भ्रमंती आणि भटकंती

भ्रमंती म्हटले तर ती आपल्या जन्मापासूनच सुरू होते
blog
blogsakal
Updated on

शब्द अनेक आहेत परंतु थोड्याफार फरकाने त्याचा अर्थ एकच निघतो. आयुष्याच्या वळणावर या सर्व शब्दांचा आपल्या कृतीशी कधी ना कधी परिचय झालेला असतो. नव्हे ही आपल्या आयुष्यात सातत्याने सुरूच असते. भ्रमंती म्हटले तर ती आपल्या जन्मापासूनच सुरू होते. आईच्या गर्भातून बाहेर आल्यापासून चालणारी ही भ्रमंती शेवटच्या श्वासापर्यंत सुरू असते...........!

या भ्रमंतीला अनेक कारणे असतात. त्यापैकी बहुतांश कारणे ही स्वतःच्या चैनीखातर, कुटुंबाच्या भल्यासाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी, पदासाठी, पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी सर्वसाधारणपणे केलेली असते. आयुष्यात प्रत्येकाने आपले ध्येय ठरविलेले असते आणि त्या दृष्टीने त्याची सुरू असलेली वाटचाल म्हणजेच भ्रमंती होय.

स्वतःसाठी कुटुंबासाठी फार फार तर समाजासाठी आपल्या माणसांसाठी भ्रमंती करणे व त्यादरम्यान या सर्वांना पूरक होणाऱ्या गोष्टी जोडत राहणे पाहणे ही आहे सर्वसाधारण प्रवृत्ती. अशा प्रवृत्तीची माणसं आपल्याला जागोजागी दिसतीलही, परंतु जो व्यक्ती वैयक्तिक स्वार्थ, कुटुंब, समाज, गाव या सर्व मर्यादा ओलांडून केवळ माणुसकी आणि मानवतेसाठी भ्रमंती करतो; त्याला अवलियाच म्हणावे लागेल. क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये चांगले झाले पाहिजे, माणूस सुखी, समाधानी, आनंदी झाला पाहिजे, त्याचे वातावरण बदलले पाहिजे, परिस्थिती बदलली पाहिजे आणि दुःखद दारिद्र्य दुर्लक्षितपणा हे त्याच्या आयुष्यातून निघून गेले पाहिजे.

मग तो कोणीही असो, आपला, परका ,हिंदू- मुसलमान, दलित ख्रिश्चन, जैन आणि जे जे काही प्रचलित समाज व्यवस्थेमध्ये आहेत ते सर्व यामध्ये आलेत. मग आपलं जवळचं सोडून इतरांसाठी अशी भटकंती कुणी करता का? या कलियुगाचा विचार केला तर या प्रश्नाचे उत्तर नाही किंवा माहित नाही. कदाचित नसेलच. असेच असू शकते. परंतु मला विचाराल तर माझे उत्तर होय असे आहे !

त्या अवलियाला मी पाहिले आहे. अनुभवले आहे. सर्वांच्या मांगल्यासाठी करुणा भाकताना, नव्हे स्वतःहून प्रयत्न करताना, धडपडताना, समरस होताना पाहिले आहे......!

आणि त्या अवलियाचे नाव आहे संदीप काळे कोण आहे हे संदीप काळे. त्यांचा परिचय मी संपादक म्हणून देऊ? मित्र म्हणून देऊ? मैत्रीसाठी जगणारा जे जे काही चांगले करता येईल त्यासाठी तर धडपडणारा असा देऊ?

असो फार पाल्हाळ न पाडता सरळ सांगतो सकाळ मीडियामध्ये संपादक या चांगल्या पदावर मुंबईसारख्या महानगरीत काम करणारा एक माणूस !

जेमतेम दोन-तीन महिन्यांपूर्वी या माणसाची आणि माझी भेट झाली ; ती एका व्यासपीठावर. रविकांत तुपकर या शेतकरी चळवळीतला एका धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला त्याच्या चाहत्यांनी चार चाकी वाहन घेऊन दिले. या वाहनाच्या प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून आलेले हे व्यक्तिमत्व पहिल्यांदाच त्यांची भेट झाली विचार ऐकायला मिळाले आणि या व्यक्तिमत्वाने भुरळ पाडली.....

मुलाच्या ॲडमिशनच्या निमित्ताने मुंबईत गेलो. काम आटोपले. आणि थोडा वेळ होता. मग ठरवले. आपण ज्या सकाळमध्ये काम करतो, त्या सकाळचे कार्यालय बेलापूरच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. गेले तेवीस वर्षात आपण या कार्यालयात कधी गेलो नाही... आज जावे... परंतु आजच्या त्या जाण्यामागे संदीप काळे नावाच्या व्यक्तिमत्वाने आपल्या विचारांमधून धडपडी मधून निर्माण केलेले ते आकर्षण कारणीभूत होते.

योगायोगाने सोबत रविकांत तुपकर देखील होते. मुलगा पारसही. गप्पा झाल्या... चर्चा झाल्या.. आणि विषय आला ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेबद्दल.

तोवर माझ्या मनात पत्रकारांच्या संघटना म्हटले की राजकारण आले, हेवे दावे आले, त्यातून कुठे काय कसे मिळवता येईल? स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल. या सर्व बाबी आल्या.

परंतु संदीप काळे यांनी एक वेगळाच विचार आमच्यासमोर मांडला. त्यांनी सांगितले, कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये किंवा त्यानंतर नोकरी गमावलेल्या आणि अडचणीत आलेल्या पत्रकारांच्या अनेक कुटुंबांना भेटलो. जवळून पाहिले. त्यापैकी बहुतांश कुटुंब ही कुटुंबातला कमावता एकमेव पती, मुलगा, भाऊ असलेला पत्रकार गमावल्याचीच होती. पत्रकार आयुष्यभर एका धुंदीमध्ये जगत असतो, प्रसिद्धीच्या झोतामध्ये इतरांच्या चमकत्या दुनियेमध्ये तो जगतो किंवा त्याला त्याचे आकर्षण लावले जाते. मग काळाची, वेळेची, आपल्या कुटुंबाची, मुला बाळांची, बायकोची, आई वडिलांची पर्वा न करता तो सातत्याने जगत असतो.

जो स्वतःच्या कुटुंबाची, परिवाराचीच काळजी करत नाही तो आयुष्याची किंवा भविष्याची काय काळजी करणार ? अशा बेधुंद जगण्यातून जेव्हा कोरोनाच्या लाटेमधून तो निघून जातो, तेव्हा एक प्रचंड मोठे आकाश निर्माण होते. अशा अनेक कुटुंबांच्या भेटीतून भावना समोर आल्या, परिस्थिती कुठे मुलाच्या शिक्षणाची सोय नाही, कुठे मुलींची लग्न बाकी आहेत, कुठे अर्धवट घराचे बांधकाम झालेले आहे पण पुढची व्यवस्था नाही म्हणून टिने टाकून राहण्याची पाळी आली आहे. कुठे आई वडील म्हाताऱ्या असताना ऐन तारुण्यात मुलगा निघून गेल्याने पुढच्या आयुष्य कसे जगायचे? असा प्रश्न आहे.

असे एक ना अनेक प्रश्न होते परंतु त्याला उत्तर नव्हते. ते उत्तर शोधण्यासाठी करावयाचा छोटासा प्रयत्न म्हणजे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेची स्थापना करणे हा होय. या संघटनेच्या माध्यमातून अशा अडचणीत असलेल्या आलेल्या किंवा परिस्थिती ओढवलेल्या आपल्या बांधवांसाठी काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून या संघटनेचा झालेला उदय मनाला चटका लावून गेला...... आणि आतापर्यंत आपण नसलो तरी यापुढे या संघटनेतून एखाद्या ठिकाणी, एखाद्याचे का होईना भले करता आले तर आयुष्यात समाधान नक्कीच मिळेल. या भावनेतून त्यांच्या विचारांशी जोडला गेलो.

त्यानंतर मग व्हाट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून सातत्याने संपर्क वाढत गेला आणि एकमेकांच्या विचारांची नाळ जुळत गेली.काल परवा संदीप काळे यांचा बुलडाण्यातील दौरा झाला. पत्रकार भवनाच्या विस्तारित कामाच्या भूमिपूजनासाठी ते बुलडाण्यात आले होते.

एक संपादक आणि तोही महाराष्ट्रातील अग्रगण्य सकाळ मीडिया सारख्या मोठ्या संस्थेचा म्हटल्यावर प्रत्येकाला एक भीतीयुक्त आदर होता. मात्र संदीप काळेंची भेट झाली आणि त्या भेटीतून प्रत्येकाच्या मनातून भीती कायमची पळून गेली आणि आदर कायम राहिला. नव्हे. तो वाढतच गेला.कारण एका मोठ्या वृत्तपत्राचा संपादक म्हटला, की तो हाय फाय राहणार... कॉन्टिनेन्टल घेणार.... प्रतिष्ठितांच्या भेटी घेणार...

सो कॉल्ड सारस्वतांशी समाजाच्या समस्यांवर एसी मध्ये बसून चर्चा करणार ....आणि सर्व काही किती वाईट सुरू आहे, किती भयंकर आहे? याचे चेहऱ्यावर भाव आणून हळहळ व्यक्त करत, सोन्याच्या चमच्या मधून नाश्ता आणि चांदीच्या कपामधून चहा पीत अच्छा ! बराय ! ठीक आहे.... निघतो... आता खूप वेळ झाला... असे म्हणत बाहेर पडणार.

अशी एक सर्वसाधारण छबी अनेकांच्या मनात होती. परंतु संदीप काळे यापैकी कुठल्याही भानगडीत पडले नाही. प्रत्येक येणाऱ्या पत्रकाराची आस्थेवाईकपणे चौकशी करीत होते. जो प्रश्न पत्रकारांना कुणी अजून विचारला नाही, तो ते विचारत होते. तो प्रश्न म्हणजे घरी कोण कोण आहे? भाऊ काय करतात? वडील आहेत का? पत्नी काय करते? मुलं किती आहेत? ते काय शिकतात? त्यांना काही अडचणी आहेत का? असे त्यांच्या प्रश्नाचे स्वरूप होते. आणि आमच्या पत्रकार मित्रांना ते अनपेक्षित होते. कारण पत्रकारांना कोणीही असे प्रश्न कधीच विचारले नव्हते.

काय परिस्थिती? आमदार कोण होईल? मेंबर कोण होईल ? जिल्हा परिषदेचे काय? नगरपालिका कोणाच्या ताब्यात जाईल?याच प्रश्नांची आम्हाला सवय. त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या प्रेमात पडत गेला..

आणि सातत्याने सोबत राहिला. त्यानंतर संदीप काळेंना काही वृत्तपत्रांच्या मित्रांनी, न्यूज चॅनल वाल्यांनी, आपल्या कार्यालयात घेऊन गेले. आपण करीत असलेले काम दाखवले, त्यांच्या बाईट घेतल्या,मग काय सर्वसामान्य लोकांच्या भेटीगाठी घेतल्या.

या माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ओळखून मी त्यांना दिव्या फाउंडेशन द्वारे चालविल्या जाणारा दिव्य सेवा प्रकल्प आहे, तिथे अनाथ निराश्रीत, निराधार यांना आधार दिला जातो, आणि एक सर्वसामान्य युवक मित्रांच्या मदतीच्या बळावर हे काम करतो, याची माहिती दिली.....

आणि एका सेकंदाच्या आत त्यांनी चला मला तिथे जायचे आणि पाहायचे असे सांगितले. दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये सकाळी एक वेळचा नाश्ता आणि दोन-चार सफरचंदाच्या फोडी त्याच्यापेक्षा जास्त खाऊ घालण्यासाठी ना आमच्याजवळ वेळ होता, ना खाण्यासाठी संदीप काळेंजवळ. इतक्या व्यस्त कार्यक्रमांमधून दौऱ्यातून आणि ते ज्या पद्धतीचे ज्या लोकांच्या भेटीगाठीचे काम करत होते, ते जेवणापेक्षा महत्त्वाचे होते. त्यामुळे आम्हालाही त्यांना आग्रह करून चार घास खाऊ घालता आले नाहीत, हे संध्याकाळी कळले.

दिव्य सेवा प्रकल्पाला भेट दिली. त्या प्रकल्पामध्ये अशोक काकडे यांनी मनोरुग्ण, बेघर, देशहारा असे म्हणण्यापेक्षा आम्ही यांना मनोयात्री म्हणतो असे सांगितले. मनोयात्री म्हणजेच मनात येईल तिकडे, मनात येईल त्या पद्धतीने, मनात येईल त्या परिस्थितीनुसार अखंड यात्रा करीत राहणे.......! सुमारे 100 हून अधिक अशा मनोरात्रीच्या सहवासात रमणाऱ्या अशोक काकडे ला पाहून संदीप काळेंनाही गलबलून आले. त्यांनी प्रकल्पाची सर्व माहिती घेतली आणि आम्ही तिथून निघालो. सकाळी पाच वाजता सुरू झालेला संदीप काळेंसोबत चा प्रवास मलकापूर रात्री अकरा वाजता त्यांची मुंबईची ट्रेन येईपर्यंत सुरू होता. ते निघाले.

आपल्यापासून रात्री अकरा वाजता निघून मुंबईकडे रवाना झालेला माणूस घरी पोहोचला असेल का? असा विचार सकाळी सात वाजता सहज मनात आला. पण पोचले असतील, थकले असतील, आराम करत असतील, आपण त्यांना दुपारी फोन करू, असे विचार चक्र सुरू असतानाच मोबाईलची रिंग वाजली आणि संदीप काळे बोलतोय. मी सकाळीच पोहोचलो. घरी आलो. आता कामाला सुरुवात करतोय. काल ज्या प्रकल्पाला भेट दिली, त्याचे काही फोटो किंवा इतर काही अनुषंगिक माहिती तुमच्याकडे असेल तर पाठवा....! अन् फोन कट.

मी विचार करत बसलो......! काय हा अवलिया माणूस. अकराला ट्रेनमध्ये बसतो काय... झोपतो केव्हा..... उठतो किंवा घरी पोहोचतो... न थकता ताबडतोब कामालाही लागतो..... अरे बापरे

! मग मी

स्वतःकडे पाहिले आपण किती आळशी... किती वेळ इतरत्र वाया घालवतो..... कामासाठी किती वेळ देतो.... नको त्या वायफळ गोष्टींसाठी आयुष्यातले क्षण घालवतो...... हे लक्षात आले आणि स्वतःची लाज वाटायला लागली....!

मग ठरवले, की नाही. काहीतरी बदलले पाहिजे. आपण आपल्या कामाची पद्धत बदलली पाहिजे. ज्या क्षेत्रात आपण काम करतो. ज्या संस्थेमध्ये करतो. त्याला साजेसे आणि आपल्याही मनाला आवडणारे काम केले पाहिजे. या भूमिकेपर्यंत येऊन पोहोचलो. आता पुढे काय करावे? कसे करावे? हे दोन प्रश्न शिल्लक आहेत. काम करायचे आहे आणि रिझल्ट ओरिएंटेड आणि सकारात्मकच करायचे आहे एवढे नक्की.

अरुण जैन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.