महाकवी महात्मा फुलेंचे कवितांमधून समाजचिंतन

महाकवी महात्मा फुलेंचे कवितांमधून समाजचिंतन

आज स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे. ती विविध क्षेत्रात भरारी घेत आहे. या उन्नती मागे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे अविरत कष्ट आहेत. त्यांना आपण अनेक अंगांनी कार्यकर्तृत्वावर आधारित ओळखतो. अनेक महान समाजसुधारकांचा काव्य हा जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे .महात्मा फुले देखील मोठे समाजचिंतक कवी होते. भारतात मुलींची पहिली शाळा स्थापन करणे, विधवाविवाहास उत्तेजन देणे, पहिला विधवा विवाह संपन्न करणे, मागासवर्गीयांसाठी शाळा उघडणे, त्यांच्यासाठी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद खुला करणे ,अस्पृश्य ,विधवा आणि शेतकरी यांच्यासाठी प्राणपणाने कार्य करणे अशा अनेक महान कार्यासाठी आपण महात्मा फुले यांना आपल्या हृदयात स्थान दिले आहे..!! मात्र त्याबरोबरच समाजहितासाठी तळमळीने बोलणारा आणि जीवनात जगत असताना कोणती तत्त्वे अंगीकारावी हे सांगणारा महात्मा फुले यांच्या हृदयातील कवी आपण समजून घेतला पाहिजे. हा कवी अखंडपणे आपल्याला अशा काही तत्त्वचिंतक बाबी सांगत असतो ज्या बाबी आणि जे विचार आज एकविसाव्या शतकाची 19 वर्षे उलटूनही तितकीच चपखल लागू आहेत...!

महात्मा फुले यांच्या कविता 'अखंड' नावाने ओळखल्या जातात. जसे संत तुकारामांचे 'अभंग' तसे महात्मा फुलेंचे अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेतील रसाळ शैलीमधील जीवनाची महत्वाची तत्वे आणि संदेश देणारे 'अखंड' म्हणजे काव्यात्मक फुलांचा गुच्छ आहे...!! आज आपण स्वच्छ भारत अभियान मोठ्या उत्साहाने राबवित आहोत. मात्र, दीडशे वर्षांपूर्वी त्यांनी, "स्वच्छ होण्यासाठी, स्नान ते करावे", असे सांगून ठेवले आहे. "स्वकीय स्वच्छता मुळी विसरला l वैद्याने नाडीला lजोती म्हणे l",अशा भाषेत त्यांनी कणखरपणे स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. अनेक ठिकाणी ते अधिकारवाणीने ;तर अनेक ठिकाणी ते बंधुभावाने आपल्याला संदेश देतात. आजच्या दिखाऊपणाच्या काळात आपण भौतिक सुखाच्या मागे लागलो आहोत. आपली जेवढी ताकद आहे ,त्यापेक्षा जास्त खर्च करून जास्तीत जास्त वस्तूंचा खच आपण घरात लावतो आणि आम्ही किती पुढारलेले आहोत आणि किती श्रीमंत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होतो. मात्र त्यामुळे आपण कर्जबाजारी होतो आणि खऱ्या आनंदाला मुकतो.

ज्योतीबांनी आपल्या अखंडमध्ये सांगून ठेवले आहे की ,"कमाई पेक्षा जास्त खर्च जे करिती l ऋणकरी होती l जीवा कांचl" याचा अर्थ महात्मा फुलेंनी तेव्हा या दिखाऊपणाचा आणि भौतिक सुखाचा धोका ओळखला होता. मतितार्थ असा आहे की आपल्या ताकदी पेक्षा जास्त खर्च करू नये. त्यामुळे आपण कर्जबाजारी होतो आणि त्यामुळे आपला खरा आनंद हिरावला जाऊन आपल्या जीवाला घोर लागतो. महात्मा फुले यांची ही दूरदृष्टी अखंड काव्यातील प्रत्येक ओळीतून आपल्याला दिसून येते. शेवटी आपल्या आयुष्याचा आपण शिल्पकार असतो. आपल्याच कर्मांनी आपण मोठे होतो किंवा दुष्ट कर्मांनी आपण नष्ट होतो.... म्हणूनच महात्मा फुले पुढे म्हणतात, "सोयरे धायरे मागेपुढे येति l तुकडे मोडीती l दिमाखाने l"जीवनातील हे परखड सत्य सांगतानाच महात्मा फुले म्हणतात, "मतलबी स्नेही रसाळ बोलती l भोंदूनिया खाती l संधी होता l" खूप मोठा अर्थ या काव्यात आहे. आपण अनेक वेळा जवळचे समजून सर्वांवर विश्वास टाकतो.त्यांना जवळचे समजतो.ते आपल्याला फसवतात आणि खोटे गोड बोलून आपला गैरफायदा घेतात हे परखड सत्य महात्माजी सांगतात, ईश्वराला महात्मा फुले निर्मिक संबोधतात. "सर्वांचा निर्मिक आहे एक धनी l"असे निक्षून आत्मविश्वासाने ते सांगतात आणि त्याची भीती मनात धरावी म्हणजेच त्याच्या भीतीने का होईना सत्कर्मे करावीत.आपण वाईट कर्म केले तर त्याचे वाईट फळ भोगावे लागेल. त्यामुळे त्या निर्मिकाची भीती मनात धरून जगात वाटचाल करावी. सुखापेक्षा जगात आनंद महत्त्वाचा आहे कारण आनंद हा चिरकाल टिकतो. जीवनात उपभोग अवश्य घ्यावा परंतु तो कुणाला फसवून, कुणाला दुखवुन नको, कोणावर अन्याय करून नको; तर न्यायानेच हा आनंद मिळवला पाहिजे!  म्हणूनच ते म्हणतात, न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा.

एवढे सांगून महात्मा फुले थांबत नाहीत.ते पुढे म्हणतात, "आनंद करावा l भांडू नये l"आनंदाने जगावे ,कुणाशी भांडू नये.मतभेद हे दुःखाचे कारण आहे.आज आपण भरपूर प्रगती केली आहे. आपण प्रगत म्हणतो .परंतु अजूनही धर्म ,भाषा, प्रदेश ,राज्य अशा अनेक बाबींवरून एकमेकाशी भांडतो.याबद्दलही महात्मा फुले म्हणतात, "धर्मराज्य भेद मानवा नसावे l सत्याने वर्तावे इशासाठी l"त्यांच्या अखंड या काव्यरचनेच्या प्रत्येक चरणामध्ये खूप मोठा जीवनाचा गर्भितार्थ घडलेला आहे...!आनंदी जीवनाचा मार्ग जणू ते सांगतात. सर्व  प्राणिमात्राला सुख मिळावे म्हणून बिचारी पृथ्वी रात्रंदिवस गरगर फिरत असते .तिच्या कृपेने आपण सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र राहत असतो.जर ती पृथ्वी एक आहे तर जातीधर्मातील भेद कशासाठी? असा रोखठोक प्रश्न महात्मा फुले विचारतात .भोंदूगिरीवर आणि लबाडपणावर, दांभिकपणावर महात्मा फुलेंनी आपल्या अखंड काव्य रचनेतून प्रचंड आघात केले आहेत.सूर्य एकच आहे.तो सर्वांना प्रकाश देतो.सर्वांना उद्योग देतो.सर्वांचे पालनपोषण करतो.तो प्रकाश देताना दभाव करत नाही.तर माणसाने का करावा ?असे महात्मा फुले आपल्या कवितेतून ठणकावून विचारतात..!तसेच "एक चंद्र नित्य भ्रमण करितो lसर्वांना सुख देतो l निशिदिनी l"असा उल्लेख त्यांच्या कवितेत करतात.समुद्राला तो भरती ओहोटी देतो. समुद्रातील पाणी आणि क्षारसह हलवितो. मग पुढे पाऊस पडतो आणि लोकांना गोड पाणी मिळते, इतका सर्व अभ्यास महात्मा फुले आपल्या कवितेत मांडतात आणि सूर्य चंद्राचे उदाहरण देऊन ,"भेदभाव नष्ट करा ",असा सुंदर संदेश देतात.मग जर सूर्य आणि चंद्र जाती-धर्माचा भेदभाव करीत नाही तर माणसाला सुद्धा तो अधिकार नाही, असे वैश्विक उदाहरण देऊन पुढे महात्माजी ठणकावून विचारतात, "झाला का हो पिसे? "म्हणजेच भेदभाव पाळणारे तुम्ही वेडे आहात का ?असे विचारून त्यांनी सत्य धर्म पाळावा, असत्य बोलू नये ,असत्य वर्तन करू नये असाही संदेश आपल्या कवितांमधून दिला आहे. जो आत्मपरीक्षण करतो, जो सर्वांसाठी जगतो तोच खरा धन्य मानव होय, असे महात्मा फुले म्हणतात. म्हणूनच महात्मा फुले यांची कविता अखंडपणे चिंतन करण्यासारखी आहे. यश मिळवण्याचा महामार्ग जणू महात्मा फुले सांगतात."धीर धरुनी सर्वांना सुख देती l तेच होती यशवंत l"असे महात्मा फुले म्हणतात; ते काही उगीच नव्हे....

संपादन - सिद्धार्थ लाटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()