जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने दिवसभर अनेकांचे फोन आले. लॉकडाऊनमध्ये लेखकांना वेळ कसा घालवायचा, याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण पुस्तक लिहिण्यासाठी वेळच वेळ त्यांना मिळाला आहे. कदाचित येणाऱ्या कालावधीत अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध झाली किंवा प्रकाशकांकडे आली, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. या पुस्तकांत अनेकजण कादंबरी लेखन करीत असल्याचे चित्र आहे; पण ही पुस्तके वाचणार कोण, असा प्रश्नही पडू शकतो.
सध्या पुस्तक वाचणाऱ्यांचेही सोशल मीडियावर ग्रुप आहेत. पुस्तक वाचणाची आवड असणारे फेसबुक आणि व्हॉटस् ऍप ग्रुप पाहायला मिळत आहेत. काहींनी त्यांची नियमावली कडक केली आहे. वाचनाची आवड असेल, तरच त्यामध्ये प्रवेश दिला जात आहे. असाच एक व्हॉटस् ऍप ग्रुप "वुई....द रीडर्स' 27 डिसेंबर 2018 मध्ये डॉ. अविनाश मोहरिल यांनी तयार केला. वर्षात 25 पुस्तके वाचण्याचे उद्दिष्ट ग्रुप सदस्यांना त्यांनी दिले. जानेवारी 2019 पासून तशी नियमावली त्यांनी केली. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये 161 सदस्य आहेत; पण पुस्तक वाचले की नाही हे कोण पाहणार? कोणी खोटी माहिती टाकत असेल, तर असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील; पण या ग्रुपने नियमच असे केले आहेत, की पुस्तकाव्यतिरिक्त कोणताही मेसेज त्यामध्ये टाकायचा नाही. जर टाकलाच तर एकदा दोनदा समज देण्यात येते व त्यांना काढून टाकण्यात येते.
पुस्तक वाचण्यासाठी सहभागी झालेल्या सदस्याने कोणते पुस्तक वाचनास घेतले आहे, याची प्रथम माहिती द्यावी लागते. तसेच त्या पुस्तकाच्या मुख्य पृष्ठाचे छायाचित्र देऊन लेखक, प्रकाशक, पृष्ठे आदी माहिती द्यावी लागते आणि पुस्तक पूर्ण झाल्यानंतर या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती देण्याची अट घातली आहे. यामुळे पुस्तक वाचले की नाही, याचा खुलासा स्पष्ट होतो. अशा या आगळ्यावेगळ्या ग्रुपमध्ये वाचकही तसे सर्व वयोगटातील व विविध विषयांतील आहेत. 12 वर्षांपासून ते 87 वर्षांच्या वृद्धाचाही यात समावेश आहे.
डॉ. मोहरिल यांनी पुस्तक वाचनाची आवड कमी झाली आहे, हे विचारात घेऊन तयार केलेल्या या ग्रुपमध्ये 161 सदस्यांपैकी अमेरिकेतील दोघे, जर्मनीतील एकजण, तर महाराष्ट्राबाहेरील राज्यातील 19 जण आहेत. यामध्ये गुजरात, कर्नाटक, दिल्ली, तमिळनाडू, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील सदस्य आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये 161 पैकी 100 सदस्यांनी 25 पुस्तकांचे उद्दिष्ट पूर्ण केले. यंदाच्या वर्षी 140 सदस्य पुस्तक वाचनात सक्रिय आहेत. लॉकडाउनमुळे यामध्ये आणखीन भर पडली आहे. अनेक वाचक सक्रिय झाले आहेत. डॉ. मोहरिल हे इंग्रजीचे प्राध्यापक. अमरावती विद्यापीठात ते कार्यरत आहेत; पण कामाच्या जबाबदारीतून पुस्तक वाचनाची सवय मोडल्याचे डॉ. मोहरिल यांच्या लक्षात आले. यासाठी त्यांनी आपली आवड कायम राहावी व इतरांनाही वाचनाची आवड लागावी, या उद्देशाने त्यांनी ही संकल्पना राबवली. गेल्या काही वर्षांत ती यशस्वी झाली आहे. नव्या तंत्रज्ञानात वाचनाची आवड असणाऱ्यांनी या ग्रुपचा आदर्श घेऊन वाचन चळवळीस प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.