समाजव्यवहार, मूल्ये आणि संस्कार 

Values
Values

शिक्षणतज्ज्ञाच्या मतानुसार समाज आणि कुटुंब अनौपचारिक शिक्षणाची महत्त्वाची माध्यमं आहेत आणि त्याद्वारेसुद्धा मूल शिकत असते आणि असे शिक्षण सुद्धा त्या मुलाच्या जडणघडणीत खूपच महत्त्वाची भूमिका निभावणारे ठरते. समाजतज्ज्ञांनी केलेल्या व्याख्येप्रमाणे सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजे समाज. त्यामध्ये व्यक्ती, त्यांचे समूह आणि उपसमूह यांचा समावेश होत असतो. समाजामध्ये ज्याप्रमाणे स्थितिशीलता असते, त्याचप्रमाणे तो बदलतही असतो म्हणजे त्याला गती असते. त्याचे असे बदलणे, त्या बदलाचा वेग त्या समाजाची स्थिती ठरवीत असतो. इतिहासामध्ये अनेक समाजसुधारकांनी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने अनुकूल अशी गतिशीलता वाढावी यासाठी परिवर्तनाचे लढे उभे केलेले आपल्याला दिसते. या सर्व व्यवहारांचा परिणाम त्या मुलांच्या जडणघडणीत होत असतो. त्यातून ते शिकत असते, त्यातून त्याच्यावर संस्कारही होत असतात. 

आपण स्वीकारलेल्या व्यवस्थेला पूरक समाजव्यवहार असेल तर त्या व्यवस्थेचा विकास आणि त्याचे टिकणेसुद्धा अवलंबून असते. म्हणजेच आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे, तिची मूल्ये समाजाने स्वीकारली तरच ती व्यवस्था टिकणार असते. समाजाचा व्यवहार त्या मूल्यांच्या विपरीत राहिला तर मात्र त्या व्यवस्थेच्या अस्तित्वालाच धक्‍क्‍का लागण्याची शक्‍यता निर्माण होते. आणि दुर्दैवाने आपल्याकडे तसे होण्याची शक्‍यता दिवसेंदिवस वाढत आहे. धर्मनिरपेक्ष, जातिनिरपेक्ष समाजनिर्मिती हे आपले ध्येय आणि मूल्य आहे; परंतु आज जातसमूहालाच समाज संबोधण्याची पद्धत रूढ होत असल्यामुळे, समाज या संकल्पनेची व्याख्याच संकुचित होत आहे. हे सर्व असे होत असताना समाजरूपी शाळेतून त्या मुलांवर होणारे संस्कार हे भविष्यात तो देशाचा नागरिक म्हणून कशी भूमिका निभावणार, हे ठरणारे असते. याबाबत चर्चेसाठी आपण शिक्षणाचे उदाहरण घेऊ. 

भारतामध्ये मागील दोनशे वर्षांपासून, समाज परिवर्तनासाठी शिक्षणप्रसार आवश्‍यक आहे, त्याच्याशिवाय समाजपरिवर्तन अशक्‍य आहे, हे ओळखून अनेक समाजसुधारकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केले. महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, हा सर्व इतिहास आपल्याला ज्ञात आहेच. आपल्या लोकशाही व्यवस्थेने शिक्षण महत्त्वाचे मानून त्याच्या प्रसारासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, त्याचे खूप चांगले परिणामही झाले आणि होतही आहेत. तरीही अनेक समस्यांनी ग्रस्त असणाऱ्या आपल्या शिक्षणव्यवस्थेला आणखी खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. अनेक समस्यांपैकी आपण फक्त शाळाबाह्य मुलांचा प्रश्न या एकाच समस्येकडे पाहिले की आपल्याला किती मोठा पल्ला गाठायचा आहे, हे लक्षात येते. अशा शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी शासनाला विशेष प्रयत्न करावे लागत असतात. शासकीय व्यवस्थेने ते केले पाहिजेतच, त्यांचे ते कर्तव्यच आहे. परंतु एखाद्या गावातील एखादे मूल अशा पद्धतीने शाळाबाह्य झाले तर त्या गावातील समाज त्या मुलाला शाळेत येण्यासाठी म्हणून काय करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. कारण, शिक्षण प्रसार हे केवळ शासकीय यंत्रणेचे कर्तव्य आहे की समाजालाही त्याबाबत काही भूमिका आहे, यावर शिक्षणप्रसार अवलंबून असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ते मूल शाळेत जात नाही तर ते नक्की काय करते, याची माहिती त्याच्या परिसरातील समाज वा समूहांना असते. बऱ्याच वेळा ते गावातच कुठेतरी बालकामगार बनलेले असते. त्या वेळेस समाज याची नोंद घेतो का? जर घेत नसेल तर का घेत नसावा, हा मोठा प्रश्न आहे. जर समाजाने त्याची नोंद घेतली, तो शाळेत यावा म्हणून प्रयत्न केला तर महात्मा फुल्यांच्या शिक्षण लढ्याची नोंद त्या समाजाने घेतली आहे असे म्हणता येते. परंतु असे होताना दिसत नाही. 

ग्रामीण भागाचा या अनुषंगाने विचार केला की शिक्षण, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य, महिलांचे प्रश्न, बालविवाह आदींसारख्या प्रश्नांची समाजानेच नीटशी नोंद घेतलेली नसते. त्यामुळे त्या प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे राजकारण्यांना शक्‍य होते आणि त्यामुळे ते प्रश्न ग्रामपंचायत निवडणुकीच्या चर्चेत सुद्धा येत नाहीत. नगर जिल्ह्यामध्ये चार वर्षांपूर्वी वादळी वाऱ्याने शाळेचे पत्रे उडून गेले. जर शाळा सुरू असती तर मोठी जीवितहानी झाली असती. परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्याने त्या शाळेला भेट दिली, परीस्थिती जाणून घेतली. संपूर्ण विषयच अभ्यास करण्यासारखा असा होता. गावामध्ये नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या, त्यामध्ये या विषयाची साधी चर्चा झाली नाही. त्यामुळे त्याबाबत कोणत्याच पक्षाने साधे आश्वासन देण्याचे सुद्धा कष्ट घेतले नाही. गावात दरवर्षी दोन पक्षांचे दोन सप्ताह होतात, लाखो रुपये खर्च केले जातात, तो सर्व खर्च लोकवर्गणीतून होत असतो. अशी लोकवर्गणी शाळेसाठी किंवा तत्सम कामासाठी जमेल का, असा प्रश्न केल्यानंतर त्याचे उत्तर नकारार्थीच आले. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. समाज मन सप्ताह आयोजनाबाबत जेवढे संवेदनशील असते, ती संवेदनशीलता शाळेबाबत का राहात नाही? 

व्यक्तीच्या परस्पर संबंधातून समाजव्यवस्था आकाराला येते. तिला सांस्कृतिक अधिष्ठानही असते. ती त्या समाजाची गरजही असते. त्यातूनच संस्कृती तयार होत असते. हे सर्व हजारो वर्षांपासून होत असते. त्यामध्ये गतिशीलता असते, तसा काही बाबतीत स्थायीभावही असतो (उदाहरण म्हणून आपल्याला जातिव्यवस्थेचे घेता येते. ती जातीची उतरंड अजूनही अस्तित्वात आहेच). आपली संस्कृती स्त्रीला देवी मानते, परंतु प्रत्यक्षात समाजात अनुभव मात्र वेगळा येतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणजे न जाणारी स्थितिशीलता आणि न वाढणारी गतिशीलता (लोकशाही व्यवस्थेच्या अनुषंगाने न वाढणारी समाजाची गतिशीलता हा फार मोठा प्रश्न आहे). यामुळे समाजमन हीच मोठी समस्या होते की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. 

मूल शाळेत जातिभेद करू नये म्हणून शिकते, समाजात वावरताना तसा भेद त्याला पदोपदी जाणवतो. शाळेत करुणा, प्रेम, मानवता, विवेक असे बरेच काही शिकवले जाते, त्या मुलाला समाजात वावरताना वाढत्या विषमतेमुळे या सर्व गोष्टींना कसा हरताळ फासला जातो याचा अनुभव येतो. (एकीकडे शिळी भाकरी खाणारा आपला मित्र आणि दुसऱ्या मित्रांची पाळीव कुत्री मात्र पाव-बिस्किटांवर जगताहेत, हे पाहिले की त्यास ही तत्त्वे आचरणासाठी नसतातच की काय, हा संस्कार नकळत समाज करत असतो) महिलांची कुटुंबात आणि समाजात होत असलेली कुचंबणा ते मूल पाहात असते. त्याच वेळेस समाजाला हे चालते, हे असेच असते, हा संस्कार नकळतपणे होत असतोच. समाजाने सर्व प्रश्न सोडवावेत असे नाही; मात्र समाजाने या प्रश्नांची नोंद घेऊन ते सोडविण्यासाठी आग्रही असले पाहिजे. 

दुसरीकडे जातिबाह्य विवाह करताना समाज काय म्हणेल? कोणत्याही प्रकारचा पुरोगामी मात्र चौकटी बाहेरचा विचार करताना समाज काय म्हणेल? धार्मिक रीतिरिवाजांना फाटा दिला तर समाज काय म्हणेल? हे दडपण मात्र त्या समाजातील व्यक्तींवर असतेच. म्हणजे समाजाचा वचक हा व्यक्ती व्यवहारावर असतोच, तसाच वचक लोकशाही, मानवतावादी मूल्यांच्या आग्रहासाठी असला पाहिजे. हा असा वचक लोकशाही, मानवतावादी मूल्यांचा संस्कार घडवून आणेल तसा अनुभव देण्यात समाज यशस्वी झाला की त्या मुलाची जगण्याची शैलीच त्याप्रमाणे राहील आणि समाजाची ठेवणही तशीच कायम राहील. शेवटी व्यक्तींचाच समाज बनलेला असतो. 

- डॉ. सतीश करंडे
शेटफळ, ता. मोहोळ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.