coronavirus - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून  देश वाचवायला प्राधान्य द्या, बघा कोण म्हणतंय...

arif khan
arif khan
Updated on

पावणेतीन कोटी लोकसंख्येच्या ऑस्ट्रेलिया देशात पाच हजार सातशेहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींना एकत्र येण्यासही बंदी आहे. जर नियम तोडला तर सव्वालाख ते तब्बल सात लाख रुपयांचा दंड व सहा महिने तुरुंगवास अशी शिक्षा आहे. कोरोनापासून कुठलाही देश, धर्म सुटू शकत नाही. त्यामुळे सर्वांनीच आज आपापला धर्म, जात, पंथ बाजूला ठेवून सर्वांत प्रथम देश वाचवायला प्राधान्य द्यावे, असे आवाहन ऑस्ट्रेलियात अभियांत्रिकीचे उच्चशिक्षण घेणाऱ्या आरिफ खान याने केलेय. यानिमित्त ‘सकाळ'ने साधलेला संवाद... 

प्रश्न - ऑस्ट्रेलियातील सध्याचा दिनक्रम कसा आहे? 
आरिफ - माझे यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेत मास्टर पदवीचे शिक्षण सुरू आहे. मी गेल्या २० महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात राहत आहे. कोरोनामुळे अभ्यासाची सर्व प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे. घरातच राहून अभ्यास करतोय. केवळ किराणा साहित्य व वैद्यकीय गरज लागली तर बाहेर जाता येते. ही समस्या मी गंभीरपणे घेत आहे. माझ्यासह जपानमधील इतर चार विद्यार्थी एकत्र राहत आहोत; पण घरातही सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते. आम्ही सर्व रूममेट नियमित हात धुणे, घरात स्वच्छता ठेवणे, दररोज कपडे धुणे अशी कामे करीत आहोत. याशिवाय दरवाजाचे हँडलही साफ करतोय. बाहेर जाताना मास्क घालतो. वाहनाला जेथे हात लागतो, ती जागा सॅनिटाईज्ड केली जाते. जंकफूड आणि कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक्स कटाक्षाने टाळतोय. घरीच ताजे खाद्यपदार्थ बनवून खातो. अधूनमधून कोमट पाणी पितो. 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...

प्रश्न - लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी केली जातेय? 
आरिफ - ऑस्ट्रेलियात सध्या कोणीही बाहेर जाऊ किंवा येऊ शकत नाही. प्रवासावर बंदी आहे. केवळ बाहेरदेशात गेलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना परत येण्याची परवानगी आहे. ऑस्ट्रेलियातील सर्व राज्ये लॉकडाऊन आहेत. मी सध्या क्वीन्सलॅण्डमध्ये राहतो. लॉकडाऊनमुळे मी इतर राज्यांत जाऊ शकत नाही. सरकारने नवीन नियमही लागू केले आहेत. सर्व बीच, उद्याने, क्लब, मॉल्स, विद्यापीठे आणि इतर सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद आहेत. आपत्कालीन स्थितीत टॅक्सीने प्रवास करायचा असल्यास केवळ एका व्यक्तीला परवानगी आहे. सार्वजनिक ठिकाणी दोनपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असा नियम बनवलाय. कोणत्याही ठिकाणी दोनपेक्षा जास्त लोक आढळले तर १३५० डॉलर दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. प्रत्येक राज्यात वेगवेगळे दंड आहेत. क्वीन्सलॅण्डमध्ये सरासरी ९८ हजार रुपये (१३५० डॉलर), व्हिक्टोरियात एक लाख वीस हजार रुपये (१६५० डॉलर) व ‘एनएसडब्ल्यू’मध्ये सात लाख ३० हजार रुपये (१० हजार डॉलर्स) एवढा प्रचंड दंड आहे. सर्व रेस्टॉरंटमधील जेवणाचे पर्याय बंद झाले आहेत. फक्त टेक टू ऑप्शनच उपलब्ध आहे. लॉकडाऊन एक महिन्यासाठी सुरू राहील; परंतु जर स्थिती आणखी वाईट झाली तर सहा महिन्यांपर्यंत वाढू शकते. 

हेही वाचा - कोरोनाचे संकट - दिलपसंदच्या शेतात सोडल्या मेंढ्या! 

प्रश्न - ऑस्ट्रेलियातील नागरिकांचे वर्तन कसे आहे? 
आरिफ ः येथील लोक पोलिस आणि सरकारला सहकार्य करीत आहेत. काही लोक नियम मोडून सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने नुकताच वरीलप्रमाणे दंड लागू करण्यात आला आहे. नवीन कठोर नियमांमुळे आता सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे कुणालाही शक्य होणार नाही. मुले शालेय अभ्यास, असाईनमेंट आणि घरातून ऑनलाइन घरकाम करीत आहेत. परिस्थिती सामान्य होईपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

प्रश्न - सध्या भारतातील नागरिक, सरकारची भूमिका कशी वाटते? 
आरिफ - इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाची रुग्णसंख्या कमी आहे; पण हा विषय गंभीर होत चाललाय. भारत सरकारने प्रवासबंदी, लॉकडाऊन आणि सार्वजनिक वाहतूक बंद करणे यांसारखे काही चांगले नियम लावले आहेत. सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलाय; पण नागरिकांनी याचे गांभीर्याने पालन केले पाहिजे. घरातही एकटे राहणे, विलगीकरण हे कोरोनापासून बचावाचे मार्ग आहेत. भारतीय लोकांना सॅनिटायझर आणि मास्क; तसेच डॉक्टर आणि पोलिस दलासाठी पीपीई किट्स द्यावेत. भारतातील बहुतांश लोक हे संकट गांभीर्याने घेऊन लॉकडाऊनचे पालन करताहेत; पण काही लोक सरकारला साथ देत नसल्याचे दिसते. अशा बेजबाबदार लोकांमुळे कोरोनाचा उद्रेक झाला तर त्याचा तीव्र परिणाम भारतावर होऊ शकतो. 

हेही वाचा -  ‘हे’ माध्यम आहे एकाग्रता वाढविण्यासाठी झक्कास, कोणते? ते वाचाच  

प्रश्न - कोरोनाचा भविष्यात रोजगारावर काय परिणाम होईल? 
आरिफ - कोविड- १९ हा साथीचा रोग आहे. याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे आणि अनेक देश लॉकडाऊनमध्ये आहेत. या परिस्थितीत लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. आता बचतीवर बरेच काही अवलंबून आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही मंदीचा परिणाम तीव्रतेने जाणवणार आहे. सध्या फक्त रुग्णालय व किरकोळ बाजारपेठ खुली आहे. मोठ्या कंपन्यांचे कर्मचारी घरूनच काम करताहेत. उत्पादन कंपन्यांना याचा अधिक फटका बसेल. अर्थात, भारतीय लोकांनाही झळ सोसावी लागेलच. 

प्रश्न - भारतीयांना काय संदेश आहे? 
आरिफ - घरीच राहा, लॉकडाऊनचे अनुसरण करा, विनाकारण घराबाहेर जाऊ नका. पोलिसही माणसे आहेत, हे लक्षात ठेवा. ते आपले जीवन धोक्यात घालताहेत. स्वतःचे कुटुंब व घर सोडून फक्त तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते रस्त्यांवर आहेत. हा एक मोठा त्याग आहे आणि लोकांनी त्यांचा आदर केला पाहिजे. सर्व आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा. हायजेनिक राहा आणि आपला हात स्वच्छ ठेवा. जंकफूड, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम टाळा. आपत्कालीन परिस्थितीत घराबाहेर जात असल्यास मास्क घाला. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवा. हातात हात देऊ नका, मिठी मारू नका. फक्त नमस्कार किंवा आदाब करा. कुटुंबात वृद्ध व्यक्तींनी जास्त काळजी घ्यावी. बहुतांश मृत्यू वृद्धांचे झाले असले, तरी यंगस्टर्सवर काहीच परिणाम होणार नाही, असे गृहित धरू नका. 

प्रश्न - जागतिक संकटात तरुणांनी कोणती भूमिका घ्यावी? 
आरिफ - आपण कोणत्याही धर्मातील असला, तरी फक्त घरीच प्रार्थना करा. मशिदी, मंदिरे, चर्च किंवा कोणत्याही धार्मिक ठिकाणी जाऊ नका. तरुणांना माझा संदेश आहे, की आपला वेळ नवीन कौशल्ये शिकण्यासाठी वापरा, भविष्यासाठी सज्ज व्हा. स्टार्टअपबद्दल विचार करा. कौशल्ये केवळ अभ्यासापुरती मर्यादित नाहीत. इतर गोष्टी जाणून घ्या. स्वयंपाक कसा बनवायचे ते शिका, आपल्या पालकांना इतर कामांमध्ये, स्वयंपाकघरात मदत करा. व्यायाम, योगा करा. आपण फक्त घरातच सुरक्षित राहू शकतो. तरीही शेजारी काय करताहेत, याकडेही लक्ष द्या. कुणी अडचणीत असेल तर मदतही जरूर करा. यूएसए, चीन, इटली आणि इराणसारखी परिस्थिती भारतात होऊ द्यायची नाही, असा निर्धार करा. आज भारताला जगात मान उंचावण्याची संधी भेटलीय. ती गमावू नका. औरंगाबाद जिल्ह्यातील करंजखेड (ता. कन्नड) हे माझे वडील अझीज खान यांचे मूळ गाव. माझा जन्म कन्नडचा. मी गावाकडे नातेवाईक, मित्रांशी नियमित संपर्क साधून खबरदारीचे आवाहन करतोय. 

प्रश्न - देशात कोरोना विषाणूचे संकट किती काळ टिकेल असे वाटते? 
आरिफ - ऑस्ट्रेलियात ‘कोविड १९’ची प्रकरणे जवळपास पाच हजारांच्या आसपास आहेत आणि दररोज वाढत आहेत; परंतु सरकार कडक कारवाई करीत आहे. व्हायरस कमी करण्यासाठी नवीन नियम लागू करीत आहे. लोकांनी सरकारला सहकार्य केल्यास आणि लॉकडाऊन नियमांचे पालन केल्यास या समस्येचे निराकरण केले जाऊ शकते. हे लवकरच संपेल, अशी प्रार्थना मी संपूर्ण जगासाठी करतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.