वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. शेतकरी हा कारखानदार व्हायला हवा, असे त्यांना प्रकर्षाने वाटत असे. त्यांनी शेतीला उद्योगधंद्याची जोड दिली. शेती फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी शेतीसाठी अनेक योजना आखल्या आणि कार्यान्वीत केल्या. शेती आणि शेतकरी हा त्यांचा अत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय होता. वसंतराव नाईक यांचा राजकीय प्रवास हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरपरिषद अध्यक्षपदापासून सुरू होतो. वसंतराव नाईक बंजारा समाजातून येतात. हा समाज तसा मागासलेलाच पण वसंतराव नाईक यांचे आजोबा फुलसिंग नाईक यांनी समाजाला शेती करण्यासाठी प्रवृत्त केले. वसंतराव याचे व्यक्तीमत्व राजस होते. महाविद्यालयीन जीवनात घाटे घराण्यातील वत्सलाबाई या रुपवान तरुणीशी परिचय झाला. परिचयाचे रुपांतर प्रेमात झाले आणि प्रेमाचे रूपांतर विवाहात झाले. ६ जुलै १९४१ रोजी दोघांचा विवाह संपन्न झाला. या विवाहात वत्सलाबाई या ब्राह्मण उच्चवर्णीय जातीतील तर वसंतराव बंजारा समाजासारख्या भटक्या विमुक्त जमातीतील होते. विवाहाला दोन्ही बाजूंनी विरोध होता. तथापि वसंतरावांच्या समंजस, पुरोगामी उमद्या व्यक्तीमत्वामुळे विरोधाची धार बोथट झाली.
१९४० साली नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून वसंतरावांनी एल.एल.बी ची पदवी परिक्षा उत्तीर्ण केली. प्रख्यात वकील व केंद्रीय कृषीमंत्री बनलेले डाॅ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या समवेत अमरावती येथे व पुढे पुसद येथे त्यांनी वकिलीच्या व्यवसायाचा प्रारंभ केला. ९ आॅगस्ट १९४२ रोजी मुंबईला भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात श्री.मुखरे यांच्या समवेत गेले. त्यांच्याच प्रयत्नाने वसंतरावांचा काँग्रेस पक्षात पर्यायाने राजकारणात प्रवेश झाला. म. गांधींच्या विचारांचा नाईक साहेबांवर मोठा प्रभाव पडला. पुसदला परतल्यानंतर काँग्रेसच्या कार्यात रुची घेवून राजकीय सामाजिक कार्य करू लागले. त्यांच्या कार्यशीलतेमुळे १९४३ साली ते पुसदचे काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनले. सात वर्षे पदावर कार्यरत राहिले. स्थानिक राजकारणात सक्रिय झाल्यानंतर मित्रांच्या साहाय्याने पंचक्रोशीतील जवळजवळ बारा खेड्यांचा त्यांनी विकासकामे करून चेहराच बदलला. त्यामुळेच पुढे १९४६ साली आपल्या सहकारी मित्रांच्या साहाय्याने पुसद नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. नाईक साहेबांच्या कार्याला खऱ्या अर्थाने येथूनच सुरुवात झाली.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून नाईकांना पुसदमधून उमेदवारी प्राप्त झाली. निवडून आल्यानंतर पं. रविशंकर शुक्ल यांच्या मंत्रिमंडळात राजस्व उपमंत्री म्हणून नियुक्ती झाली. उपमंत्री पदाच्या काळात दोनवेळेस दुष्काळ पडला, त्यावेळेस आजारी असतानाही दुष्काळ निवारणासाठी सर्वोतोपरी कार्य केले. पुढे यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सहकारमंत्री म्हणूनही त्यांची निवड झाली. १९५७ मध्ये सार्वत्रिक निवडणूका झाल्या आणि पुसद मतदारसंघातून १८ हजार मताधिक्याने द्विभाषिकांच्या मुंबई विधानसभेत निवडून आले. ११ एप्रिल १९५७ रोजी त्यांचा कृषीमंत्री म्हणून शपथविधी झाला. पुढे ३० एप्रिल १९६० पर्यंत ते कृषीमंत्री होते. स्वभावधर्माशी अनुरूप असे आवडीचे शेती खाते नाईकसाहेबांना मिळाले.
१९६२ सालच्या भारत-चीन युद्धामध्ये भारताला नामुष्कीचा पराभव पत्करावा लागला. त्यावेळेस कृष्णमेनन संरक्षणमंत्री होते. त्यांच्याविरुद्ध देशभरामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. जनतेच्या रोषामुळे पं. नेहरू यांनी यांना हटवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले. आणि संरक्षणमंत्री पदाची धुरा यशवंतराव चव्हाण यांच्यावर सुपुर्द करण्यात आली. वर्तमानपत्रांनी या घटनेचे मोठे काव्यमय वर्णन केले. 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला' आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी जेष्ठमंत्री दादासाहेब कन्नमवार यांची निवड झाली. २४ नोव्हेंबर १९६३ रोजी कन्नमवार यांचे आकस्मिक निधन झाले. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ म्हणजे ११ वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्री राहिले. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील ही विक्रमी नोंद होती. यशवंतराव चव्हाण यांच्याकडून चालत आलेला वारसा नाईक साहेबांनी समृद्ध केला. आचार्य अत्रे हे गंमतीने म्हणत, "इतर प्रांतांना फक्त भुगोल आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे" नाईकसाहेबांनी हे सर्व. लक्षात घेवून महाराष्ट्राची घडी बसवली. १९७२ चा दुष्काळ, कोयना भुकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत विचलीत न होता. धैर्याने तोच देऊन महाराष्ट्राचा गाडा सुरळीत केला. महाराष्ट्राचे सीमा प्रश्न, कृष्णा-गोदावरी पाणी वाटवापर केंद्राला योग्य ती जाणीव करून दिली. एकाधिकार कापूस खरेदी, रोजगार हमी योजना, ज्वारी-तांदूळ खरेदी इ. अनेक उपक्रम धडाडीने कार्यान्वीत केले. शेतीचे आधुनिकीकरण केले.
केंद्राचा आदेश प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची कटुता न बाळगता विधीमंडळात एक साधे आमदार राहण्यासाठी कधीही कमीपणा मानला नाही. १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे पानीपत झाले. मात्र नव्याने निर्माण झालेल्या 'वाशिम' लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर ही निवडणूक जिंकली. मृत्यूपर्यंत ते याच पदावर राहिले. पुसद ते दिल्ली हा नाईक साहेबांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.