Women's Day 2024 : सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचे धडे घेतले. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले या दाम्पत्याची चरित्रे जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल या त्यांच्या शिक्षक दाम्पत्याच्या उल्लेखावाचून पूर्ण होऊ शकत नाही. मिचेल मिशनरी जोडप्याने फुले दाम्पत्याच्या जडणघडवणुकीत असे महत्त्वाचे योगदान दिले आहे.
पुण्यात स्थायिक झालेल्या जेम्स मिचेल यांनी स्कॉटिश लेडीज असोसिएशन फॉर फिमेल एज्युकेशन इन इंडिया या संस्थेकडे स्त्रीशिक्षणासाठी मदत मागितली तेव्हा १८४० साली पुण्यात स्कॉटिश मिशनच्या मुलींच्या पाच शाळा होत्या आणि त्याशिवाय नऊ मुलींनी बाप्तिस्मासुद्धा घेतला होता. जेम्स मिचेल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लेडीज असोसिएशनने मिस मार्गारेट शॉ या तरुणीला १८४१ साली भारतात पाठवले. .
त्याआधी एक तपापूर्वी पुढे जोतिबांना त्यांच्या शिक्षणकार्यात प्रेरक आणि मार्गदर्शक ठरलेल्या सिंथिया फरारसुद्धा अशाच हेतूने अमेरिकेतून भारतात आल्या होत्या एक वेगळेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून भारतात पाऊल ठेवणाऱ्या मार्गारेट शॉ या तरुणीचा देशातील स्त्रीशिक्षणाच्या कार्यात फरारबाईंप्रमाणेच मोठे योगदान असणार होते.
काही काळानंतर रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिस मार्गारेट शॉ यांचा विवाह झाला. जेम्स मिचेल यांचा हा दुसरा विवाह होता.
भारतात १८२३ साली भारतात आगमन करणाऱ्या स्कॉटिश मिशनरींच्या तुकडीतले जेम्स मिचेल यांच्यासह सर्व मिशनरी विवाहित होते. आपल्या मिशनरी पतींच्या कार्यांत विविध मार्गाने त्यांच्या पत्नी सहभागी होत असत. हे मिशनरी शाळा उघडत असत तेव्हा मुलींच्या शिक्षणाची आणि बोर्डिंगची व्यवस्था त्यांच्या पत्नी पाहत असत.
जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी कोकणात हर्णे आणि बाणकोट परिसरात मिशनकार्य सुरु केले, शाळा उघडल्या तेव्हा मिचेल यांच्या पहिल्या पत्नीसुद्धा अशाप्रकारे आपल्या पत्नीच्या कामात सहभागी झाल्या
होत्या. मात्र मिसेस मिचेल यांचे कोकणात दापोली येथे १७ जानेवारी १८३२ रोजी निधन झाले. त्यानंतर लगेचच स्कॉटिश मिशनरींनी कोकणातील आपले कार्य बंद करण्याचा निर्णय घेतला. जेम्स मिचेल त्यानंतर पुण्यात जॉन स्टिव्हन्सन यांच्या मदतीला आले.
विल्यम किंनैर्ड मिचेल हे जेम्स मिचेल यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेले एक अपत्य. विल्यम किंनैर्ड मिचेल यांचे शिक्षण स्कॉटलंड येथेच झालेले असावे. पुण्यातल्या स्कॉटिश मिशनस्थानासाठी धर्मगुरु म्हणून १० ऑगस्ट १८५२ रोजी त्यांचा दिक्षाविधी झाला आणि २० जानेवारी १८५३ रोजी त्यांचे पुण्यात आगमन झाले. मात्र १८५६च्या अखेरीस रेव्हरंड विल्सन किंनैर्ड मिचेल यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार युरोपला जावे लागले आणि त्यानंतर ते परत भारतात कधी परतले नाहीत.
आपल्याला ज्या कार्यासाठी स्कॉट्लंडहून भारतात पाठवले होते ते मिशनकार्य विवाहानंतरसुद्धा मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांनी पुढील वीस वर्षे चालूच ठेवले.
महात्मा फुले यांनी सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनात तसेच सावित्रीबाई फुले यांना आपल्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचे धडे देणाऱ्या, फुले दाम्पत्यासंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या त्याकाळातल्या इंग्रजी वृत्तपत्रांत आणि इतर ऐतिहासिक कागदपत्रांत ज्यांचा केवळ `मिसेस मिचेल’’ म्हणून उल्लेख होतो त्या जेम्स मिचेल यांच्या या पत्नी.
मिसेस मिचेल यांच्या स्त्रीशिक्षणाबाबतच्या कार्याबाबत जेम्स मिचेल यांनी लिहिलेले एक पत्र १८४२ सालच्या `मिशनरी रेकॉर्ड’’ मध्ये पान १५२ वर प्रकाशित झाले होते. या पत्रात आगामी काळातील झनाना स्कुलच्या पाऊलखुणा दिसतात असे नागपूरचं रेव्हरंड रॉबर्ट हंटर यांनीं स्कॉटिश मिशनचा इतिहास सांगणाऱ्या आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
या पत्रात जेम्स मिचेल यांनी लिहिले होते: ``गेल्या काही दिवसांपासून मिसेस मिचेल यांनी काही मुलींच्या आणि इतरांच्या कुटुंबांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच त्यांची पुण्यातल्या एक मुख्य पंडितांच्या घरातल्या महिलांशी एक मजेशीर मुलाखत झाली. हे गृहस्थ खूप वरच्या पदावर असून सरदार आणि त्याशिवाय ब्राह्मण आहेत. या मुलाखतीमुळे या महिला इतक्या प्रभावित झाल्या आहेत कि काल या पंडिताने मिसेस मिचेल यांना पुन्हा एकदा भेटायला बोलावले आहे.’’
डे-स्कुलबाबत ही परिस्थिती होती तर मिचेल दाम्पत्यानेच पुण्यात चालवलेल्या मुलींच्या बोर्डिंग स्कुलची होती. बोर्डिंग स्कुलमधल्या मुली एकतर बहिष्कृत जातींतल्या असायच्या किंवा आईबापांनी टाकून दिलेली मुले असायच्या. ब्राह्मण किंवा इतर उच्च सधन कुटुंबातील मुलींना या बोर्डिंग स्कुलमध्ये ठेवण्याची गरजच नसायची. मिशनरींच्या दृष्टीने या बोर्डिंग स्कुल्स अधिक महत्त्वाची असत याचे कारण म्हणजे मिंशनरींच्या निगराणीखाली आणि ख्रिस्ती वातावरणात वाढणारी साहजिकच ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित व्हायची आणि त्यापैकी अनेक जण बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्त करत.
मिसेस मिचेल मुंबईतल्या मार्गारेट विल्सन यांच्या डे-स्कुल्सला नियमितपणे भेट द्यायच्या. त्याशिवाय १८४३ साली त्यांनीं मार्गारेट विल्सन यांच्या धर्तीवर मुलींसाठी अनाथाश्रम सुरु केला. जेम्स मिचेल पत्नीसह सुट्टीवर गेले होते तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत जॉन मरे मिचेल आणि त्यांच्या पत्नी मारिया मिचेल यांनीं या अनाथालयाची काळजी घेतली. आजारामुळे मिसेस मारिया मिचेल यांना १८५६ साली पुणे सोडून युरोपमध्ये परतावे लागले.
मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांना मदत करण्यासाठी त्यांची बहिण मिस जोना शॉ स्कॉटलंडहून भारतात २८ जानेवारी १८४५ रोजी आल्या. त्याकाळात मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांनी पुण्यात मुलींच्या अनेक शाळा सुरू केल्या होत्या आणि त्या स्वतः या शाळांच्या सुपरिटेंडंट होत्या.
महिलांसाठी अध्यापिका अभ्यासक्रम तयार करुन आणि प्रशिक्षणाच्या खास शाळा मिसेस मिचेल यांनी सुरु केली. अशा प्रकारे मुलीच्या शाळांसाठी प्रशिक्षित शिक्षिका उपलब्ध होऊ लागल्या. प्रशिक्षित शिक्षिका निर्माण करण्यासाठी भारतात पहिली फिमेल टिचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा मान मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांच्याकडे जातो. मार्गारेट शॉ मिचेल यांनी भारतातली महिलांसाठी पहिली अध्यापन प्रशिक्षण संस्था पुण्यात १८४०च्या सुमारास सुरु केली होती असे दिसते. सावित्रीबाई फुले या मिचेलबाईंच्या अध्यापन प्रशिक्षण संस्थेमधील काही पहिल्यावहिल्या विद्यार्थिनींमध्ये असतील.
शास्त्री नारो बाबाजी महाघट पाटील यांनी १८९१ साली लिहिलेल्या जोतिबांच्या चरित्रात म्हटले आहे: `` जोतीराव अभ्यासू व हुशार मुलगा होता. त्याने प्रत्येक वार्षिक परीक्षेत निरनिराळी पुस्तके बक्षिसे मिळविली होती. पत्नीला व माईला मराठीचे सर्व शिक्षण दिल्यावर त्यांना मिसेस मिचेल यांच्या अत्याग्रहावरून शिक्षकिणीचा कोर्स देण्यासाठी त्यांनी ठरविले.
हा कोर्स नार्मल स्कूलमध्ये मिचेलबाईच चालवीत होत्या. या बाईंनी सावित्रीदेवीची व सगुणाबाईची परीक्षा घेऊन त्यांना तिसऱ्या वर्षाचा प्रवेश दिला. त्यांचे तिसरे वर्ष (१८४५-१८४६) साली पास झाले. (१८४६-१८४७) साली ४ वर्षाची परीक्षा देऊन त्या स्कूलमधून बाहेर पडल्या. या दोघीही पुढे उत्तम हेड मिस्ट्रेस म्हणून नावाजल्या.’’
भारतात स्त्रियांना अद्यापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी सरकारतर्फे पावले उचलण्यासाठी त्यानंतर तीस वर्षे जावी लागली. यावरुन मिसेस मार्गारेट शॉ मिचेल आणि जेम्स मिचेल यांच्यासारखे मिशनरी काळाच्या किती पुढे होते हे दिसून येते.
सावित्रीबाई फुले यांचे एक महत्त्वाचे चरित्रकार असलेले मा गो माळी यांनी लिहिले आहे. :
``पुण्यातील सुप्रसिद्ध रहिवासी व युरोपियन एका सामाजिक प्रयत्नाला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र जमल्याचे पहिले उदाहरण म्हणून जोतीरावांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या मुलींच्या शाळेचा बक्षीस समारंभ वाटतो. श्रोतृसमुदाय व गंमत पाहणारे लोक यावेळी जितके जमले होते तितके पूर्वी कधीही जमले नव्हते. या समारंभाची माहिती अशी आहे :
`पूना कॉलेजच्या चौकात शनिवार ता. १२ फेब्रुवारी १८५२ रोजी एतद्देशीय मुलींच्या शाळांच्या परीक्षा झाल्या. समारंभाचा देखावा उत्साहाचा असून मनरंजन करण्यासारखा होता. चौकामध्ये लोकांना बसण्यासाठी विछाईत पसरली होती. खुर्च्या आणि कोचही ठेवण्यात आली होती. पुण्यातील मोठ्या हुद्दयावरील हिंदू व युरोपियन मंडळींनी सर्व जागा गच्च भरून गेली होती.
चौकासभोवतालच्या गॅलरीत एका बाजूला निरनिराळया शाळांतील मुलीं व दुसन्या बाजूला पूना कॉलेजचे विद्यार्थी बसले होते. बाकीच्या वयांतून अनेक डोकी डोकावून पहात होती. चौकात जवळजवळ २००० माणसे होती. आणि विश्रामबाग वाडाभोवती हजारो लोक जमले होते. इतका मोठा जनसमूह यापूर्वी पुण्यात केव्हाही जमला नव्हता. युरोपिअन पाहुण्यामध्ये पुढील स्त्रीपुरुष उपस्थित होते.
माळी यांनी या कार्यक्रमास हजर असलेल्या हिंदी आणि युरोपियन निमंत्रित पाहुण्यांची भली लांबलचक यादी दिली आहे. युरोपियन पाहुण्यांच्या या यादीत अनेक स्त्रीपुरुषांची नावे आहेत, त्यामध्ये एक दाम्पत्य आहे, रेव्हरंड जे. मिचेल आणि मिसेस मिचेल.
या महत्त्वाच्या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले असणारच हे साहजिकच आहे. फुले दाम्पत्याचे शिक्षक मिचेलदाम्पत्य होते. आपले विद्यार्थी असलेल्या जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्रीशिक्षणाबाबतच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी उपस्थित असलेल्या मिचेल दाम्पत्याच्या यावेळी काय भावना असतील याची आपण केवळ कल्पनाच करु शकतो.
जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल या दाम्पत्याने पुण्यात मुलांमुलींसाठी अनेक शाळा सुरु केलेल्या असाव्यात असे दिसते. ``१८४४ साली चर्च ऑफ स्कॉटलंड मिशनने मंगळवार पेठेत एक मुलींची शाळा काढली, तीत पुरोपियन शिक्षिका व पुरेशी साधनसामग्री अशी सर्व सोय केली होती. परंतु १८४७ साली ही शाळा बंद पडली. या तपशीलावरून पुण्यामध्ये एकोणिसाव्या शतकात स्त्री व शूद्र यांच्यासाठी शाळा सुरू करून त्यापुढे चालविण्याचा सर्व प्रयत्न विफल झाल्याचे दिसून येईल, .’’ असा एक उल्लेख आढळतो.
पुणे स्कॉटिश मिशनच्या मुलींच्या शाळांच्या १८६३च्या दरम्यान झालेल्या वार्षिक परीक्षेला मुंबई इलाख्याचे गव्हर्नर सर बार्टल फ्रेरी यांच्या पत्नी लेडी फ्रेरी, सर जमशेटजी जिजिभॉय यांचे दोन चिरंजीव, जग्गन्नाथ शंकरशेठ आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी मिशनची मुलींची एक बोर्डिंग स्कुल आणि सहा दे-स्कुल्स होत्या. मुलींच्या या सर्व शाळांच्या संस्थापक असलेल्या मिसेस शॉ मिचेल या तोपर्यंत सुपरिटेंडंट होत्या.
जोतिबा फुले यांनी १८८२ साली सर डॉ विल्यम हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनात असे म्हटले हे कि त्यांनी आणि यांच्या पत्नीने सुरु केलेल्या शाळा नंतर शिक्षणखात्याकडे सोपवण्यात आल्या आणि शाळा मिसेस मिचेल चालवत होत्या.
मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांनी दोन दशके म्हणजे १८६३ पर्यंत मुलींच्या बोर्डिंग स्कुल आणि डे-स्कुल्सच्या सुपरिटेंडंट म्हणून कार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.