'30 वर्षे कुस्‍त्‍या केल्‍या, पण आईनं पाजलेल्‍या दुधावरच'

Maharashtra Kesari
Maharashtra Kesariesakal
Updated on
Summary

साताऱ्यात महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेला सुरुवात झाली आहे.

सातारा : कुठंबी महाराष्‍ट्र केसरी (Maharashtra Kesari) असू दे, जातोच. मीदेखील ३० वर्षे पैलवानकी केली, कुस्‍त्‍या केल्‍या; पण त्‍या आईनं पाजलेल्‍या दुधावरच... माळशिरसचे शिवाजी वाघमोडे (Shivaji Waghmode) हे ६५ वर्षीय कुस्तीगीर बोलत होते. साताऱ्यात महाराष्‍ट्र केसरीच्‍या स्‍पर्धेला (Maharashtra Kesari Wrestling Competition) सुरुवात झाली असून त्‍यात सहभागी होण्‍यासाठी तसेच येथील मैदानात होणाऱ्या कुस्‍त्‍या पाहण्‍यासाठी राज्‍यभरातील कुस्‍तीशौकिन दाखल होत आहेत. अशाच दाखल झालेल्‍यांत शिवाजी वाघमोडे यांचा समावेश आहे.

तीन बटनी शर्ट, लेंगा, डोक्‍यावर पैलवानी बाजाची पांढरी शुभ्र टोपी, कानाच्‍या पाळ्या फुगलेल्‍या अशी त्‍यांची शरीरयष्‍टी. शरीरयष्‍टीला साजेशी भाषा आणि आब. कुस्‍तीबाबत बोलते केल्‍यावर पैलवान शिवाजी वाघमोडे म्‍हणाले, ‘‘गाव माळशिरस. घरी शेती. शिक्षणाचा पत्ता नाही. लहानपणीच पंढरपूर गाठले. एका महाराजांच्‍या संगतीत पाच वर्षे काढली. एकाच ठिकाणी राहून कंटाळा आल्‍याने रेल्‍वेने मिरज गाठले. मिरजेत आठ, दहा दिवस मिळेल ती कामे व तिथून सांगली गाठत सरकारी तालमीत जाऊन धडकलो. त्‍यावेळचे वय माहीत नाही; पण त्‍या पोराएवढा असेन. (मैदानात आलेल्‍या सुमारे १० ते १२ वर्षे वयाच्‍या मुलाकडे बोट दाखवत). जोर काढता येत नव्‍हता, मेहनत लय लांब. हळूहळू सरावलो. जोर काढाय, मेहनत करायला लागलो. घराकडून काही येण्‍यासारखे नसल्‍याने इतरांच्‍या खुराकावरच गुजराण सुरू होती. त्‍या तालमीत सांगलीतील नामांकित पैलवान संभाजीराव पवारदेखील यायचे. असाच आखाडा एकदा सांगलीच्‍या राजवाड्यात भरला होता. तालमीतील मोठ्यांनी माझी अळबळं कुस्‍ती लावली. १९ नंबरची माझी जोडी. ती कुस्‍ती मारली आणि मला कुस्‍तीचा नाद लागला.’’

Maharashtra Kesari
साताऱ्यातील सभेत पवारसाहेब भिजले, पण शेतकरी विरघळला : राजू शेट्टी

त्‍यावेळी मेहनती लय आणि खुराक कमी असायचा. तालमीतील एक-एक पैलवान पाच-पाच हजार जोर आणि तीन-तीन हजार बैठका मारायचे. त्‍यावेळचे वस्‍ताद ताकदीचे. जोर, बैठका काढताना थांबला की पायावर काठीचा दणका द्यायचे. पोरं घामाघूम व्‍हायची. पण, थांबायची नाहीत. मी त्‍यांच्‍यात नंतर गेलो. एकमेकांच्‍या नादाने मी पण तीन हजार जोर-बैठका मारायचो. याच काळात संभाजी पवारांच्‍या संगतीत आलो व त्‍यांच्‍याच खोलीवर गेलो. मला २२ वर्षे सांभाळलं त्‍यांनी. त्‍यांच्‍या तीन हजारांच्‍या आसपास कुस्‍त्‍या मी बघितल्‍यात. ताकदीचा गडी, असे सांगत वाघमोडे जुन्‍या काळात रमले. मी कुस्‍त्‍या करायचो. पण, त्‍या मर्यादित. ५ रुपयांच्‍या बक्षिसापासून सुरू झालेली माझी कुस्‍ती तीनशे रुपयांच्‍या लढतीवर येऊन ठेपली. गावाकडच्‍या भागात एकदा निकाली कुस्‍ती हरलो आणि मैदानाला रामराम केल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले. कुस्‍ती कधी सुरू केली आणि कधी थांबवली, हे नीट सांगता येत नसले तरी वाघमोडेंना राज्‍यासह परराज्‍यातील त्या काळातील नामवंत मल्‍लांच्‍या जोड्या आणि त्‍यांच्‍या कुस्‍त्‍या कुठे निकाली झाल्‍या, त्‍याचे इनाम किती होते, याची इत्थंभूत माहिती तोंडपाठ आहे.

Maharashtra Kesari
'महाराष्ट्र केसरी'चं दिमाखात उद्घाटन; साताऱ्यात कुस्तीची 'दंगल'

लाल मातीने अनेकांना लय दिलं!

त्‍याकाळी सर्वांचेच उत्‍पन्न कमी. खायची आबाळ; पण सगळीच पोरं अंगापिंडानं मजबूत. अशीच पोरं तालमीचा रस्‍ता पकडायची. ह्याच्‍या त्‍याच्‍या मदतीने तालमीत मेहनत करायची आणि लाल मातीत रमायची. याच लाल मातीने अनेकांना नाव मिळवून दिले. ज्‍याला खायला मिळत नव्‍हतं, त्‍याला भरपूर खुराक दिला. ज्‍याची ऐपत नव्‍हती, त्‍याच्‍या दहा-दहा मजली इमारती झाल्‍या, अनेकांची गाड्या-घोडी झाली, असे सांगत वाघमोडेंनी नव्‍याने कुस्‍तीक्षेत्रात येणाऱ्या पिढीला लाल मातीशी इमान राखण्‍याचा सल्‍ला दिला.

Maharashtra Kesari
पंजाब जिंकणाऱ्या 'आप'ला मोठा धक्का; 150 नेत्यांनी केला भाजपात प्रवेश

अंदाजे ३० वर्षे तालमीत होतो. पण, तालमीच्‍या नावाला बट्टा लागू दिला नाही. नाव कमवायला तालमीत पिढ्यान्‌ पिढ्या खपतात, आपल्‍या एका चुकीमुळे त्‍याला बट्टा नको म्‍हणून लय काळजीनं वागलो.

- शिवाजी वाघमोडे, कुस्तीगीर, माळशिरस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()