Blog: नरेंद्र दाभोलकर यांचे तालिबानीच्या 'त्या' पत्राला प्रत्युत्तर

Narendra Dabholkar
Narendra Dabholkar
Updated on

(काल एका तालिबानीने डॉ. नरेंद्र दाभोलकरांना पत्र लिहलं होतं. त्या पत्राचं उत्तर आज दाभोलकरांनी दिलंय. कालचं तालिबानीचं पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा...)

तुझं पत्र मिळालं. सर्वप्रथम बंदूक सोडून तू हातात लेखणी घेतलीस, याबद्दलच तुझं कौतुक आणि अभिनंदन! अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याचा आनंद मला कळवण्यासाठी तू पत्र लिहलस. त्यानिमित्ताने का होईना, पण बंदुकीच्या ऐवजी लेखणीने माझ्याशी संवाद करावासा वाटला, हे काही कमी नाही. संवादानेच मानवी आयुष्य अधिक चांगलं होण्याच्या दिशेने पुढे सरकू शकतं, हेही यानिमित्ताने अधोरेखित झाले, हेही नसे थोडके!

Narendra Dabholkar
Blog: एका तालिबानीचं नरेंद्र दाभोलकरांना पत्र...

परिवर्तन करताना क्रोधापेक्षा करुणा आणि उपहासापेक्षा आपुलकी गरजेची असते, असं मी नेहमी सांगतो. तालिबानने सत्तेत येण्यासाठी लोकांची मने जिंकली असती, तर आज उडत्या विमानाला लटकून देशाबाहेर पलायन करण्याचं अपरिमीत भीतीतून साकारलेलं अफगाणी लोकांचं हे विस्मयकरी धाडस दिसलंच नसतं. तुमचा विजयोत्सव साजरा करताना इस्लाम धर्मीय अफगाणी लोकांना खरंच तुम्ही हवे आहात का? याचाही शांतपणे विचार करशील, अशी आशा ठेवतो.

मुला, लोकांनी धर्म स्वीकारण्याऐवजी जर बंदुकीच्या टोकावर तो त्यांच्यावर लादला जात असेल, तर त्यातून शांतता येऊ शकेलही, पण ही शांतता भीतीच्या सावटाखाली मुकेपणातून आलेली शांतता असेल आणि अशा शांततेतून सौहार्द येईल का? धर्म आणि राजकारण यांच्या एकत्र करण्याच्या घातक कृतीला हिंसेची जोड देण्याचा प्रयत्न झाला, तर लोकशाही संपुष्टात येतेच, शिवाय मनावताही संपून जाते आणि उरतं ते फक्त पशुत्व, जे आज अफगाणिस्तानमध्ये दिसतंय.

हे खरंय की, पशुत्व ही माणसाची प्राथमिक भावना आहे. अविवेकी वागणं हेच मुळात माणसाचं उपजत वागणं आहे. पण, विवेकी वागणूक ही त्याने स्वतःच्या पशुत्वावर मात करून माणूसपणाकडे केलेली वाटचाल आहे. याच वाटेवरून उलट्या दिशेला निघालेल्या कळपाचा तू एक भाग बनू इच्छितोस की मानवी जगाचं रहाटगाडं अधिक 'विवेकी' जगण्याकडे नेण्याची वाट तू चालू इच्छितोस, यावरही विचार कर.

तुझ्या पत्रात माझ्या हत्येचा उल्लेख बरेचदा तुझ्याकडून झाला आणि त्याचं समर्थनही तू केलंस. पण मुला, सत्यासाठी प्राण देणारा मी काही एकटा नव्हे. 'पृथ्वी सपाट नसून गोलाकार आहे' असं म्हटल्यामुळे भरचौकात जिवंत जाळलेल्या ब्रूनोपासून ते पृथ्वीमध्य सिद्धांत नाकारणाऱ्या गॅलिलिओ पर्यंत अनेकांनी असं शहादत्व पत्करालंय. मी तर फक्त एक त्यातला एक भाग आहे. मात्र, आपलं म्हणणं 'खरं' ठरवण्यासाठी समोरच्याला मारावं वाटणं, आणि त्याला धर्मविजयाची जोड देणं, यातच एकप्रकारे झालेली हार अंतर्भूत असलेली दिसून येते. विशेष म्हणजे, एकीकडे धर्माला श्रेष्ठत्व आणि विज्ञानाला दुयमत्व देत असताना दुसरीकडे विज्ञानाने निर्माण केलेल्या बंदुकीच्या जोरावरच ही फुशारकी तू मारू शकतो आहेस. मुला, तुझी ताकद आणि सत्व तुझ्यात नसून तुझ्या बंदुकीत आहे. बंदूकीच्या मागचा तू, बंदुकीशिवाय शून्य होतोस, हे कसं बरं तुला कळत नाही?

मुला, आपण कशाचे साक्षीदार बनतोय, याची कदाचित तुला आणि आताच्या जगाला कल्पनाही नसेल, पण जे आहे ते भयावह आहे आणि तो उर्वरित जगासाठी एक धडा सुद्धा आहे. तुमचा हा सगळा तालिबानी नंगानाच सध्या दिसतोय, तो काही असा एका रात्रीत उगवलेला नाहीये. तुझ्या आधीच्या गेल्या काही पिढ्यांच्या मुर्खपणाचाही हा परिपाक आहे. सुरवातीला त्यांनाही समजलं नसेल पण तुम्ही लोकांनी धर्माला दिलेलं नको तितकं स्थान आज तुमच्याच धर्मातील लोकांच्या जीवावर उठलंय. आम्हाला नकोय 'शरिया कायदा' असं आता आतून ओरडून सांगावंसं जरी वाटत असेल तिथल्या सामान्य अफगाणी लोकांना, तरी ते शक्य होत नाहीये. धर्म विळख्यात घेतो तो असा! तुमच्या अडाणीपणाचा फायदा घेत अमेरिकेसारख्या देशांनी आपल्या राजकारणासाठी अक्षरशः वापरून फेकून दिलंय. पण पहिला दोष त्याच अफगाणी नागरिकांचा आहे, ज्यांनी कधीही धर्माची चिकित्सा सोडा, त्याच्या दहशतीविरुद्ध ब्र काढला नाही.

आणि म्हणूनच वेळोवेळी धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा आवश्यक आहे. मी धर्माच्या कधीच विरोधात नव्हतो. मात्र, धर्माच्या नावावरील काळाबाजार आणि अनिती याला माझा ठाम विरोध होता आणि नीतीसाठी धर्माची गरज नाही, यावर मी आजही ठाम आहे. याचं कारण असं की, ईश्वरी अधिष्ठान असुनसुद्धा धर्म या व्यवस्थेला गेल्या काही हजारो वर्षात नीती प्रस्तापित करता आलेली नाहीय. प्रेम, दया, करुणा या मूल्यांची शिकवण देणारा 'धर्म' अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होऊन त्याच प्रेम, दया, शांतीच्या शिकवणुकीला पायदळी तूडवून आपल्याच धर्माच्या लोकांवर गोळ्या झाडायला कसा बरे उद्युक्त करतो? याला तुझ्या अल्लाहाची परवानगी असू शकते का, याचाही विचार तू करावास!

Narendra Dabholkar
Blog: एका तालिबानीचं नरेंद्र दाभोलकरांना पत्र...

मुला, विज्ञान कधीच अंतिम सत्याचा दावा करत नाही. ते सत्याच्या सातत्यावर उभं असतं. धर्म नेहमीच अंतिम सत्य सापडल्याचा दावा करतो. विज्ञान जेवढा पुरावा तेवढा विश्वास या सूत्रावर काम करतं. धर्माला पुराव्याची गरजच लागत नाही. 'तर्क' हे विज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण आहे तर 'श्रद्धा' हे धर्माचे! कुठलीच श्रद्धा ही तर्काधिष्टित नसते म्हणून श्रद्धेच्या पराभवातूनच नवे विचार जन्मास येतात. 'प्रश्न विचारणे' हे विज्ञानाचं काम आहे. धर्म मुळातच सर्वज्ञातपणाचा दावा करतो. पण धर्माधिष्ठित उत्तरावर शंका घेणे धर्माला आवडत नाही. विज्ञान नम्र आहे. ते काळाच्या ओघात चुकीचे ठरलेले सिद्धांत मागे घेतं किंवा दुरुस्त करतं. धर्म उद्धट आणि कमालीचा स्थितिशील आहे. तो आपले सिद्धांत मागे घेत नाही, तर प्रसंगी त्यासाठी हिंसेस तयार होतो. आणि म्हणूनच, धर्माशिवाय माणसाच्या विचारातून, मानवी विवेकातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून नीती निर्माण होऊ शकते. फक्त विज्ञानाची करणी घेतलेल्या मानवाने विज्ञानाची विचारसरणी घेणे आवश्यक आहे, असं मला वाटतं.

बाई 'गायला' लागली की धर्मसंस्कृतीचे सूर पटकन ढासळतील, ही भीती सतत वाटते, हे तू स्वतःचं मान्य केलंस याबद्दल तुझं कौतुक! सध्या विमानतळावरून विमानामागे पळणाऱ्या अफगाण्यांमध्ये एकही बाई दिसू नये, यातच सगळं आलंय. बाईला पळून जायची देखील मुभा तुमच्या धर्मसंसंस्कृतीने जिवंत ठेवली नाहीय, हे दिसून येतंय. मात्र, गोळीबारांच्या आवाजात बाईच्या गळ्यातले सनातन सूर फार काळ दडपता येणार नाहीत, या वास्तवापासून तुम्हाला फार काळ पळ काढता येणारही नाही, हेही लक्षात असुदे.

आता धर्माचा विजय झालाय, या अविर्भावात तू मला पत्र लिहलेस. पण भेदरलेल्या चेहऱ्याची जनता घरात स्वतःलाच भीतीने बंद केलेली असताना धर्म विजयी होऊ शकतो का? याप्रकारे मानवतेच्या मुळावर उठणारा विजय असू शकतो का? असा प्रश्न तुझ्या हातात बंदूक दिलेल्यांना तू एकदा जरूर विचारावा!

राहता राहिला प्रश्न माझ्या मारेकऱ्यांचा! मुक्त विचारांचा पुरस्कार करणारे माझ्यासारखे सगळेच तुमचे शत्रू ठरतात, यात काही नवं नाही. मात्र, हा लढा या धर्मातील कट्टर विरुद्ध त्या धर्मातील कट्टर असा नसून सर्व धर्मातील कट्टर विरुद्ध सर्वसामान्य शांतताप्रिय धार्मिक लोक असा आहे, असं मला वाटतं. अफगाणिस्तानची आजची अवस्था पाहून यातून योग्य तो धडा घेण्याचाच सल्ला मी माझ्या मारेकऱ्यांना देईन. एका धर्माची राजवट असूनही तुमचा देश अनागोंदीत आहे. त्यामुळे धर्माधिष्ठित राष्ट्राच्या उठाठेवीतून प्रगती साधते की अधोगती याचं जिवंत उदाहरण तुमच्या अफगाणिस्तानच्या निमित्ताने पहायला मिळतंय.

मला पत्र लिहल्यानंतर तू गांधी आणि बुद्धालाही पत्र लिहायला घेतोयस, हे बरं केलंस. बामियानमधील बुद्ध मुर्ती उद्ध्वस्त केल्याबद्दल बुद्ध तुम्हाला जरुर माफ करेल, हे काही वेगळं सांगायला नको. उद्ध्वस्त करणं फारच सोपं आहे मित्रा, कस लागतो तो नवनिर्मितीसाठी! चरख्याच्या सूतकताईसारखी क्षुल्लक कृती ते देश विणण्याच्या नवनिर्मितीची गोष्ट तुला गांधी जरुर सांगतील. आता अफगाणिस्तान ताब्यात घेतलाच आहे, तर आता तो उभा करण्याचा धडा त्यांच्याकडे जरुर मिळेल. जाता जाता मी 'हमीद'ची आठवण तुला जरूर करून देईन. इस्लामच्या चिकित्सेची वाट चोखाळणारा 'हमीद दलवाई' तुला जरूर भेटो, या सदिच्छेसह... तुझ्या लेखणीवरचा तुझा हात कधी न सुटो....

- विनायक होगाडे | vinayakshogade@gmail.com

(काल तालिबानीने लिहलेलं पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा. ब्लॉगमधील मते ही लेखकाची स्वतःची आहेत. 'सकाळ माध्यम समूह' त्याच्याशी सहमत असेलच असे नाही...)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()