रशियापर्यंत पोचलेला फकीरा

रशियापर्यंत पोचलेला फकीरा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्हातील वाटेगाव येथे एक ऑगस्ट 1920 रोजी मातंग समाजातील भाऊ शिदोजी साठे यांच्या पत्नी वालुबाई यांच्या पोटी झाला. लहानपणी त्यांचे नाव तुकाराम असे ठेवले होते. त्यावेळच्या जातीभेदाच्या भक्कम तटबंदीमुळे गावात राहून मोलमजुरी व दोरखंड बनवण्याचे काम करत होते. त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसातरी चालत होता. तो काळ इंग्रजांचा होता. भारत गुलामगिरीत जखडला होता. इंग्रजांविरोधात देशात आंदोलने, मोर्चे सुरू होते. या लढाईत अखंड भारतातील त्यावेळेचे नेते ते सामान्य माणूस आपली लढाई देशासाठी लढत होते.
 
इंग्रजांचे नुकसान करीत होते, कुठे लुट तर कुठे रेल्वे रूळ उघडणे आणि इंग्रजांना जेवढी हानी पोचवता येईल, तेवढी पोचवत होते. प्रत्येक क्रांतिकारी आपल्या परीने योगदान देवून त्यावेळी इंग्रजांना देशातून हाकलून देश आझाद करण्यासाठी प्रत्येक क्रांतिकारी आपल्या जिवाची पर्वाही करत नव्हते. या लढ्यात धाडसी असा मातंग समाजही आपल्या देशाची प्रामाणिकपणे सेवा करत होता. ही धाडसी माणसं इंग्रजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या समाजाचे नाव गुन्हेगार यादीत सामाविष्ट केले. त्यांना गुन्हेगार ठरवण्यात आले. कारण नसताना पोलिस ठाण्याला रोज हजेरी आणि कधीही रात्री-अपरात्री बोलावणे, असे अत्याचार होऊ लागले. त्यामुळे मातंग समाज डोंगरदऱ्यांत राहू लागला. यावेळी अण्णा भाऊ शाळेत जाऊ लागले. तिथेही जातीभेद मिळणारी वागणूक. ते नावालाच शाळेत गेले. पुन्हा त्यांनी शाळा कायमचीच सोडली.
 
सांगली जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा. बर्डे गुरुजी, क्रांतिसिंह नाना पाटील अशी रत्ने याच जिल्ह्यात जन्मलेली. अण्णा भाऊ साठे हे या क्रांतीच्या लढ्यात उतरले. देशसेवेचा आपला वाटा उचलला. अण्णा भाऊ यांच्या या कामगिरीमुळे इंग्रजांची नजर त्याच्यावर पडू लागली. घरच्यांची पोटापाण्याची जबाबदारी क्रांतिकारकांच्या सहवासात पार पाडता येईना म्हणून त्यांनी मुंबईची वाट धरली. अण्णा भाऊ साठे मुंबईत गेल्यावर मिळेल ते काम करू लागले. त्यावरच त्यांच्या उदरनिर्वाह चालू झाला. हमाली ते सूतगिरणीत काम करू लागले. त्यांच्या सहवासातील मंडळींच्या माध्यमातून थोरा-मोठ्यांच्यात ते चांगल्या प्रकारे वाचायला, लिहायला शिकले. गिरणी कामगाराच्या लढ्यापासून अण्णा भाऊंना पोवड्याची गोडी लागली. त्यात त्यांनी लालबावटा पथकातून गाणी गायली आणि रचली. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्यांच्या पोवाड्यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला. अण्णा भाऊंनी कल्पनेच्या साहित्यापेक्षा वास्तववादी, अनुभवलेले साहित्यास प्राधान्य दिले. सामान्य माणसाचे दु:ख, त्यांचा लढाऊपणा आणि समाजात होणारे अत्याचारही मांडले. अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यात सामान्य माणसाला पहिल्यांदा अन्यायाविरोधात लढणारा सामान्य नायक मांडला. अण्णा भाऊंनी माणसांच्या व्यथा जशा आपल्या कथानकातून टिपल्या तसेच निसर्ग व नद्यांचे वर्णनही केले आहे. 
 
अण्णा भाऊ हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा, कादंबरी हे साहित्यप्रकार त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या वैजंता, टिळा लाविते मी रक्ताचा, डोंगरची मैना, माकडीचा माळ, मुरळी मल्हारी रायाची, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अशी ही साताऱ्याची तऱ्हा, अलगुज आणि फकिरा या कांदबऱ्या खूप गाजल्या. अण्णा भाऊ म्हणजे फकिरा आणि फकिरा म्हणजे अण्णा भाऊ साठे इतके घट्ट समीकरणच तयार झाले होते आणि आहे. ही मराठी वाचकांचाच नव्हे भारतभर तसेच विदेशातही या कांदबरीची लोकप्रियता होती. विदेशी भाषेमध्ये या कांदबरीच्या आवृत्या निघाल्या. फकिरा कांदबरीलाच महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. फकिरा या कांदबरीत अण्णा भाऊंनी गावकुसवाबाहेरचा मागासलेल्या माणसाचे वर्णन केले आहे. सामान्य माणसाचा प्रामाणिकपणा, धाडसीपणा दाखवला आहे. त्यावेळची मातंग समाजाची अवस्था ऐकून सर्व उपेक्षित समाजाची परिस्थिती दाखवली आहे. ग्रामीण भागाचे संस्कृती, जात, गाव, भावकी, बलुतेदारीचे चित्रण त्यांनी फकिरातून मांडले आहे. फकिरा कांदबरी वाचताना जणू काही आपल्या समोरच सारं चाललंय असे वाटते. झोपडपट्टीत राहणाऱ्याच्या हातून अस्सल बावन्नकशी कसदार साहित्य निर्माण झाले. साहित्यिक अनेक झाले, अण्णा भाऊ हेच साहित्यसम्राट ठरले. शाळा नावालाच होती. शिक्षण कमी असूनदेखील ते लिहायला, वाचायला मुंबईत मित्रमंडळींच्या सहवासात शिकले. अण्णा भाऊ साठेंनी मराठी साहित्यातील कथा, लोकनाट्य, कादंबरी, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णने असे अनेक लेखन प्रकार हाताळले. तमाशा या लोकनाट्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय अण्णा भाऊ साठे यांना जाते. सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी या साहित्यप्रकाराचा उपयोग करून घेतला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जनजागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवामुक्ती संग्राम असो, या चळवळींमध्ये त्यांनी आपल्या शाहिरीतून मोठे योगदान दिले.
 
"माझी मैना गावाकडे राहिली, 
माझ्या जिवाची होतीया काहिली' 
ही त्यांची अत्यंत गाजलेली लावणी होती.
 
अण्णा भाऊ फकिरा कादंबरीमुळे रशियापर्यंत पोचले. रशियाकडून त्यांचा सन्मान देखील झाला. अण्णा भाऊंनी आपल्या लेखणीमधून 21 कथासंग्रह 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही काढले गेले."फकिरा" कादंबरीला 1961 मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. 
खाणकामगार, डोअरकिपर, हमाल, रंगकामगार, तमाशातला अशा विविध भूमिका अण्णांनी प्रत्येक जीवनात वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर (मुंबई) झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णा भाऊंच्या एकापेक्षा एक कलाकृतींची निर्मिती झाली. मुंबईत कामगारांचे कष्टमय दुःखाचे जीवन तसेच मुंबईच्या झोपडपट्टीत उघडेवाघडे जगणे, त्यांच्या जगण्यातील भयान वास्तव त्यांनी पाहिले. त्यांचा भुकेकंगालपणा आणि भुकेची आग शांत करण्यासाठी होणारी ससेहोलपट, अवैध मार्गाचा अवलंब या साऱ्या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या आणि ते विदारक आणि अद्‌भुत वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. शिक्षणापेक्षा अनुभव हाच मोठा गुरू असतो, या गोष्टीची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. अण्णा भाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचे स्मरण करून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. शाहीर अमर शेख समवेत त्यांनी काम केले. अण्णा भाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म होती. नाट्यमयता त्यांच्या लेखनशैलीचा आगळावेगळा भाग होता. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून अण्णा भाऊंनी अनुभूती घेतली, त्यातील अनुभव त्यांच्या लेखनातून जाणवला. अण्णा भाऊंचा शेवटचा काळ मात्र अत्यंत हलाखीत गेला. दारिद्य्र आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. मराठी साहित्य प्रतिष्ठानकडून त्यांची उपेक्षाच झाली.
 
अनेक विद्यापीठांतून अण्णा भाऊंच्या साहित्यावर अनेक प्रबंध प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांवर केवळ भारतीयच नव्हे तर 22 परकीय भाषांत भाषांतरे झाली. हजारो वाचकांनी त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची अक्षरशः पारायणे केली. अण्णा भाऊंच्या वेगळ्या जीवनदृष्टीचा येथे प्रत्यय येतो. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तोलली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे,' अशी अण्णा भाऊंची विज्ञाननिष्ठ भूमिका होती. 
"जग बदल घालुनी घाव l
असं सांगून गेले मला भीमराव ll
असे डॉक्‍टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची निष्ठा होती. अण्णा भाऊ साठे यांचे सारेच लेखन उपेक्षितांच्या बाजूचे आणि त्यांच्या अटीतटीच्या जगण्यातील संघर्षाचे व अनुभवविश्वाचे प्रखर वास्तव अधोरेखित करणारे होते.

हे वर्ष अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या महान आणि उपेक्षित राहिलेल्या साहित्यसम्राटाने 13 लोकनाट्ये, तीन नाटके, 35 कांदबऱ्या, एक शाहिरी पुस्तक, 15 पोवाडे, एक प्रवास वर्णन, सात चित्रपट कथा असे विपुल लेखन आपल्या अल्पशा जीवनात केले. प्रत्येक दिवस संघर्षाशी लढत काढला. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे लढण्याचे बळ देते. बहुजनशोषक व्यवस्थेला आपल्या साहित्य लिखानातून त्यांनी हादरे दिले आहेत. अण्णा भाऊ यांचे साहित्य शोषितांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून अन्यायाविरोधात लढणारा, न्यायाची चाड असणारा, स्वातंत्र्य, समता आणि न्याय ही तत्त्वे जोपासणारा नायक उभा केला. 
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे या महान साहित्यिकांची स्मृती सदैव आपल्या सर्वांच्या मनात जागृत ठेवूया, हीच त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांना खरी आदरांजली ठरेल. असा फकिरा परत होणे नाही..

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.