उदयनराजेंवर जिवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते एकच सांगतात, ‘आमचा पक्ष उदयनराजे आणि उदयनराजेच आमची ताकद...’
-अमोल बनकर, गोडोली सातारा.
Udayanraje Bhosale Birthday : ‘साताऱ्याची शान, राजे लई दमदार’ हे गीत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज, खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल कार्यकर्त्यांकडून व्यक्त होणारी उत्स्फूर्त भावना. छत्रपती उदयनराजे भोसले ‘बस नाम ही काफी है...’ अगदी याप्रमाणेच खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) हे तरुणाईसाठीचा एक ब्रँड आहे. हा ब्रँड लोकांच्या प्रेमातून तयार झाला आणि उदयनराजेंनीही हे प्रेम जपण्याचा प्रयत्न केला. ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर ली, तो में खुद की भी नही सूनता’ हा त्यांचा आवडता डायलॉग.
जेवढ्या सहजपणे ते हे बोलतात, त्याप्रमाणे वागणारे महाराज साहेब म्हणजे रोखठोक नेतृत्व... जे आहे ते आहे, जे नाही ते नाही, हा त्यांच्या नेतृत्वशैलीतील गुण म्हणजे साताऱ्याच्या मातीतील संस्कारच जणू... त्यामुळेच उदयनराजेंवर जिवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते एकच सांगतात, ‘आमचा पक्ष उदयनराजे आणि उदयनराजेच आमची ताकद...’ अशा रयतप्रेमी उदयनराजे महाराजांचा आज वाढदिवस (Udayanraje Birthday), त्यानिमित्त...
राजघराण्याचा स्वाभिमानी बाणा, धाडसी निर्णय, कोणापुढेही न झुकता आपली भूमिका रोखठोकपणे मांडणारे एकमेव नेतृत्व म्हणजे उदयनराजे. उदयनराजे हाच आमचा पक्ष आणि तीच आमची ताकद, ही अगदी तरुणांपासून वृद्धांपर्यंत ठासून भरलेली भावना. दिलदार राजा- भावुक प्रजा हे सूत्र आजही सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दिसून येते. सत्तेत असताना नेत्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांचा घोळका असणे, लोक जमणे आणि लोकप्रियतेचे शिखर गाठणे यामध्ये काही नवल नाही; पण सत्ता असो वा नसो, कार्यकर्ते आणि जनतेचे प्रेम कायम सोबत असणे, हीच उदयनराजे भोसले यांनी कमावलेली श्रीमंती. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज, राजघराण्यात जन्म, यासारखे वैभव लाभलेले असूनही, गुंजभर सोनं अंगात न घालणारा, जनतेचा राजा इतका साधा असू शकतो, हे केवळ ऐकून देशभरातील लोक उदयनराजेंना भेटायला येतात.
जशी प्रजा तसा राजा असायला हवा, हा आजच्या काळाचा विचार त्यांनी केवळ बोलून नव्हे तर आपल्या आचरणातून सिद्ध करणारे उदयनराजे म्हणूनच तरुणांना आयडॉल वाटतात; पण त्यांच्या साधेपणातही एक रुबाबदार बाणा आहे. ‘स्टाईल इज स्टाईल’ म्हणत त्यांनी त्यांच्या अंदाजात कॉलर उडवली, की तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सारेच त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात, शहरी भाग असो वा ग्रामीण भाग, ते कोठेही जाऊ द्या, कोठेही सभा घेऊद्यात, त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी, हे त्यांचे वेगळेपण आहे. त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सुख- दु:खाचे, यशापयशाचे, चढ-उताराचे अनेक प्रसंग पाहिलेत. ते ज्या पदावर असतील, त्या- त्या पदाला त्यांनी आपल्या अभ्यासू, चिकित्सक वृत्तीने न्याय द्यायचे काम केले अन् अजूनही करताहेत.
ज्यांच्या असण्याने पक्षाची किंमत वाढते, अशा नेत्यांतलाच हा दिलदार नेता. राजेशाही बाणा, मात्र आचरणात साधेपणा जपत जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व भागांचा राजकीय- भौगोलिक, तसेच प्रशासकीय नियमांचा सखोल अभ्यास असलेला, प्रशासनावर वचक असलेला, अगदी एखाद्या वाक्यानेही जनतेला प्रेमाने बांधू शकणारा, जनसामान्यांची नाळ जोडलेला उदयनराजेंसारखा दुसरा नेता नाही. का रे, हे काम का होत नाही? तातडीने ते कर, असा अधिकाऱ्यांना आदेश देताना ते जी भाषा वापरतात, त्यामुळे सर्वसामान्यांना आजही जलमंदिर हक्काचे वाटते. आजही कित्येक गोष्टींना न्याय न मिळाल्यास सर्वसामान्य लोक जलमंदिरचेच दरवाजे ठोठावतात. ते कुठेही जाऊ देत त्यांच्याभोवती लोकांचा गराडा ठरलेला असतो.
उदयनराजेंच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाले, तर राजघराण्यातले असूनही त्यांनी कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व केला नाही. ज्येष्ठ लोकांपुढे नतमस्तक होणारे आणि बालगोपाळांमध्ये अगदी बालगोपाळ होऊनच रमून जाणारे. एखादी वाईट परिस्थिती पाहिल्यावर हळवेपणा जपणारेही उदयनराजेच. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ. मात्र, अन्यायाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत तोंड द्यायची धमकही फक्त उदयनराजेंकडेच आणि हाच त्यांचा रक्तातील गुणधर्म. आपला मतदारसंघ सोडून पूर्ण देशावर आपली पकड मजबूत असणारा नेता म्हणून उदयनराजेंकडे आदराने पाहिले जाते.
एखादा विषय जर उदयनराजेंनी हाती घेतला, तर त्या विषयाचा शेवट केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. आपला मतदारसंघ तर कोणीही हलवेल. मात्र, दिल्लीची सूत्रे साताऱ्यातून हलविण्याची धमक फक्त उदयनराजेंकडे आहे. राज्यात असो किंवा केंद्रात, मंत्रालय असो किंवा संसद, जिथं फक्त एकाच ब्रँडची चर्चा असते आणि तो ब्रँड म्हणजे स्वतः उदयनराजे... याचा सातारकर म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटतो. त्यामुळेच राजे, सातारकर जनतेसोबत आपण अखंड महाराष्ट्राचे भूषण आहात. देशवासीयांसाठी एक आदराचे आणि हक्काचे स्थान आहात. अशा महाराज साहेबांच्या धडाडीचा उपयोग साताऱ्यासह देशासाठी होवो, त्यासाठी त्यांना निरोगी आरोग्य लाभो, हीच आजच्या वाढदिवसानिमित्त आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.