गेले सहा दिवस दिल्लीत सूर्याचं दर्शन झालं नाही. आज काही तासासाठी ऊन पडलं. हिवाळ्यात दिवस छोटा होतो. सायंकाळी पाच वाजता अंधार पडायला सुरुवात होते. पण, दिवसाही दिल्लीच्या डोक्यावर धुकं, धूर व प्रदूषित धुलिकणांचं आच्छादन पसरलेलं असतं. हवेचा गुणवत्ता निर्देशांक पाचशेच्या आसपास आहे. त्याचा अर्थ श्वसनास अतिशय धोकादायक. म्हणून, `अधिकाधिक घरात रहा, बाहेर पडू नका.
विशेषतः वयस्कर लोकांनी खास काळजी घ्यावी,’ अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. दिल्ली सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजना केव्हाच कोलमडून पडल्यात. दिड ते दोन कोटी लोकसंख्येची राजधानीव तिचा परिसर (नॅशनल कॅपिटल रीजन) घरात बसणार कसा? प्रत्येकाला काम आहे. त्यासाठी बाहेर पडावे लागतेच.
याला अपवाद होता तो केवळ कोविड- 19 चा. त्या दोन वर्षात साक्षात मृत्यूच दाराबाहेर उभा असल्यानं बाहेर पडण्याची कुणाची हिम्मत होत नव्हती. पण हिवाळ्यातील हे प्रदूषण गेल्या दहा वर्षात दिल्लीचे ``वार्षिक रडगाणे’’ झाले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, जगातील साऱ्या विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रदूषणावर चकार शब्दही बोलत नाहीत.
भारतीय जनता पक्ष दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार असल्याने त्याला सातत्याने दोष देते. परिस्थिती अशी आहे, की केंद्रात व दिल्लीत भाजपचे सरकार व डबल इंजिन असते, तरीही फरक पडला नसता. हरियाना, पंजाब व उत्तर प्रदेशातील शेतकरी शेतातील हिवाळा आला की तृण जाळणायला सुरूवात करतात व त्याचा धूर व धुलिकण दिल्लीवर तरंगायला सुरूवात होते. इकडे तर दोन्ही इंजिनाची तोंडे परस्पर विरोधी दिशेला.
म्हणजे, जनतेला अनुभव येतो, तो केवळ आरोप-प्रत्यारोपांचा. प्रत्यक्षात हवामानाची ही आणीबाणी असूनही त्याकडे केंद्राचे लक्ष नाही. पंतप्रधानांना त्याचा त्रास होत नाही. कारण ते बव्हंशी दिल्ली बाहेर देशात वा परदेशात दौऱ्यावर असतात.
उपाय योजना म्हणून दिल्ली सरकराने येत्या दहा नोव्हेंबर पर्यंत प्राथमिक शाळा बंद केल्या. दिवाळीनंतर लगेच वाहतुक व्यवस्थेत `ऑड अँड इव्हन’ प्रणाली सुरू करण्यात येईल. दिल्लीत बांधकामावर बंदी घालण्यात आली असून, डिझेलच्या ट्रक्सना दिल्लीतून येण्याजाण्यास तात्पुरती मनाई करण्यात आली आहे. पण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जोवर वरील ती राज्यातील तृण ज्वलनाचा प्रश्न सुटत नाही, अथवा ते बंद होत नाही, तोवर प्रदूषणाची समस्या सुटणे शक्य नाही.
दिल्लीच्या प्रमुख उपनगरातील हवामान निर्देशांक आर.के. पुरम येथे 466, आयटीओ येथे 402, पटपडगंज येथे 471 व न्यू मोती बाग येथे 488 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. तो दिल्ली व आसपासच्या शहरात 500 च्या आसापास आहे.
याचा अर्थ या वातावरणात श्वास घेणाऱ्यास दिवसाकाठी 25 ते 30 सिगरेट्स ओढल्यागत आहे. त्यामुळे रूग्णालायातून श्वसनाचे आजार असलेले रूग्ण वाढलेत. प्रदूषणामुळे अधुंक दिसणे, कमी अयकू येणे, डोके दुखणे, चक्कर येणे, छातीत दुखणे, खोकला येणे, अस्थमा, ब्राँकायटीस आदी व्याधी होतात.
विशेषतः लहन मुलांच्या आरोग्यावर धोकादायक परिणाम होत आहेत. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये सौदी अरेबियातील दम्मम, भारतातील दिल्ली, कानपूर, फऱीदाबाद, गया, यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त मुंबई, कोलकता या शहरांचा यंदा समावेश झाला. याचा अर्थ, विकासाची घोडदौड चालू असताना राष्ट्रीय आरोग्य मात्र रसातळाला जात आहे.
`प्रदूषणाने माणसाचे आयुष्य किमान तीन ते चार वर्षांनी कमी होते,’ असे अंदाज वारंवार प्रसिद्ध केले जातात. पंजाबमध्ये आप पक्षाचे सरकार असल्याने भाजप त्यावर खापर फोडते. पण, हरियाना व उत्तर प्रदेशात भाजपची सरकारे आहेत त्यांना दोष का दिला जात नाही? प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, `दिल्लीतील हवामान जागतिक आरोग्य संघटनेच्या सीमारेषेपेक्षा 20 पटीने अधिक आहे.’
प्रदूषणावर उपाय म्हणून हवा शुद्ध करणारी यंत्रे दिल्लीत काही ठिकाणी बसविण्यात आली. परंतु, गेल्या वर्षी आनंद विहार उपनगरात प्रदूषणाने तब्बल 1000 निर्देशांक गाठल्याने तेथील यंत्र नादुरूस्त झाले. प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, `पंजाबमध्ये गेल्या रविवारी तृण जाळण्याचे तब्बल 3230 प्रकार झाले. या हिवाळ्यात तृण जाळण्याचे पंजाबमध्ये आजवर एकूण 17403 प्रकार झाले.’
पंधरा ते वीस वर्षांपूर्वी दिल्लीतील हिवाळा म्हणजे पर्यटनाला सर्वोत्तम समजला जात असे. उन्हाळ्यातील तापमान दिल्लीबाहेरच्या पर्यटकांना सहन होत ऩसे. म्हणून, पर्यटकांचा ओढा हिवाळ्यात दिल्लीकडे असे. परंतु, गेल्या दशकापासून देशी व परदेशी पर्यटकांचे प्रमाण वेगाने घसरत आहे.
`दिल्लीत स्वागत करण्याजोगा व आल्हाददायक सीझन कोणचा?’ असा प्रश्न विचारला, तर फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांचा उल्लेख करावा लागेल. कारण त्या दिवसात वसंत ऋतूचा बहर सर्वत्र दिसतो. या व्यतिरिक्त मे व जून सोडल्यास जुलै, ऑगस्ट मधील पावसाळा व नंतरचे सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर हे महिने बरे असतात.
येथील प्रमुख इंग्रजी व हिंदी दैनिकात प्रदूषणाच्या आक्रोशाबाबतच्या बातम्या पहिल्या पानावर रोज ठळकपणे छापल्या जात आहेत. पंतप्रधानांनी नव्याने बांधलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील राजपथावर (कर्तव्य पथ) दिवसाढवळ्या अंधार पडला होता. धुक्याचं सावट इतकं होतं की दिव्यांशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं.
राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, जुनं व नवं संसद भवन, साउथ ब्लॉक व नॉर्थ ब्लॉक सारं झाकोळून गेलं होतं. त्या दिवशी (4 नोव्हेंबर) येथील `हिंदुस्तान टाइम्स’चा पहिल्या पानावरील मथळा होता, `कॅपिटल कॅटॅस्ट्रोफ.’ तर आज प्रसिद्ध झालेल्या `द इंडियन एक्सप्रेस’ च्या पहिल्या पानावर `डेथ बाय ब्रीद,’ असा मथळा आहे. येथील `चेम्बर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीज’ ने दिल्ली, हरियाना, पंजाब व उत्तर प्रदेश सरकारची संयुक्त बैठक बोलवा, अशी विनंती पंतप्रधान मोदी यांना केली आहे.
दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. दिल्लीत फटाक्यांवर बंदी आहे. परंतु, कोणत्याही प्रकारचे जाचक नियम, अथवा दंड यांची अमलबजावणी होत नाही. त्यामुळे, बंदीचे उल्लंघन होण्याची शक्यताच अधिक.
भारताप्रमाणेच, उत्तर चीनला प्रदूषणाने ग्रासल्याच्या बातम्या येत आहेत. चीनची राजधानी बीजिंग भोवतालचा तियांजिन - हेबेई प्रांत प्रदूषणाच्या टप्प्यात आला आहे. या परिसरात 100 दशलक्ष लोक राहातात.
चीनने बीजिंगमधील प्रदूषण कमी करण्यात काही वर्षापूर्वी यश मिळविले होते. परंतु, तेथेही औद्योगिकरण, औद्योगिक वाहनांची वाहतुक, शेतातील तृण जाळण्याचे प्रकार आदींमुळे प्रदूषणाने उचल घेतली आहे.
भारत व चीन या दोन देशात एकूण अडीच अब्ज लोक राहात आहेत. यावरून दोन्ही देशातील सरकारपुढे प्रदूषणाचे किती मोठे आव्हान आहे, हे ध्यानात यावे. दिल्लीत येत्या जानेवारी अखेर प्रदूषण कमी होण्याची शक्यता दिसत नाही. विषारी वायूचे श्वसन करीत जगण्याची वेळ नागरिकांवर आली आहे व त्याला `एकमेकाला दोष देणारे’ राज्यकर्ते किती बेजबाबदारपणे वागत आहेत, याची कल्पना येते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.