Blog : सावरकरांची माफी आणि हिंदुत्ववाद्यांची गोची

Blog : सावरकरांची माफी आणि हिंदुत्ववाद्यांची गोची
Updated on

विनायक दामोदर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्यामधलं द्वंद्व हे चिरंतन आहे. दोन विचारसरणीची ही दोन टोकं! मात्र, सातत्याने थोड्या-थोड्या कालावधीनंतर चर्चेत येतातच! हिंदुत्वाची मांडणी करणारे विनायक दामोदर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्याच सूचनेवरून अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलंय. सर्वप्रथम राजनाथ सिंह यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांनी आजवरच्या एका मोठ्या चर्चेला पूर्णविराम दिलाय. आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदूत्ववादी विचारांची मंडळी सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून सुटका करवून घेतलीय, हेच मान्य करायला तयार नव्हते. अथवा जे मान्य करायचे तेही खासगीत! आता राजनाथ सिंह यांनी इतक्या उघड उघड ही ऐतिहासिक बाब मान्य केलीय, तर त्यांचं अभिनंदन करणं क्रमप्राप्त आहे. मात्र, राजनाथ सिंह पुढे जी मल्लिनाथी केलीय ती मात्र, हास्यास्पद आहे. महात्मा गांधींच्या सांगण्यावरुन; सावरकरांनी माफीनामे दिल्याचा जावाईशोध राजनाथ सिंहांनी लावला आहे. म्हणजे इथेदेखील संघ विचारसरणीच्या लोकांना गांधींच लागतो, हे पाहून हसू येतंय.

महात्मा गांधींचा खून नथुराम गोडसे या सावरकर शिष्याने करावा आणि त्यामधील आरोपी म्हणून सावरकरांचं नाव यावं, यामुळे या दोघांमधलं द्वंद्व हे कायमस्वरुपी चिरंतन झालं आहे. मात्र, आज राजनाथ सिहांनी केलेलं हे वक्तव्य पाहून सावरकर नक्कीच खजील झाले असतील. आपल्या माफीनाम्यामागे सुद्धा महात्मा गांधींच उभे केले जाताहेत, हे पाहून त्यांचं त्यांना वाईट वाटलं असेल. बरं हे विधान करताना तिथे सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित होते. त्यांनी देखील यावर हरकत घेतलेली दिसून आली नाही. असो! त्यांचं हे विधान कसं अंतर्विरोधी आहे, हे स्पष्ट करायला हवं.

Blog : सावरकरांची माफी आणि हिंदुत्ववाद्यांची गोची
सावरकरांच्या दया याचिका महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच : राजनाथ सिंह

सावरकरांचे माफीनामे

१. ४ जुलै १९११ रोजी तात्याराव सावरकरांना पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये डांबण्यात आलं. सहा महिन्यात त्यांनी माफीनामा लिहून दिला.

२. दुसरं माफीचं पत्र सावरकरांनी १४ नोव्हेंबर १९१३ रोजी लिहीलं. त्यात त्यांनी म्हटलं आहे... "I am ready to serve the Government in any capacity they like... .

३. मार्च २२, १९२० रोजी सावरकरांच्या समर्थकांनी कायदेमंडळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सरकारतर्फे अशी माहिती देण्यात आली की सावरकरांकडून दोन माफीनामे सरकारला प्राप्त झाले आहेत. १९१४ आणि १९१७ साली. त्याचा तपशीलही पटलावर ठेवण्यात आला.

४. १९३० साली लिहीलेत्या माफीनाम्यात सावरकर म्हणतात--- "I and my brother are perfectly willing to give a pledge of not participating in politics for a definite and reasonable period that the Government would indicate...

५. गांधी हत्या प्रकरणी अटक झाल्यावर सावरकरांनी फेब्रुवारी २२, १९४८ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांना माफीनामा लिहून दिला. त्यात ते म्हणतात-- "I shall refrain from taking part in any communal or political public activity for any period the Government may require."

६. १३ जुलै १९५० रोजी, मुंबई हायकोर्टाला दिलेल्या पत्रात सावरकर लिहीतात-- "... would not take any part whatever in political activity and would remain in my house in Bombay" for a year. हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा त्यांनी दिला.

सावरकरांनी पहिला माफीनामा लिहलाय तो २९ ऑगस्ट १९११ रोजी... मोहनदास करमचंद गांधी हा माणूस दक्षिण अफ्रिकेतील आपला लढा संपवून भारतात कायमस्वरुपी परतला तो १९१५ साली! यावेळी गांधी हे फक्त 'मोहनदास' होते आणि ते अजून 'महात्मा गांधी' व्हायचे होते. त्यामुळे १९११ साली गांधींनी त्यांना तुम्ही माफीनामे लिहून स्वत:ची सुटका करवून घ्या असं म्हणणं संभवत नाही. त्यामुळे राजनाथ सिंहाचा दावा किती पोकळ आहे, हे सहजपणे लक्षात यावं.

गांधी-सावरकर चिंरतन द्वंद्व

मात्र, गांधी आणि सावरकर यांची भेट यापूर्वी देखील झाली होती. गांधी आणि सावरकर यांची पहिली जाहीर आमनासामनी झाली होती १९०९ साली लंडनमधल्या इंडिया हाऊसमध्ये. गांधी दक्षिण अफ्रिकेतल्या लढ्यासंदर्भात लंडनला होते. विजयादशमीच्या दिवशीच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी होते. त्यावेळी सावरकर आणि गांधी दोघांनीही भाषण केलं. सावरकरांनी रामाच्या ‘आक्रमक’ असण्याचा मुद्दा अधोरेखित केला तर अध्यक्षीय भाषणात गांधीनी ‘प्रजाहितदक्ष’ रामाची मांडणी केली.

तेंव्हाच या दोन्ही व्यक्ती-प्रवृत्ती राजकीय क्षितिजावरचे दोन विरोधी ध्रुव आहेत, हे इतिहासाला ज्ञात झालं होतं. या नंतर सावरकरांना जॅक्सन खून खटला, देशद्रोह अशा आरोपांखाली अटक झाली. सावरकर अंदमानच्या कोठडीतून सुटले ते ६ जानेवारी १९२४ साली. त्यांनी इंग्रजांना आपण केलेल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करून अनेक मर्सी पिटीशन्स अर्थात दयेचे अर्ज केले होते हे वास्तव आहे. त्यांची अंदमानातून सुटका झाल्यावरही त्यांना रत्नागिरीला स्थानबद्ध करण्यात आलं होतं. या काळात राजकीय चळवळ ते करू शकत नव्हते. १० मे १९३७ साली पूर्ण मुक्तता झाल्यावर त्यांनी हिंदू महासभेचे नेतृत्व स्वीकारले. सावरकरांची अटक आणि सुटका या २७ वर्षाच्या काळात देशाचं चित्र पूर्ण पालटून गेलं होतं. स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग अहिंसक सत्याग्रही बनला होता. इंग्रजांनी सशस्त्र संघटना मोडून काढल्या होत्या. सारा देश गांधींच्या मागे उभा होता. अर्थातच बहुसंख्य हिंदू जनतादेखील गांधींच्या मागेच. हे ‘रणावाचून’ जवळ येणारे स्वातंत्र्य पाहून सावरकर विचलित होणं स्वाभाविक होतं.

गांधींच्या ‘रामा’ने त्यांची दिशा ठरवली होती आणि सावरकरांच्या ‘रामा’ने त्यांची. हे या दोघांमधलं द्वंद्वरामायण आहे. भारताचा ‘राम’ कोणता यातला हा संघर्ष आहे. त्या रामाचं आंतरिक मूल्य काय असावं यातला हा संघर्ष आहे. याची परिणती झाली ती नथुराम गोडसे नावाच्या सावरकर शिष्याने गांधींचा खून केला तेही रामाच्या प्रार्थनेला जाताना. या साऱ्या अध्यायातही मोठी गंमत आहे. ती अशी कि, आयुष्यभर राजकीय क्रांतीची भाषा बोलून शस्त्राचार सांगणाऱ्या सावरकरांचा मृत्यू हा शेवटी उपोषण करून, आत्मार्पण करून व्हावा आणि रामनामाचा जप करत आमरण उपोषणासारख्या स्वपिडा देणाऱ्या मार्गाचा आपल्या राजकारणात सातत्याने उपयोग करणाऱ्या गांधींचा मृत्यू हा प्रार्थनेला जाताना रक्त सांडून व्हावा, हाही नियतीचा खेळच म्हणायला हवा.

Blog : सावरकरांची माफी आणि हिंदुत्ववाद्यांची गोची
...अन्यथा सावरकरांना राष्ट्रपिता ठरवलं जाईल : ओवैसी

गांधीहत्येतले प्रमुख आरोपी सावरकर

गांधीहत्येचे १९३४ पासून अनेक प्रयत्न झालेत ज्यात गोडसे-आपटे टोळी कार्यरत होती. बाकी फाळणी,५५ कोटी, मुस्लीम अनुनय ही सारी फसवी आणि आपले गांधीहत्येच्या कृत्याला सहानुभूती मिळावी म्हणून पुढे केली गेलेली खोटारडी कारणे आहेत, हे इतिहासाचा डोळे उघडून अभ्यास करणारा कुणीही व्यक्ती सांगू शकेल. गांधीहत्या हे कृत्य आपण एकट्यानेच पार पाडल्याचे नथुरामने न्यायालयातील आपल्या वक्तव्यात किती जरी ठासून सांगितल असलं तरी ते वास्तव नाहीच. ही खुनी टोळी होती. या कटातील आरोपी होते नारायण आपटे, मदनलाल पहावा, गोपाळ गोडसे, विष्णू करकरे, दिगंबर बडगे, दत्तात्रय परचुरे, शंकर किस्तय्या आणि विनायक सावरकर. नथुराम इतकाच महत्वाचा व्यक्ती आहे नारायण आपटे. नारायणचे चंपूताई फडतरेशी लग्न झालेले असूनही मनोरमा साळवी नावाच्या ख्रिश्चन मुलीशी विवाहबाह्य संबंध होते. स्त्रिया, दारू, सिगारेट, मांसाहार आणि इतर भौतिक सुखाचे त्याला आकर्षण होते. गांधीहत्या हा खटला पोलिसांच्या शोधकार्यावर नव्हे तर दिगंबर बडगे या आरोपीच्या माफीचा साक्षीदार बनल्यामुळे सुटला. ज्या ज्या गोष्टींना दुजोरा देणारा पुरावा मिळाला त्यानुसार न्यायालयाने निकाल दिला. सावरकर या खटल्यातून पुराव्याअभावी निर्दोष सुटले होते. या साऱ्या खुनी टोळीला वेळोवेळी मदत मिळाली आहे ती हिंदू महासभेच्या अनेक कार्यकर्त्याची आणि हितचिंतकांची. साऱ्या खुनी टोळीला सावरकर हे व्यक्तिमत्व निर्विवादपणे शिरसावज्ञ होतं. ते त्यांचे शिष्य होते, हे खुद्द सावरकरही नाकारू शकणार नाहीत. मदनलाल पहावा वगळता सारे आरोपी ब्राम्हण होते हे विशेष. सावरकर कटात सहभागी होते की नव्हते हा प्रश्न सातत्याने चघळला जातो. ते होते की नव्हते हा प्रश्न जरी मुद्दाम टाळला तरी ते हा खून रोखू शकत होते की नव्हते हा प्रश्न शिल्लक राहतोच.

- विनायक होगाडे

(लेखक 'ओह माय गोडसे' या गांधीहत्येवर आधारित कादंबरीचे लेखक आहेत. या ब्लॉगमधील मते हे लेखकाची वैयक्तिक मते आहेत. त्याच्याशी 'सकाळ माध्यम समूह' सहमत असेलच, असे नाही.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()