Sharad Pawar : तेलगीला पवारांचे नाव कुणी घ्यायला लावले? खुद्द वकिलांनी केला खुलासा

sharad pawar news
sharad pawar newsesakal
Updated on

(तेलगी प्रकरण नेमकं काय होतं? आणि पडद्यामागे काय घडामोडी घडल्या? यासंदर्भात तेलगीचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी लिहिलेला हा लेख)

पुणे येथील मोका विशेष न्यायालयात बनावट मुद्रांक घोटाळ्यातील तत्कालीन प्रमुख आरोपी अब्दुल करीम लाड साब तेलगी व त्याची पत्नी शाहिदा अब्दुल करीम तेलगी या दोघांचे वकीलपत्र पुणे येथील विशेष न्यायालयातील खटल्यात माझ्याकडे होते. तेलगी आमचा अशीलच असल्याने तेलगीला पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये अनेकवेळा भेटण्याचा व मुलाखत घेण्याचा प्रसंग आला.

अब्दुल करीम तेलगी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये जवळपास चार ते पाच वर्ष येरवडा कारागृहातील विशेष सुरक्षा असलेला 'अंडासेल' येथे त्याला ठेवण्यात आले होते. अब्दुल करीम तेलगी याची कारागृहात जाऊन मुलाखत घ्यावयाची असल्यास विशेष मोका न्यायालयाची परवानगी घेऊन येरवडा कारागृहामध्ये अंडा सेलमध्ये जाऊन मुलाखत मला मिळत असे. त्या गोष्टीला सीबीआयची देखील परवानगी होती. कायद्यानुसार वकील व कुठलाही न्यायालयीन बंदी असलेला कैदी किंवा आरोपीची मुलाखत घेण्याचा अधिकार आम्हा वकिलांना असतो.

संबंधित न्यायालयीन बंदी व वकील यांच्यातील संभाषण हे विशेष अधिकारात येते त्यामुळे त्याची गुप्तता ठेवावी लागते असा नियम आहे. ते संभाषण जाहीर करावे किंवा करू नये हा पूर्ण अधिकार त्या संबंधित वकिलांचा असतो. ते संभाषण जाहीर करावं यासाठी कोणी सक्ती करु शकत नाही. परंतु सध्या अनेक वर्षांनंतर पुन्हा वेब सीरिज व इतर माध्यमातून काही राजकीय डावपेच डोळ्यासमोर ठेवून पून्हा चर्चा घडवून आणली जाते की काय, अशी शंका आल्याने सत्य परिस्थिती काय होती हे देखील समाजासमोर येणे आवश्यक आहे. कारण तेलगी प्रकरणात तेलगीच्या अटकेनंतर नेमकं काय घडत होतं व तेलगीचेच वकीलपत्र व तो अशीलच असल्याने तेलगीचा वकील म्हणून बऱ्याच गोष्टी मला मला माहित होत्या व आहेत.

तेलगीच्या अटकेनंतर तपासादरम्यान त्याची हैदराबाद येथे एक नार्को टेस्ट करण्यात आली, असं सीबीआयचे म्हणणं होतं. संबंधित नार्को टेस्टमध्ये काही राजकीय नेत्यांची नावे आली होती. कालांतराने संबंधित नार्को टेस्ट अनेक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर तात्काळ मला तेलगीने कारागृहातून स्वतःच्या हस्ताक्षरात एक पत्र लिहून दिलं होतं. नार्को टेस्ट प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर तात्काळ मी स्वतः तेलगीला पुण्याच्या येरवडा कारागृहात अंडासेलमध्ये जाऊन जवळपास एक तास चर्चा केली होती.

त्यावेळी तेलगीने स्वतः मला सांगितले होते की, जी नार्को टेस्ट करण्यात आली त्यामध्ये मी स्वतःहून कुठल्याही राजकीय नेत्यांचा नामोल्लेख केला नव्हता किंवा नाही. मी शरद पवारांना कधीही कुठेही भेटलेलो नव्हतो किंवा त्यांची माझी ओळखदेखील नाही. त्यामुळे नार्को टेस्ट दरम्यान नेमकं काय घडलं होतं, मला काही नावं जाणीवपूर्वक घ्यायला कसे लावत होते, हे मी न्यायालयातच शपथेवर उघड करेन असं मला स्वतः तेलगीने समक्ष मुलाखतीदरम्यान येरवडा कारागृहातील अंडासेलमध्ये सांगितले होते. परंतु न्यायालयीन प्रक्रियेत या खटल्यामध्ये अनेक घडामोडी घडत होत्या. त्यामुळे शेवटपर्यंत त्या नार्को टेस्टच्या दरम्यान नेमकं काय घडलं होतं, तेलगीवर नार्को टेस्टच्या वेळी कोणाचा दबाव होता किंवा काय हा प्रश्न आजपर्यंत अनुत्तरितच राहिला.

अब्दुल करीम तेलगी याच्यावर २००१ साली स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा आरोप लावण्यात आला होता. या घोटाळ्याच्या बातमीने संपूर्ण देश हादरला होता. अब्दुल करीम तेलगीलाही याच वर्षी तुरुंगात जावे लागले होते.

अब्दुल करीम तेलगी हा मुळचा कर्नाटकातील खानापूर येथील रहिवासी. त्याचे वडील भारतीय रेल्वेत नोकरी करत होते. पण अब्दुल करीम तेलगी लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर भाजीपाला, फळे, शेंगदाणे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याला करावा लागला होता. हे सर्व तो रेल्वेतच विकायचा.

तेलगीने खानापुरातील सर्वोदय विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर बी.कॉमची पदवी घेण्यासाठी तो बेळगावातील एका महाविद्यालयात गेला. यानंतर तो उदरनिर्वाहासाठी मुंबईत गेला. मुंबईत काही काळ घालवल्यानंतर अब्दुल करीम तेलगी परदेशात सौदीला गेला. काही वर्षांनी तो पुन्हा मुंबईत आला आणि त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

अब्दुल करीम लाडसाब तेलगी उर्फ करिम लाला सौदीहून मुंबईला परतल्यावर तो ट्रॅव्हल एजंट बनला. नंतर त्याने स्वत:हून अनेक कागदपत्रे आणि स्टॅम्प पेपर बनवले, जेणे करून तो सौदी अरेबियात लोकांना पाठवू शकेल. १९९३ मध्ये इमिग्रेशन अथॉरिटीने अब्दुल करीम तेलगीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी अब्दुल करीम तेलगीला तुरुंगातही जावे लागले. त्याच्यावर फसवणुकीचा आरोप होता. यासाठी अब्दुल करीम तेलगीला दक्षिण मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

पोलीस कोठडीत असताना अब्दुल करीम तेलगीची ओळख तेलगी प्रकरणातील सहआरोपी असलेल्या राम रतन सोनी याच्याशी झाली. तो एक सरकारी मुद्रांक विक्रेता होता जो कोलकत्याचा होता आणि तो तेथून हे काम हाताळत असे. या घोटाळ्याची कल्पना कोठडीतच दोघांमध्ये जन्माला आली. सोनीने अब्दुल करीम तेलगीला स्टॅम्प आणि नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर विकण्यास सांगितले, त्या बदल्यात त्याने कमिशनची मागणी केली. यानंतर बनावट स्टॅम्प पेपरचा घोटाळा सुरू झाला.

सन १९९४ मध्ये राम रतन सोनी सोबत काम करत असताना, अब्दुल करीम तेलगी याने रितसर मुद्रांक विक्री परवाना घेऊन कायदेशीर मुद्रांक विक्रेता बनला. अब्दुल करीम तेलगी आणि सोनी या दोघांनी मिळून अनेक बनावट स्टॅम्प पेपर तयार करून आपला व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. अब्दुल करीम तेलगीने मूळ मुद्रांक हे खोट्या व बनावट मुद्रांकांत मिसळण्यास सुरुवात केली. ज्यावर त्याने भरघोस नफा मिळवला. बनावट मुद्रांक व्यवसायातून त्याने भरपूर पैसे कमावले आणि स्वतःचे अनेक इतर व्यवसाय सुरू केले.

१९९५ मध्ये अब्दुल करीम तेलगी आणि सोनी हे वेगळे झाले. या दरम्यान अब्दुल करीम तेलगी पुन्हा एकदा अडचणीत सापडला. मुंबई पोलिसांनी अब्दुल करीम तेलगी विरुद्ध बनावट शिक्के विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा मुद्रांक विक्री परवाना रद्द करण्यात आला होता.

सर्वात आधी तेलगीने स्वतःची प्रेस कंपनी काढली. सन १९९६ मध्ये अब्दुल करीम तेलगीने आपल्या संपर्कातील काही लोकांना कामावर घेतले आणि मुंबईतील मिंट रोड येथे स्वतःची प्रेस उघडली. त्याने आपले संबंध वापरून अनेक मशीन्स खरेदी केल्या. ही सर्व यंत्रे जुन्या पद्धतीची होती. हळूहळू त्याचा व्यवसाय इतर शहरांमध्येही पसरू लागला. अनेकांनी बनावट मुद्रांक खरेदी करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी या मुद्रांकांचा चुकीच्या पद्धतीने मालमत्तेची नोंदणी करण्यासाठीही वापर करण्यात आला. विम्याची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. १९९० च्या दशकात अब्दुल करीम तेलगीचा धंदा कोट्यवधी रुपयांचा झाला.

२००१ मध्ये अब्दुल करीम तेलगीला अजमेरमध्ये पोलिसांनी अटक केली होती. २००० साली बंगळुरूमध्ये बनावट मुद्रांक विकताना पकडलेल्या दोन लोकांना अटक करण्यात आली होती. या दोघांच्या अटकेनंतर हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला होता. ज्या नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. त्यावेळी अब्दुल करीम तेलगीच्या देशभरात ३६ मालमत्ता असल्याचे आढळून आले होते. तसेच त्याचे १८ देशांमध्ये १०० हून अधिक बँक खाती उघडली होती.

देशभर गाजलेल्या या बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा अब्दुल करीम तेलगी होता. रेल्वे सुरक्षा बलाचे काही अधिकारी या प्रकरणात आरोपी होते. २००३ ला हा घोटाळा खऱ्या अर्थानं बाहेर आला होता. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं २५ ऑगस्ट २००४ मध्ये या प्रकरणात तेलगीसह सहा आरोपींविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०१५ मध्ये या संशयितांवर आरोपपत्र निश्चित करण्यात आलं होतं. या प्रकरणात नाशिकरोड येथील इंडियन सिक्युरिटी प्रेसमधून मुद्रांक छापल्यानंतर ते देशभर रेल्वेने पाठवले जात होते. तेलगीनं रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून हे मुद्रांक चोरीचा प्रकार सुरू केला होता. बनावट मुद्रांक घोटाळ्याची सुरुवात येथूनच झाली.

sharad pawar news
Marathwada Mukti Sangram Din : ...अन् मराठवाडा भारतात विलीन झाला!

तेलगीनं मुद्रांकाचं महत्त्व ओळखून त्यानं नाशिकरोड येथील छापखान्या पासून देशभरातील मुद्रांक वितरण प्रणालीचा अभ्यास केला. त्यानंतर त्यानं रेल्वे पोलिसांशी संधान बांधून मुद्रांक चोरी केले. काही पोलिसांशी संगनमत झाल्यामुळं सुरुवातील त्यानं खरे मुद्रांक विकले. यावेळी ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्याला मदत केली त्यांच्याविरुध्द नंतर गुन्हे दाखल झाले.

तेलगीनं रेल्वे कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या बरोबर संबंध प्रस्थापित केले. त्यामुळं नंतर त्याला या मुद्रांकांची घरबसल्या माहिती मिळू लागली. त्यानंतर त्यानं बंदोबस्त व सुरक्षा यंत्रणेतल्या उणिवाही शोधून काढल्या. तेलगीनं जवळपास निम्म्या देशात आपले बनावट मुद्रांक विक्रीचं जाळं विणलं होतं. काही राज्यांत तर सरकारी तिजोरीतील मुद्रांक विकले जात नव्हते, तर त्याचवेळी बाजारात मुद्रांक विक्री जोरात सुरू होती. अगदी उदाहरण द्यायचे तर, कर्नाटकात एक वर्ष सरकारी मुद्रांकांची विक्री झाली नसल्याचं उघड झाल्यावर खऱ्या अर्थानं या घोटाळ्याला वाचा फुटली होती. कर्नाटक पोलिसांनी त्याला बनावट मुद्रांक प्रकरणात २००० साली अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतरही त्याचा या व्यवसाय तेजीत सुरू होता. अशा प्रकारचे आरोप पुणे पोलिस त्यानंतर एस आय टी व सीबीआय करत होते. या गुन्ह्याचा तपास तीन तपास यंत्रणांनी केला होता. पुण्यात या गुन्ह्याचा तपास व व्याप्ती इतकी वाढली की, या गुन्ह्यात आंध्र प्रदेशचा एक तत्कालीन माजी मंत्री, काही राजकीय व्यक्ती, काही उच्चस्तरीय पोलीस अधिकारी यांना अटक झाली होती.

sharad pawar news
Devendra Fadnavis : ''मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही'' ओबीसींच्या आंदोलनात फडणवीस बोलले

तेलगी तपासादरम्यान आणि न्यायालयात वारंवार सांगत होता की, या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार मी नाही. या व्यवसायात त्याला मदत करणाऱ्या बड्या धेंडांची माहिती देण्यासही तो तयार होता. त्यासाठीच्या काही फाईल्स, त्यानं स्वतः लिहिलेली पत्रे त्यानं माझ्याकडे दिली. मात्र, ही पत्रे कधी उघड करायची, याबाबत त्यानं मला काही सूचना दिल्या होत्या. तेलगीनं लिहिलेली ही हस्तलिखित उघड झाल्यास अनेक बड्या राजकारण्यांची पोलखोल होवू शकते, असं म्हटलं गेलं होतं. मात्र, तेलगीवर असलेल्या प्रचंड दबाबामुळं त्यानं पुण्यात दाखल असलेला गुन्हा कबुल करण्याचा निर्णय घेतला आणि या खटल्यावर पडदा पाडण्यात अदृश्य शक्ती यशस्वी झाली, असं म्हटलं जात होतं किंवा तशी चर्चा घडवून आणली जात होती.

परंतु या सर्व कपोलकल्पित कथा होत्या. मी तेलगीला आठवड्यातून २ वेळा असं किमान ४ ते ५ वर्षे भेटत होतो. पुणे येथील विशेष मोका न्यायालयात गुन्हा कबूल करताना तेलगीने माझ्याशी चर्चा केली होती. एकटा तेलगीच नाही तर त्याच्या सोबतच्या जवळपास ३० ते ४० आरोपींनी गुन्हा कबूल केला होता. मी ठामपणे सांगू शकतो की, यामागे कुठल्याही अदृश्य शक्तीचा हात वगैरे काही नव्हता. ती एक न्यायालयीन प्रक्रिया होती. तेलगीची पत्नी, भाऊ आणि दोन पुतणे असे पाच जण या गुन्ह्यांत आरोपी होते. तर २०१७ मध्ये बनावट मुद्रांक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अनेक व्याधींनी त्रस्त असलेल्या अब्दुल करीम तेलगी उर्फ करीम लाला याचा मृत्यू बेंगळुरू येथील कारागृहात झाला. २०२२ मध्ये तेलगीची पत्नी शाहिदा हिचा देखील मृत्यू झाला आहे. तसं तर मला आजही तेलगी प्रकरणातील अनेक गुपितं माहिती आहेत. ती गुपितं खुद्द तेलगीनेच मला अनेकदा मुलाखती दरम्यान सांगितली आहेत. परंतु आता जर आमचा अशीलच हयातीत नसेल तर ते गुपितं उघड करून काय निष्पन्न होणार आहे. तेलगीचा मृत्यू झाला त्याच्याबरोबर त्या गुपितांचा देखील मृत्यू झाला, असं मी मानतो.

त्यामुळे आता त्या तेलगी खटल्यातील मुख्य आरोपीचे निधनानंतर जर कोणी हे प्रकरण उकरून काढून त्यावर चर्चा घडवून आणत असतील तर तो फक्त काही राजकीय नेत्यांचा बदनामीचा व राजकीय डाव असू शकतो असं मला वाटतं.

- ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार

माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.