कोलकत्यात उंदरांचा, तर पॅरिसमध्ये ढेकणांचा सुळसुळाट

'द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये पहिल्या पानावर बातमी व फोटो झळकला, तो उंदरांचा व त्यांनी दोन उड्डाण पुलांना पोखरून आपली बिळे बनविल्याचा.
mouse
mousesakal
Updated on

पाच ऑक्टेबर रोजी `द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये पहिल्या पानावर बातमी व फोटो झळकला, तो उंदरांचा व त्यांनी दोन उड्डाण पुलांना पोखरून आपली बिळे बनविल्याचा. एरवी, शहर कोणतेही असो, घराघरातून उंदीर, पाली यांचं दर्शन प्रत्येकाला होत असतं. माशीही पाचवीला पुजलेली. पाश्चात्य देशात हवामान थंड असल्यानं तिथं माशी, अथवा डास दिसत नाही.

पण, पॅरिसवर ढेकणांनी चक्क स्वारी केल्याच्या बातम्या गेले महिनाभर झळकत आहेत, इतके की त्याची दखल अखेर प्रसिद्ध नियतकालिक `इकॉनॅमिस्टला’ घ्यावी लागली. पुढील वर्षी पॅरिसमध्ये ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ढेकणांची बातमी खेळाडूंच्या तोंडचं पाणी पळविणारी आहे.

त्यांनी खेळायचे, देशासाठी पदके मिळवायची, की ढेकूण मारायचे. एक गोष्ट बरी, की कोलकत्यात पुढील वर्षी कोणत्याही जागतिक, विभागीय क्रीडा स्पर्धा नाही. होणार आहेत, त्या फक्त देशव्यापी स्तरावर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका.

अर्थात कोलकत्यात उंदरांचा सुळसुळाट झालाय तो ब्रिटिश कालीन कोलकता महानगर पालिकेची इमारत व एस्प्लनेड येथील विधानसभा भवनानजिकच्या पुलांमध्ये. `स्वच्छ भारत’ अभियान चालू असता, `रस्त्यावर व खुल्या जागी कचरा फेकू नका,’ अशी वारंवार विनंती करून, तंबी देऊनही लोक काही अयकायला तयार नाही. इतक्या महाकाय शहराची स्वच्छता राखायला महानगरपालिका मागे पडत आहे.

`लटकणाऱ्या तारा, अन्य केबल्स यांचे उंदरांनी किती नुकसान केले आहे, याची माहिती अद्याप हाती आलेली ऩाही,’ अशी कबुली कोलकत्याचे खुद्द महापौर व तृणमूल काँग्रेसचे नेते फरीद हाकिम यांनी दिली. `उंदरांची संख्या किती आहे, हे सांगणे कठीण, पण मलमूत्र वाहून नेणारे बोगदे, कचरा व अशुद्ध पाणी वाहून नेणारे बोगदे यांचे व त्यातील वायर्स आदींचे दिवसेंदिवस मोठे नुकसान होत आहे,’ असे ते म्हणाले.

मध्ये कोलकत्यातील पादचारी मार्ग, दक्षिण कोलकत्यातील धाकुरिया व भांबानिपूर येथील झोपडपट्ट्यात भारी नुकसान झाले आहे. पादचारी मार्गावर खाण्याच्या वस्तू विकणारे हातगाडीवाले ओला कचरा तिथंच सोडून जात असल्याने उंदरांचा आयतीच मेजवानी मिळत आहे. उड्डाणपुलांचा पाया व पुलाचे रस्ते यांच्या खाली मोठमोठी भगदाडं पडली असून उंदीर, घुशींचा सुळसुळाट झाला आहे.

त्यांची डागडुजी करण्याचं काम महानगरपालिकेनं हाती घेतलंय, उंदरांना कुरतडता येऊ नये म्हणून डागडुजी करताना काचेच्या तुकड्यांचा वापर केला जात आहे. बॅलिगंज उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर उंदारांनी पोखरलेल्या पुलाच्या सिमेंट, मातीची ढेकळं रोज पडत असल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आता उंदीर उच्चाटनाचे काम युद्ध पातळीवर करावे लागणार असे दिसत आहे. आणखी एक नामी उपाय योजण्यात आलाय. महापालिकेच्या कार्यालयातील संगणक विभागात उंदीर यंत्र बसविण्यात आले आहे. त्यातून येणाऱ्या कर्कश ध्वनिलहरी उंदरांना पळवून लावतात.

मुंबईची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. गेल्या वर्षी मुंबईत तब्बल 2 लाख 81 हजार उंदीर ठार करण्यात आले, यावरून उंदरांनी मुंबईत काय हैदोस माजविला आहे, याची कल्पना यावी.

आता पॅरिसकडे वळू. आयुष्यात एकदा तरी पॅरिसला भेट द्यावी, असे म्हणतात. ही अत्यंत सुंदर अयतिहासिक नगरी, तेथील आयफेल टॉवर, लूव्र संग्रहालय, सीएन नदीचा परिसर, चँप्स एलिसी, ट्रायंफ आर्क, नोट्रे डॅम कॅथेड्रल, लेस इनव्हॅलिडेट्स, माँटेमार्ते आदी तेथील प्रमुख आकर्षणे. तब्बल 44 दशलक्ष पर्यटकांनी 2022 मध्ये पॅरिसला भेट दिली. पर्यटनांच्या संदर्भात जगात पॅरिसचा पहिला क्रमांक लागतो.

हे प्रवासी प्रामुख्याने पॅरिसच्या भुयारी रेल्वे, अथवा शहरातील बस मधून प्रवास करतात. ढेकणांनी आता तिथंच ठिय्या मांडला आहे. त्याची छायाचित्रे सर्वत्र व्हायरल झाली आहेत. त्यामुळे, पर्यटनावर विपरित परिणाम होत असून, पर्यटकांचे प्रमाण कमी होत आहे. त्याचा फटका अर्थातच फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेवर बसायला सुरूवात झालीय.

एकीकडे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी बांधण्यात येणारी संकुले, तरणताल व अऩ्य खेळांसाठी उभारण्यात येण्याऱ्या इमारतींचे बांधकाम जोराने चालू आहे, तर महानगरपालिका व महापौर यांनी ढेकणांविरूद्ध युद्ध पुकारले आहे.

भारताला ढेकूण नवे नाही. घरात ते कुठेही वळचणीला जाऊन बसतात. माणसांचे रक्त पिणारे जे कीटक आहेत, त्यात ढेकूण व डास आघाडीवर आहेत. काही ठिकाणी पिसवाही आहे. जळू असते, पण ती जंगलात. त्यामुळे तिच्याशी संपर्क येत नाही. माझ्या लहानपणी अहमदनगरच्या घरात खूप ढेकूण होते. त्यांना पकडण्यासाठी असंख्य छिद्रे असलेल्या लाकडी फळ्या आम्ही वापरायचो. रात्री झोपण्यापूर्वी त्या फळ्या गादी भोवती लावून ठेवत असू.

रात्री त्यात असंख्य ढेकूण जमत. काही आम्हाला चावून वाव टम्म झालेले असत. सकाळी उठल्यावर त्या फळ्या तापलेल्या उन्हात आम्ही झटकत असू. त्यातून पडणारे ढेकूण पटापटा मरत असत. दुसरीकडे ढेकूण दिसल्यास त्यांना पकडून रॉकेलच्या डब्यात टाकून देत असू. आम्ही राहातो त्या दिल्लीतील मयूर विहार भागात दोन वर्षांपूर्वी ढेकणांचा सुळसुळाट झाला होता. तेव्हा पेस्ट कंट्रोल करण्याशिवाय पर्याय नव्हता.

डासांच्या बाबतीत तसेच झाले. तीस वर्षांपूर्वी आम्ही दिल्लीतील मयूर विहार भागात राहाण्यास आलो, तेव्हा आमची एकच हाऊसिंग सोसायटी होती. जवळूनच नाला व यमुना वाहात असल्याने डासांचा उत्छाद प्रचंड वाढला होता. त्यांना अटक करण्यासाठी केवळ आमची सोसायटी होती. तेव्हा दिवसा वा रात्रीच्या कोणत्याही वेळी ते तुटून पडत, इतके की शेवटी लोक विनोदाने म्हणू लागले, ``आम्हाला जेवण करू द्या, मग (आम्ही तुम्हाला म्हणजे) डासांना सांगू की तुमचे जेवण तयार आहे.’

बातमीनुसार, कोलकत्यातील बॅलिंगज नजिकच्या पुलाला उंदरांनी इतके काही पोखरले आहे, की त्याखालून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर रोज सिमेंट व मातीची ढेकळं पुलातून पडलेली दिसतात. पुलाच्या नजिक राहाणाऱ्या सोनिया मंडल म्हणतात, की पुलाला उंदीर असे काही खात (कुरतडत) आहेत, की तो जणू काही केकच आहे.

महानगरपालिकेच्या कार्यालयातही तीच स्थिती. त्यांना पळवून लावण्यासाठी आता नगरपालिकेने संगणक विभागात `उंदीर यंत्र’ बसविले आहे. त्यातून येणाऱ्या कर्कश लहरींमुळे उंदीर पळून जातात.

`द इकॉनॉमिस्ट’ मधील लेखानुसार, ``ढेकणांना मारण्यासाठी तयार केलेली नाशकेही आता काम करेनाशी झाली आहेत. ढेकूण चावला, की त्या जागी खाज सुटते. पण ते डासांप्रमाणे मलेरिया, डेंग्यू, यलो फीवर पसरवित नाहीत. किंवा माशीप्रमाणे साथ पसरवित नाही. स्वित्झरलँडमधील कीटकनाशक संस्थेनुसार, 2005 व त्यानंतरच्या काही वर्षात झुरिक शहरातून एका वर्षात ढेकणांबाबत 20 तक्रारी आल्या.

दहा वर्षांपूर्वी न्यू यॉर्कमध्ये ढेकणांचा सुळसुळाट झाला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर डीडीटी आदींचा वापर झाल्याने पाश्चात्य देशातून ढेकणांचे जवळजवळ उच्चाटन झाले होते. दुसरे म्हणजे, हैड्रोजन सायनाईड, डीडीटी व सल्फरडाय ऑक्साइड यांचे फवारे माणसाला घातक समजले जातात.

त्यामुळे त्यांचा वापर कमी झाल्याने ढेकणांचे पुनरागनमन झाले आहे. त्यांचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी लागणाऱ्या प्रभावी विनाशकाचा शोध लागत नाही, तोवर त्यांचा हल्ला माणसांना सोसावा लागणार, असेच दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.