नाशिक सर्वार्थाने राहण्यायोग्य शहर असल्याचे अभिमानाने म्हटले जाते. ‘रुद्राक्ष ते द्राक्ष’ या प्रवासात ‘वाइन कॅपिटल’ म्हणून नाशिकचा उल्लेख होतो. मुंबई-पुण्यानंतर राज्यात नाशिकला राहण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जमेच्या बाजू आहेत, जसे की स्वच्छ हवामान, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची हवाई धावपट्टी, कांद्याची बाजारपेठ इत्यादी.
परंतु याचा विचार करताना दुसरी बाजू काळीकुट्ट पडत आहे, ती बाजू म्हणजे अंमली पदार्थ विक्री व गुन्हेगारीचा आवळत चाललेला पाश. याकडे आता अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी हिवाळी अधिवेशनात या विषयावर प्रकाश टाकून राज्याचे लक्ष वेधले. त्यामुळे या प्रश्नाचा गंभीरतेने विचार करून राज्य शासनाने वेळीच दखल घेऊन व उत्तर महाराष्ट्राच्या राजधानीतील उगवत्या पिढीला वाचविले पाहिजे, हा कर्तव्य व विकासाचादेखील भाग आहे.
बा हेरगावचा माणूस जर नाशिककडे चालला, तर तो सुरक्षित समजला जातो. नाशिकला वास्तव्य करणे म्हणजे सुदृढ आरोग्याकडे वाटचाल करणे, असे बोलले जाते. स्वच्छ हवामान व वातावरण म्हणून सीनिअर सिटीजनसाठी उत्तम शहर म्हणून नाशिकचा नावलौकिक आहे. राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील एक बाजू, राज्याचे महत्त्वाचे औद्योगिक शहर, हवाई-रेल्वे व रस्ते वाहतुकीचे जाळे, समृद्ध शेती परंपरा, राज्याची सांस्कृतिक उपराजधानी, महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र, मुबलक पाण्याची उपलब्धता, वाइन कॅपिटल असे एक ना अनेक क्षमता सिद्ध करणाऱ्या बाजू नाशिकच्या बाबतीत सांगता येतील. गेल्या महिन्यात बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ संस्थेच्या वतीने गृहप्रदर्शन झाले व सध्या ‘नरेडको’ या बांधकाम व्यावसायिकांच्या दुसऱ्या संस्थेचे गृहप्रकल्पांचे प्रदर्शन सुरू आहे.
या गृहप्रकल्पांच्या प्रदर्शनातून नाशिकमध्ये घरे घेताना वरील बाबी बघूनच घरे खरेदी केली जात असल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबींचा ऊहापोह करण्याचे एकमेव कारण म्हणजे नाशिकच्या लौकिकाला बट्टा लागत आहे. आपण म्हणजे नाशिककर फक्त चांगल्या बाजूंकडे लक्ष केंद्रित करतो. म्हणजे शहराच्या सकारात्मक बाजूकडे पाहिले जात असताना किंवा ऊहापोह करत असताना दुसरी काळी बाजू अधिक काळीकुट्ट होत आहे, याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. जशा चांगल्या बाजूंचा आपण नाशिककर विचार करतो, तसा काळ्या बाजूंचाही विचार व्हायला हवा किंवा त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. या बाबी आपण आत्ताच ध्यानात न घेतल्यास विकास दूर, अधोगती व्हायला वेळ लागणार नाही.
नाशिकच्या बाबतीत काळाकुट्ट बाजू कोणत्या, तर नाशिक अंमली पदार्थ विक्रीची राजधानी होत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिक शहरात खुलेआम अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा दावा विधानसभेत केला. एमडी, कुत्ता गोली, स्पिरिट, डोकेदुखी शमविणारा बाम, हुक्का पार्लर, एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये ग्राहकांना पाण्याच्या बाटलीऐवजी टेबलवर बिअरची बाटली ठेवली जात असल्याचा धक्कादायक आरोप करून नाशिकची वाटचाल नेमक्या कुठल्या दिशेने सुरू आहे? याचा ऑडिओ ट्रेलर दाखविला. नाशिकमध्ये फार मोठा सुशिक्षित वर्ग असा आहे, की त्या वर्गाला विकास हवा आहे. हवाई सेवा, आयटी कंपन्या, मोठ्या शैक्षणिक सुविधा, देशातील मेट्रो शहरांमध्ये ज्या सुविधा पुरविल्या जातात, त्या सुविधा नाशिकमध्ये पाहिजेत.
त्याला कारण म्हणजे मोठ्या शहरांमध्ये ज्या क्षमता आहेत, त्या सर्व क्षमता आपल्या नाशिकमध्ये आहेत. किंबहुना त्यापेक्षा जास्त क्षमता नाशिकमध्ये आहे. परंतु राजकीय पाठबळ नसल्याने अपेक्षित विकासाचे उद्दिष्ट गाठू शकत नाही. ही भावना नाशिककरांची आहे. नाशिककडे लक्ष देणारे राजकीय नेतृत्व नाही. त्यामुळे विकास नाही. परंतु आता विकास नसला तरी चालेल अंमली पदार्थ विक्रीची राजधानी असा नावलौकिक आम्हाला नकोय, अशी भावना या विषयात पोळलेले हात करत आहे. नाशिकमध्येच अंमली पदार्थांची विक्री कशी होते? अंमली पदार्थ नेमके येतात कुठून? मुंबई, भिवंडी, नाशिकचे वडाळा व भद्रकाली पुढे मालेगाव व उत्तर महाराष्ट्र याप्रमाणे अंमली पदार्थ विक्रीची साखळी आहे का? कॉलेज रोडच्या गल्ल्या, पानटपऱ्यांवर अंमली पदार्थांची विक्री होते का?
अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी कुठली कोड लँग्वेज वापरली जाते? महापालिका हद्दीला लागून असलेल्या ग्रामीण भागातील ढाबे व हॉटेलवर अंमली पदार्थ विक्री व हुक्का पार्लर कसे सुरू आहेत? याबाबत व्यवस्थित तपासणी केल्यास सुरू असलेल्या चर्चेची दाहकता समोर येईल. एक वेळ विकास नसला, तरी चालेल पण पिढीच्या पिढी खल्लास करणारे उद्योग शहरात नकोय, अशी भावना प्रत्येकाची आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले आहे. दत्तक पित्याचा उद्देश विकास करणे हा आहे. त्यामुळे विकास करताना ज्यांच्यासाठी विकास करायचा आहे, ती पिढी भकास होत असेल, तर असा विकास कामाचा नाही. अंमली पदार्थांच्या विक्रीचा छडा लावून साखळी उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे.
पोलिस आयुक्तांना मिळावे बळ
जुने पोलिस आयुक्त जाऊन त्यांच्या जागी नवीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यापासून शहर पोलिसांत जान आल्यासारखे दिसून येत आहे. मैदानात काम केलेला अधिकारी नाशिकला मिळाला आहे, पोलिस दलात विश्वास, आपुलकी, कर्तव्यनिष्ठता दाखवण्यासाठी शिंदे यांनी पोलिस ठाण्यांना भेटी देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे नाशिकची दिवसागणिक वाढणारी काळीकुट्ट बाजू ते पुसतील, अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.