पिंपरी - चिखली येथील घरकुलमध्ये कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना रेशनही मिळत नसल्याचे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी येथील नागरिकांनी किमान रेशन तरी मिळावे, अशी मागणी केली आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महापालिकेच्या वतीने ही घरकुल योजना राबविण्यात आली आहे. या योजनेत 140 सोसायट्या असून पाच हजार 500 कुटुंब राहतात. या भागात राहणाऱ्या 15 टक्के नागरिकांचे रेशनकार्ड सुरू आहेत. तसेच 85 टक्के जणांची रेशनकार्ड त्यांनी मूळ पत्त्यावरुन घरकुलमधील नवीन पत्त्यावर आल्याने बंद आहेत. आणखी काही दिवस हा परिसर बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान फेडरेशन ऑफ घरकुलचे प्रवर्तक अशोक मगर यांनी सांगितले, 'मी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये आमच्याकडे वितरण व्यवस्थेचे नियोजन आहे. सरकारने रेशनची देण्याची व्यवस्था करावी. त्याच्या वाटपाचे नियोजन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ.''
यासंदर्भात फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष नारायण धुरी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रही पाठविले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, 'या भागातील नागरिकांना किराणा माल देण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. अनेक कुटुंबे रोजंदारीची कामे करतात. याबाबत लवकर उपाययोजना न केल्यास अडचणींमध्ये आणखी भर पडेल.'
|