आखाडा बाळापूर : येथील कृषी विभागाच्या बीजगुणन प्रशिक्षण केंद्रात गुरुवारी सकाळी नियमित कामकाज करीत असताना कृषी पर्यवेक्षकाचा भोसकून खून झाला. या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. संशयितास अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
आखाडा बाळापूर येथील नवीन बसस्थानक परिसरात कृषी विभागाच्या बीजगुणन प्रशिक्षण केंद्र आहे. सकाळी अकराच्या सुमारास कृषी पर्यवेक्षक राजेश शिवाजी कोल्हाळ (वय ३५, रा. कोंडवाडा, ता. सेनगाव) हे नियमित कामकाज करीत होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात कोल्हाळ हे गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, काही कर्मचारी बाजूला खोलीत कामकाज करत बसले होते. बराच वेळ झाला तरी कोल्हाळ बाहेर न आल्याने दुपारी त्यांनी डोकावून पाहिले असता कोल्हाळ हे खुर्चीवर रक्ताच्या थारोळ्यात होते. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळविले. पोलिस येईपर्यंत परिसरात मोठा जमाव जमला होता.
रोजंदारी कर्मचाऱ्यावर संशय
राजेश कोल्हाळ यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात कृषी केंद्राच्या परिसरात आले. त्यांनी रोजंदारीवर असणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर संशय व्यक्त केला. त्यानेच हा प्रकार केला असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांना सांगून त्यांना ताबडतोब अटक करा, अशी मागणी केली आणि उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नेण्यापासून रोखला. काहींची मध्यस्थी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडली.
दोन महिन्यांपूर्वीच बदली
राजेश कोल्हाळ दोन महिन्यांपूर्वी वर्धा येथून बदलीवर कळमनुरी तालुक्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आखाडा बाळापूर येथील कृषी विभागाच्या बीजगुणन प्रशिक्षण केंद्रामध्ये कृषी पर्यवेक्षक या पदावर काम सुरू केले होते. त्यांची हत्या कोणी आणि का केली, याचा पोलिस शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.