लॉकडाउन मे महिनाअखेरपर्यंत वाढले आहे. होम क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, स्वॅब, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, कोरोना, कोविड १९ असे शब्द गेल्या काही दिवसांत आपल्या परिसरात अधिक चर्चेत आले आहेत. त्यातच सोशल मीडियावरून फिरणाऱ्या पोस्टची भर पडत आहे. वातावरणातील मळभ अजून काही दूर झालेले नाही. त्यामुळेच कधी एकदाचा हा कोरोना मरतोय, अशी भावना जनमानसात झाली आहे.
हीच भावना एकटे असताना विचार करताना सातत्याने मनात घुमत राहते. घरच्या कोलाहलातून क्षणभर मन मोकळे झाले की दिवसभरात आपण कुठे गेलो, कसे आपण स्वतःलाच हाताळले, बाहेरून आल्यानंतर घरातल्यांशी व्यवहार कसा राहिला, काय विसरलो, काय चुकलो, काय सुधारणा करता येईल, याची बेरीज-वजाबाकी मनातील कोपऱ्यातून उसळून वर येते. गरजेपुरते किंवा त्यापेक्षा कणभर कमीच व्यवहार होतात. हा हिशेब ना धड कुणाशी शेअर करता येतो, की बोलता येतो. एक अस्पष्ट घुसळण आतल्या आत कोंडत जाते. जिल्ह्यातून वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा या कोंडीत भर टाकते. कुठून कुठे माणसे आली, असा थेट संबंध नसतानाही बोलण्यातून हिशेब घातला होता. याच विषयातून सुरू झालेला दिवस त्या आकडेमोडीत पुन्हा संपतो. थांबता येत नाही; पण घुसमट वाढतेच आहे. मन मोकळे होतच नाही, कारण नित्य व्यवहारात आपण गुंतून पडलो नाही. त्यामुळे मळभ कणभर अधिकच दाटते आहे. त्यातून बाहेर पडण्याची वाट दिसत नाही.
दुसरीकडे, जग थांबलेले नाही. तुम्हीसुद्धा थांबू नका. तुमचे मन अधिक सुदृढ होण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या विषयात झोकून द्या. तुमचा हातातील मोबाईल त्यासाठी उत्तम माध्यम ठरू शकते. सध्या ऑनलाईन अनेक परिसंवाद सुरू आहेत, ते म्हणजे ‘वेबिनार’. या पंधरा ते वीस दिवसांत अशा परिसंवादांची संख्या वाढताना दिसत आहे. एखादा तज्ज्ञ येऊन त्यात तासभर संवाद साधतो. तुमचा आवडीचा विषय शोधला तर तुम्हाला कनेक्ट होणे अधिक सुलभ जाईल. एका वेबिनारचा विषय असाच होता, ‘तुम्हाला काय हवंय, पिसेस ऑफ माइंड की पीस ऑफ माइंड?’ त्याचं सार इतकंच होतं, की तुम्ही तुमच्या मनाला अधिक दृढ करण्यासाठी तुमच्या आवडत्या विषयात झोकून द्या; मग अनावश्यक विचारांना तुमच्या मनात घुसता येणारच नाही.
बघा, खेळाडू आता ऑनलाईन सराव करताहेत. स्वतःला फिट ठेवण्यासाठी घरात वैविध्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. शूटिंगची अशी ऑनलाईन स्पर्धाही झाली. अलीकडे मुंबईतून संगीताचा असा ऑनलाईन प्रयोग झाला. चर्चेतील गायक-गायिकांनी त्यात सहभाग घेऊन ही तासभराची मैफल एका उंचीवर नेऊन ठेवली. असा प्रयोग आणखी वाढवत नेण्याची या साऱ्यांची इच्छा आहे. त्याला मूर्त स्वरूप मिळेलच. निमित्त आणि माध्यम कुठलेही असेना, मनाची कोंडी फोडण्यासाठी ते जवळ करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.