Kalyan Dombivali Crime: टपरीवर चहा पिणाऱ्या मित्राला त्याने काळ्या अशी हाक मारली. याचा त्या मित्राला राग आला. त्याने मी आता सहा वर्षांपूर्वीचा सोन्या राहिलो नाही, मी भाई आहे. असे सांगत मित्राला चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली.
एवढेच नाही तर त्याच्याकडील रोकड हिसकावून पसार झाला. अक्षय उर्फ सोनू दाते असे स्वतःला भाई म्हणणाऱ्या व दहशत माजविणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कल्याण गुन्हे शाखेने अक्षय दाते (वय 22) व त्याचा साथीदार रोहित भालेराव (वय 23) याला अटक केली आहे. सोनू हा सराईत गुन्हेगार असून दोन वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे.
डोंबिवली पूर्वेतील फडके रोड येथील चिमणी गल्लीतील चहाच्या टपरिजवळ मंगळवारी सकाळी ही घटना घडली होती. पूर्व वैमनस्यातून एका टोळक्याने एकाला बेदम मारहाण केली होती. या टोळक्याने म्होरक्याने भर बाजारात चाकूच्या साह्याने दहशत माजवून सदर व्यक्तीला जखमी केले. शिवाय त्याच्याकडील रोकड लुटून पसार झाला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात जखमी हर्षद सरवदे (वय 41) याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मूळचा धाराशिव जिल्ह्यातील तेलखडा गावचा रहिवासी हर्षद हा चिमणी गल्लीत एका टपरीवर चहा पित होता. तेथे अक्षय दाते त्याच्या साथीदारांसह आला. तू मला काळ्या नावाने हाक का मारली ? आता मी काळ्या राहिलेलो नाही, मी आता भाई झालो आहे. असे दरडावून अक्षय याने हर्षदला संगितले.
तसेच आपल्या साथीदारांच्या मदतीने मारहाण सुरू केली. हर्षदला अचानक मारहाण सुरू झाल्याने तेथे असलेल्या इतरांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षय आणि त्याचे साधीदार ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अक्षयने सोबत आणलेला चाकू हर्षदच्या गळ्याला लावून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्याकडील 2 हजार 700 रूपये जबरदस्तीने काढून तेथून पळ काढला.
रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. या गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष उगलमुगले, उपनिरीक्षक संजय माळी, हवालदार अनुप कामत, बापूराव जाधव, सचिन वानखेडे, दीपक महाजन, रविंद्र लांडगे यांनी सुरू केला होता.
तक्रारदार हर्षदचे हल्लेखोर मंगळवारी संध्याकाळी दत्तनगर भागात येणार असल्याची खबर सचिन वानखेडे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला. ठरलेल्या वेळेत आलेल्या अक्षय आणि रोहित या दोघांना अटक केली. या दोघांना रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. यातील अन्य एकाचा पोलिस शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.