म्हणजेच कुटुंब आणि समाज या दोन शाळा नापास होत आहेत याचा पुरावा होय आणि या नापास का होत असाव्यात त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपला वाढतच चाललेला दांभिक व्यवहार. यावर चर्चा पुढील भागात करूयात.
- डॉ. सतीश करंडे,
शेटफळ, ता. मोहोळ
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.