संपन्न बालपण

हिरवीगार झाडी- कऱ्हा नदी व पूर्वीच्या काळातील मंदिरे कोणाचेही मन मोहून टाकेल असे सासवड
pune
punesakal
Updated on

सासवड पुण्यापासून फक्त २५ किलोमीटर अंतरावर आहे. हडपसरवरून उजवीकडे वळले, की काही अंतरावर दिवेघाट लागतो. दिवेघाटात मस्तानीचे तळे दिसते. दिवेघाट ओलांडल्यानंतर थोड्याच अंतरावर सासवड. हिरवीगार झाडी- कऱ्हा नदी व पूर्वीच्या काळातील मंदिरे. कोणाचेही मन मोहून टाकेल असे सासवड.

माझ्या बाळपणातील आठवणी अनेक आहेत. माझ्या माहेरचे आडनाव पुरंदरे. आम्ही सात भावंडे ४ भाऊ व तीन बहिणी, आई-वडील व आजोबा-आजी असे कुटुंब. माझे वडील शेती करत व आमचे घर रामाच्या बागेत असे. मध्यभागी मंदिर, आजूबाजूला राहण्याच्या खोल्या. आजूबाजूला पाच एकर जमीन ज्यात भाजीपाला पिकत असे. विहीर होती. विहीरीला मोट असे. दोन बैल मोट ओढत असत. दोन माणसे बैलांना ओढत असत. बैलांना घुंगरे लावल्यामुळे मंजूळ आवाज होई. मोट पाणी भरून वर आली व पाटात पाणी वाहायला लागले, की आम्ही भावंडे टाळ्या वाजवत असू. शेतामध्ये दिवसभर हुंदडायचे.

गरमगरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा व लसणीची लाल चटणी खायचे. घरी गाई म्हशी असल्याने भरपूर दूध, तूप, लोणी. घरचे धान्य. यामुळे आमच्या तब्येती उत्तम असत. सासवडमध्ये आमच्या वडिलांची शेती होती. आमचे वडील शेती करत. आम्ही सगळीकडे बैलगाडीतून फिरत असू. कालांतराने आम्ही सर्वजण मोठे झालो. आमची आई पुण्यात मुलांच्या शिक्षणाकरिता वाड्यात राहू लागली. वडील मात्र सासवडमध्ये राहत होते. शनिवार-रविवार वडील पुण्यात येत असत. आमचे भाऊ शिकून मोठे झाले. एक सैन्यात व दुसरा हवाईदलात, तिसरा अमेरिकेत व चौथा भाऊ वडिलांची शेती सांभाळत असे.

आम्हा बहिणींची लग्ने झाली व आम्ही सासरी आलो. परंतु सुट्टीत आम्ही मुलांना घेऊन पुण्यात आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सासवडमध्ये येत असू. मे महिना असे. आंब्याचा बहर. त्यामुळे घरचे आंबे मनसोक्त खायला मिळत. चिंच, आवळ्याची झाडे असत. मग आमची आई रात्रीच्या वेळी गरम दूध व हळद देत असे. पुण्यापेक्षा आम्हाला सासवड प्रिय असे. मला सासवड हे माझे माहेर आहे असे वाटे. अजून रामाचे मंदिर आहे, घरही आहे.

आता कोणी तेथे राहत नाही. शेती करणारा भाऊ पुण्यात मॉडेल कॉलनीत राहतो. सासवडला जाऊन येऊन शेती करतो. वर्षातून एकदा रामनवमीचा उत्सव असतो. मी आवर्जून रामनवमीला जाते. माझा धाकटा भाऊ अजून रामनवमी साजरी करतो. आत्ता आई-वडील नाहीत. आम्हा सर्वांची वये झाली; परंतु सासवड व तेथील आठवणी मनातून जात नाहीत. सासवड पेशवेकालीन आहे. माझे वंशज पेशव्यांचे सरदार होते. त्यामुळे आमच्या पूर्वजांना जमिनी मिळाल्या. काही आहेत, काही कालांतराने हातातून गेल्या.

असे माझे समृद्ध सासवड. त्या भोवतालच्या आठवणी मनात रुंजी घालतात. घरच्या कैरीची लोणची घातली जायची. त्याची चव अजूनही ओठावर आहे. माझ्या मुलांनासुद्धा सासवडला राहणे आवडायचे. सगळ्यांची मुलेबाळे दंगामस्ती व धमाल करीत असत. नोकर गडी पुष्कळ असत. आमच्या आईच्या हाताखाली महिला असत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.