Sharad Pawar Resigns :"तेल लावलेले पैलवान" शरद पवार असे धक्कादायक निर्णय का घेतात ? आत्मचरित्रात सांगितलंय सिक्रेट

राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप बरोबरच अजित पवार यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे
Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

नुकताच शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन केले तेव्हा त्यांनी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचा राजकीय बॉम्ब टाकला. याचे पडसाद देशभर उमटले. फक्त कार्यकर्तेच नाही तर नेतेमंडळींसाठी हा धक्का न पचणारा होता. कित्येकांच्या डोळ्यात अश्रु होते.

भाकरी फिरवावी लागेल असे सुतोवाच करणारे शरद पवार असा मोठा निर्णय घेतील हे कोणी स्वप्नात देखील विचार केले नसेल. राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप बरोबरच अजित पवार यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. विरोधकांच्या सोबतच स्वकीयांना देखील त्यांनी क्लीन बोल्ड केलं आहे. पवारांची खेळी अनेक प्रश्नांचे उत्तर देणारी तर असतेच मात्र शिवाय अनेक नवे प्रश्न निर्माण करणारी देखील असते.

खरं तर शरद पवार यांची देशाच्या राजकारणात ओळख तेल लावलेला पैलवान अशी आहे. कोणताही डाव खेळला तरी विरोधकांच्या हातात कधीच हातात न सापडणे ही त्यांच्या राजकारणाची खासियत राहिली आहे. १९७८ साली वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुलोदचे सरकार स्थापन करण्यापासून ते शिवसेना कॉंग्रेससोबत तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यापर्यंत त्यांची राजकारणातील चाणक्यनीती इतरांच्या कायम दोन पावले पुढे राहील अशीच आहे.

बाकीचे बेसावध असताना शरद पवार अशी खेळी खेळतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणे हे राजकारणात धोकादायक समजले जाते. याचा त्यांना फायदा देखील झाला आहे आणि तोटा देखील झाला आहे. शरद पवार असे धक्कादायक निर्णय का घेतात याचं उत्तर त्यांनीच आपल्या आत्मचरित्रात सांगितलेलं आहे.

शरद पवार सांगतात, ‘कात्रजचा घाट दाखवणं' हा शब्दप्रयोग मी करत असलेल्या राजकारणाबाबत अनेकदा वापरला गेला, अजूनही जातो. आपल्या प्रतिस्पर्ध्याना आपल्या डावपेचांचा थांगपत्ता लागू न देणं, ही हातोटी राजकारणात असावी लागते. माझ्याकडे ती आहे आणि तिचा वापर मी खुबीनं करत आलो आहे.”

शरद पवारांनी याचं उदाहरण देखील दिलेलं आहे. ते सांगतात,” महाराष्ट्र विधानसभेच्या २०१४ सालच्या निवडणुकांचे निकाल पूर्ण हाती येण्याआधीच संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन मी 'भारतीय जनता पक्षा'ला (भाजप) सरकार स्थापण्यासाठी आमच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस'चा पाठिंबा जाहीर करून टाकला. माझ्या या घोषणेनं राजकीय पक्षांना आणि राजकीय विश्लेषकांना कोड्यात टाकलं.”

त्यांची अशा बाबतीत स्वच्छ आणि सरळ भूमिका असते. आपली बाजू कमकुवत असताना, विरोधकांना आपल्या रणनीतीचा थांगपत्ता न लागल्यामुळे ते चाचपडत असतानाच आपण चार पावलं त्यांच्यापुढे जाऊ शकतो. आपण केलेल्या राजकीय खेळीचा नेमका अर्थ काय, याचं आकलन होण्याआधीच आपण पुढची मजल मारलेली असते असं शरद पवार सांगतात.

शरद पवार यांची विरोधी पक्षातील नेत्यांशी देखील चांगली दोस्ती आहे. हीच मैत्री कित्येकदा त्यांच्या बद्दल शंका निर्माण करणारी ठरते, त्यांच व्यक्तिमत्व गूढ बनवते. मात्र हा गैरसमज देखील शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात दूर केला आहे.

ते सांगतात, “ माझा पिंड जरी 'काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असला, तरी माझी मैत्री पक्षातीत आहे. कारण राजकीय मतभेद म्हणजे व्यक्तिगत शत्रुत्वाची जोजवण नव्हे. मनात ग्रह धरून, अढी ठेवून केलेलं राजकारण आणि समाजकारण लोकशाहीतल्या संवादाची प्रक्रियाच कुंठित करतं. अशा संवाद-प्रक्रियेला मी कधी खीळ बसू दिली नाही. लोकशाही प्रणालीत वैचारिक देवघेव हाच तर समस्यांतून मार्ग काढण्याचा एकमेव पर्याय आहे.

विशेषतः आघाडी सरकारांचं राजकारण स्थिरावल्यावर संवादी भूमिका अपरिहार्य ठरली आहे. हा माझा स्वभाव आहे. माझ्या सर्वपक्षीय सौहार्दाच्या मैत्रीच्या संबंधांमुळेच आघाडी सरकारांसमोर उद्भवणाऱ्या अडचणींच्या निवारणाची जबाबदारी माझ्यावर पडत गेली. याचा काही वेळा फटकाही बसला.

राजकीय विचारप्रणाली, बांधिलकी अलाहिदा; त्या त्या व्यक्तीशी जुळलेल्या स्नेहामुळे माझ्या विश्वासार्हतेवरच अनेकदा प्रश्नचिन्हं उपस्थित केली गेली. परंतु माझी धारणा स्वच्छ होती, मी त्याची कधीच फिकीर केली नाही. याची राजकीय किमतही मोजावी लागली, जी मी चुकती केली, तरीही शत्रुत्वाची भावना राजकारणात बळावू दिली नाही.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.