आभासी प्रेमसंबंधाची एक नवी बाजू म्हणजे यातून समलैंगिक संबंधांबाबत पौगंडावस्थेतच आकर्षण उघड होत आहे.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस (World Suicide Prevention Day) : व्हर्च्युअल लव्हशिप (Virtual Loveship) अर्थात, आभासी प्रेमसंबंधातून (love Affair) नैराश्य, आत्महत्या, खून (Murder) अशा शेकडो घटना थोडं ‘गुगल’ केलं तर आढळतात. आत्महत्यांमागच्या अनेक कारणांची आजवर नेहमीच चर्चा होत आली आहे.
मात्र, आभासी प्रेमसंबंध हे नवं कारण पीडितांच्या समुपदेशनातून सर्रास पुढे येत आहे. एरव्ही समाजमाध्यमांच्या दुष्परिणामांची चर्चा होत असताना त्यातील ‘हा’ कोपरा तज्ज्ञ समुदेशकांच्या निरीक्षणातून अधिक ठळक होतो. आजच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त त्यांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया आपल्याला मार्गदर्शक ठराव्यात...
आभासी प्रेमसंबंध हे समाजमाध्यमांचं नवं देणं (?) आहे. यात खेड्यांतील मुलं अडकली आहेत. याची विकार म्हणून वैद्यकशास्त्राने व्याख्या केलेली नाही, मात्र दुर्दैवाने लवकरच अशी वेळ येईल. हे केवळ ‘मोबाईलचं व्यसन’ नसून मानसिक विकृतीचे कारण ठरतेय. आमच्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्यांमध्ये विवाहितही आहेत. पूर्वी प्रेमसंबंधातून, एकतर्फी प्रेमातून आत्महत्या व्हायच्या. त्यामागची कारणे जाती-धर्मातून कुटुंबाच्या स्तरावर अशा प्रेसंबंधांना विरोध, ही पार्श्वभूमी असायची. इथं मुलं गल्ली-कॉलेज नव्हे, देश-परदेशातील जोडीदाराच्या प्रेमसंबंधात अडकलेली असतात. पौगंडावस्थेतील आत्महत्या किंवा पूर्वटप्पा नैराश्याने ग्रासलेल्या ‘केसेस’ संख्येने अधिक आहेत.
- कालिदास पाटील, समुपदेशक
पौगंडावस्थेत अनेक प्रकारचे न्यूनगंड घेऊन जगणारी मुलं-मुली आभासी प्रेमसंबंधात हमखास अडकतात. समाजात संवादासह अनेक प्रकारची कौशल्ये-गुण अंगी लागतात. ती कमी असणारी, सामाजिक धारणांमधून रंगरूप, ओळख लपवण्याचा न्यूनगंड बाळगणारी व्यक्ती आभासी प्रेमसंबंधात हमखास अडकते. संयम-विवेकाची वानवा या गर्तेत अधिकच ढकलते आणि मग एक टप्पा वास्तव जगात आल्यानंतर नैराश्याचा असतो. मग आत्महत्यांमागे ‘ब्रेकअप’, फसवणूक अशी कारणे पुढे येतात. मात्र त्यासाठी आभासी प्रेमसंबंध हा पहिला सापळा असतो. समाजमाध्यमी साक्षरता हा पुढचा टप्पा असतो. मात्र त्याआधीच ही मुलं याच प्रक्रियेत अडकलेली असतात.
- डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ
आभासी प्रेमसंबंधांच्या विळखा पौगंडावस्थेतच पडतो असे नाही. यात विवाहितांचेही प्रमाण खूप आहे. त्यातून अनेक जोडपी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आली आहेत. कौटुंबिक नातेसंबंधातील तणाव, लैंगिक सुखाबाबतची अतृप्ती विवाहबाह्य प्रेमसंबंधाचे प्रमुख कारण असते. अशा संबंधांना सुरक्षित चौकटीत व्यक्त करण्याची वाट आजच्या समाजमाध्यमी जगाने करून दिली.
गेल्या काही वर्षांत ‘डेटिंग ॲप’मधून अशा संबंधांना अधिक मोकळे रान मिळाले. अशा संबंधांना भारतीय समाजात अद्यापही उघड मान्यता-स्वीकार नाही. त्यातून एकमेकांचा समाजमाध्यमांवरच वावर तपासणे सुरू होते. त्यात थोडे संशयास्पद काही आढळले की तणाव, नैराश्य आणि आत्महत्या असा शेवट ठरलेला असतो. घटस्फोटापर्यंत जाण्याचं प्रमाण चिंताजनक वाटावे, असे आहे.
- अर्चना मुळे, समुपदेशक
आभासी प्रेमसंबंधाची एक नवी बाजू म्हणजे यातून समलैंगिक संबंधांबाबत पौगंडावस्थेतच आकर्षण उघड होत आहे. भारतीय समाजात अशा संबंधांना मान्यता नव्हती. सारेच चोरी-छुपे असायचे. मात्र अलीकडे चित्रपटांसह अनेक सोशल व्यासपीठांवर त्याचा उघड उच्चार होत आहे. समाजमाध्यमांवर ‘असे’ गट आहेत. त्यांच्यात चर्चा-भेटी होताना दिसतात. अवघ्या १२ ते १३ वयोगटापासून समलैंगिकतेची जाणीव उघड होणे, हा प्रकार दिसून येत आहे. समलिंगी संकेताचे ‘स्टेटस’ ठेवणे आणि त्यातून पुढे आभासी प्रेमसंबंध होतात. पेड डेटिंग ॲपच्या माध्यमातून असे सुरक्षित गट तयार होतात. बहुतेक असे ॲप्स असुरक्षित आहेत. अशा ॲपवरून डेटा चोरून ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडलेत. त्यातून आत्महत्येची वेळ येऊन जीवन उद्ध्वस्त होते.
- डॉ. प्रदीप पाटील, समुपदेशक, आकार फाउंडेशन
समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर आत्महत्येस प्रोत्साहित करीत आहे. यशस्वी (?) आत्महत्येच्या टिप्स देणाऱ्या तज्ज्ञ-माहितीची मुबलकता जणू उत्तेजकाप्रमाणेच काम करीत आहे. ‘सेक्सॉटर्शन’ किंवा ‘सायबर बुलिंग’ असे क्राईमचे नवे प्रकार पुढे येत आहेत. ‘सुसाईड-पॅक्ट’ ज्यांत दोन किंवा अधिक जण आत्महत्या करण्याचे प्रकार अलीकडे देशभरात दिसले आहेत. असे व्हिडिओज यू-ट्यूब-फेसबुकवर टाकले जातात.
‘सुसाईड-नोटस्’चे नमुने दिले जातात. दोन कमालीच्या टोकांच्या आर्थिक वर्गातील आभासी प्रेमसंबंध अंतिमतः वाईटाकडेच जातात. मुलाचं रोजचं दोन तासांहून अधिकचं समाजमाध्यमांवरील अस्तित्व धोक्याचं आहे. त्यांचा ‘लाईक्स’ आणि ‘शेअर’चा हव्यास नैराश्याला निमंत्रण देतो. ते आभासी आर्थिक समृध्दीमुळेही होते. हे सारे धोके ओळखून ‘सोशल’ माध्यमांबाबत साक्षरता अंगी येणे, त्या शहाणपणासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत.
-दिनेश कुडचे, संगणक साक्षरता विषयातील तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.