Blog: एका तालिबानीचं नरेंद्र दाभोलकरांना पत्र...

Blog: एका तालिबानीचं नरेंद्र दाभोलकरांना पत्र...
Updated on

(हा निव्वळ कल्पनाविलास आहे. पण पत्रातील मजकूराचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास तो योगायोग समजू नये...)

दाभोलकर, आज तुमचा 'दाभोलकर' होऊन आठ वर्षे पूर्ण होण्याची ही पूर्वसंध्या. पाठीमागून का होईना, पण गोळ्या घालून तुम्हाला संपवून 'भाई, अब ये नही चलेगा इधर' हे तुमच्या 'शांतीप्रिय' भारतात सुद्धा सिद्ध केलं गेलंच की! आणि पाहताय ना? शेवटी आम्हीही इथे अफगाणिस्तानात पुन्हा सत्ता काबिज केलीच म्हटलं. धर्माला घराच्या आत ठेवा, तो बाहेर नाचवू नका, असा काहीबाही युक्तिवाद करून धर्मच संपवायला निघालेल्या तुमच्यासारख्या जगभरातील लोकांना असंच संपवलं पाहिजे, हे खरं!

कसंय ना दाभोलकर, आम्ही आमच्या देशातले 'दाभोलकर' कधीच संपवलेत, किंबहुना ते कधी जन्मच घेऊ नयेत, याची पुरेपूर काळजी आम्ही घेतलीय बरं! मात्र, आमच्या प्रवृत्तीच्याच तुमच्या देशातील लोकांना जरा उशिराच हे शहाणपण सुचलंय असं म्हणायला हवं. असो! तुम्ही विचाराल, की माझी आठवण कशी काढली? याचं कारण म्हणजे, आज मी खूप आनंदात आहे. आज पुन्हा एकदा एका देशात ईश्वरी राज्य स्थापन झालंय आणि ही तर फक्त सुरुवात आहे. संपूर्ण जग इस्लाममय व्हावं, अल्लाहची कृपादृष्टी त्यावर पडावी, असाच माझा मनसुबा आहे. ही आनंदवार्ता जगभरातल्या सगळ्या 'सो कॉल्ड मानवतावादी, उदारमतवादी, विवेकवादी' लोकांना कळवावी, म्हणून हा पत्रप्रपंच! नंतर गांधी आणि बुद्धालाही कळवणारे आमची विजयवार्ता, म्हटलं सुरुवात तुमच्यापासून करावी!

Blog: एका तालिबानीचं नरेंद्र दाभोलकरांना पत्र...
Blog: नरेंद्र दाभोलकर यांचे तालिबानीच्या 'त्या' पत्राला प्रत्युत्तर

दाभोलकर, तुम्ही आयुष्यभर धर्मापेक्षा विज्ञान कसे श्रेष्ठ हेच सांगत राहिलात. म्हणे, नीतीसाठी धर्माची गरजच नाही, असा तुमचा नेहमीचा दावा. मात्र, आमच्या शेकडो वर्षांच्या धर्मापुढे अवघ्या काही दशकांपूर्वी आलेलं हे विज्ञान म्हणजे अल्लाहचीच देण आहे, हे तुम्हाला कसं कळत नाही? त्याला देवाच्याच समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभं करण्याने काही हाशील होईल, असं काही मला वाटत नाही. विज्ञान हे केवळ धर्माचंच हस्तक असायला हवं, नीती आणणं हे काही त्याचं काम नव्हे. नीतीसाठी धर्म पुरेसा आहे, हे खरं! आता तुम्हीच पहा ना, विज्ञानाने निर्माण केलेली दुचाकी घेऊन, विज्ञानाने निर्माण केलेल्या पुलावरून चालवत, विज्ञानाने निर्माण केलेल्या बंदुकीने, विज्ञानवादाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या 'नरेंद्र दाभोलकर' नावाच्या माणसांवर गोळ्या झाडल्या गेल्याच की!

अणुच्या विभाजनातून प्रचंड शक्ती निर्माण होते, हे विज्ञान सांगतं. परंतु त्या अणुशक्तिचा वापर वीजनिर्मितीसाठी करायचा की बॉंबनिर्मितीसाठी? याचं उत्तर आहे का विज्ञानाकडे? स्त्री-पुरुष संयोगातून अपत्यनिर्मिती होते, हे सांगण्याचे काम विज्ञानाचं आहे, पण एखाद्या बाईला लग्नाआधीच मातृत्व आलं तर ते नैतिक समजावे की अनैतिक...? याचं उत्तर तुमचं विज्ञान देऊ शकतं का? त्यामुळे, तुमचं हे मुकं विज्ञान धर्माच्या पायशीच ठीक आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन ते वैज्ञानिक दृष्टिकोण, वैज्ञानिक दृष्टिकोण ते धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता, धर्मनिरपेक्षता ते विवेकवाद! एवढा मोठ्या दीर्घ पल्ल्याचं दिवास्वप्न घेऊन तुम्ही निघाला आहात, याबद्दल मात्र तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, बरं का! पण कसाय, माणसानं एवढं भोळसट असावं का? तुमचा झटक्यात 'दाभोलकर' केला गेलाच की! इतकंच काय, फार 'शहाणपण' शिकवून गेलेल्या बुद्धाची अफगाणिस्तानातील बामियानमधली मूर्ती पण आम्ही नेस्तनाबूत केलीच होती. आमच्या सगळ्यांसमोर तुमचा कुठं टिकाव लागणारे का?

Blog: एका तालिबानीचं नरेंद्र दाभोलकरांना पत्र...
Blog: नरेंद्र दाभोलकर यांचे तालिबानीच्या 'त्या' पत्राला प्रत्युत्तर

आणि तुमच्या देशात तरी दुसरं काय घडतंय? स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्याच तुमच्या म्हाताऱ्याला बी घातल्याच की गोळ्या! एका अर्थाने ते ही बरोबरच होतं म्हणा! रामाचं नाव घेऊन धर्मच बुडवायला निघालेल्या त्या म्हाताऱ्याला तुमच्या इथले तालिबानी थोडीच जिवंत ठेवतील? आणि आतातर धर्माला देशाहून वरचढ करून आमच्याच वाटेवर 'भारत'ही निघालाय.

म्हणूनच, या सगळ्यात तुमच्यासारखे काटे बाजूला सारलेच पाहिजेत, याबाबत मात्र त्यांच्यात आणि आमच्यात एकमत आहे, हे मात्र मान्यच करायला हवं! आमचा द्वेष करुन ते मोठे होतात आणि त्यांचा द्वेष करुन आम्ही मोठे होतो. आम्ही एकमेकांना त्याअर्थी पूरक आहोत! हा, म्हणजे आम्ही मित्र आहोत, असं नाही. अफगाणिस्तानसहित त्यांना 'अखंड भारत' हवाय आणि आम्हाला 'भारतासहित अखंड अफगाणिस्तान' हवंय. यात आम्ही तालिबानीच विजयी होऊ, यात काय शंका नाही. मात्र, यात आधी तुमच्यासारखे लोक आडवे येतात, म्हणून त्यांना ठेचलं पाहिजे!

दाभोलकर, तुम्ही म्हणाल निशस्त्र लोकांवर, बाया-मुलांवर बंदूक डागून कसलं शौर्य गाजवताय? पण कसाय दाभोलकर, हा गोळ्यांचा आवाज आता कानांना इतका सरावलाय की, व्हायोलिन वाजवणाऱ्या बाईचे सूर अत्यंत त्रासदायक वाटतात हो! आणि बाईला मुळात घराबाहेर पडण्याची आणि त्यातही हातात व्हायोलिन, पेन आणि स्टेथस्कोप घ्यायची गरजच काय आहे?

खरं तर आता त्रासदायक शब्दामागचं गुपित या खाजगी पत्रात तुम्हाला म्हणून सांगायला हरकत नाही... पण बाई 'गायला' लागली की धर्मसंस्कृतीचे सूर पटकन ढासळतील, ही भीती सतत वाटते पहा! बाई याबाबत लय डेंजर! त्यामुळे तिला घरात डांबलं की कसं, धर्म सुरक्षित राहतो. तुम्ही म्हणाल, हे सगळं करून काय साध्य होणार? पण अल्लाहच्या मर्जीतला इस्लाम प्रत्यक्षात आणण्यासाठी हे करावंच लागणार! 'शांततेसाठी हिंसा' झाली तर बिघडलं कुठं? आम्हालाही शांतताच आणायची आहे, आणि ती आम्ही नक्की साध्य करू. बघाच तुम्ही! असो थांबतो! या पत्राच्या उत्तराची मी वाट जरुर पाहीन! आता गांधीलाही पत्र लिहायचंय आणि कळवायचंय, 'बापू, सेहत के लिए तू भी हानिकारक है'...

- विनायक होगाडे | vinayakshogade@gmail.com

(या पत्राला डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी दिलेलं उत्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा. ब्लॉगमधील मते ही लेखकाची स्वतःची आहेत. 'सकाळ माध्यम समूह' त्याच्याशी सहमत असेलच असे नाही...)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.